Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 31 August 2025
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ३१ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०
****
· आत्मनिर्भरतेवर भर देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं `मन
की बात`मध्ये आवाहन
· हैदराबाद मुक्ती संग्रामाचा पंतप्रधानांकडून
गौरव
· पंतप्रधान आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा
आणि
· मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा जरांगे पाटील यांचा इशारा, तर याप्रश्नी कायदेशीर
मार्गदर्शन घेत असल्याची सरकारतर्फे माहिती
****
आत्मनिर्भरता आणि `वोकल
फॉर लोकल` हा मंत्र घेऊन देशानं पुढं जायला हवं, असं प्रतिपादन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं. `मन की बात`
या कार्यक्रमाच्या १२५ व्या भागात त्यांनी आकाशवाणीद्वारे
आज देशवासियांना संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते. आगामी
सणासुदीच्या दिवसात स्वदेशीचा मंत्र विसरू नका, पेहराव, सजावट, उपाहार
या सर्व गोष्टी स्वदेशी असाव्यात, असं आग्रही प्रतिपादन त्यांनी केलं.
उत्सवाच्या काळात स्वच्छता पाळण्याचा सल्ला त्यांनी दिला. ते म्हणाले...
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
यूपीएससी परीक्षेत अपयश येणाऱ्या
विद्यार्थ्यांना इतर परीक्षांसाठी तयारी करता यावी यासाठी प्रतिभासेतू हे डिजिटल
व्यासपीठ तयार केल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. या पोर्टलमधे अभियंता, वैद्यकीय
क्षेत्रात प्रवेश मिळवू बघणाऱ्या पण अपयश आलेल्या विद्यार्थ्यांची माहितीही आहे.
या पोर्टलद्वारे माहिती घेऊन खासगी कंपन्या या विद्यार्थ्यांना नोकरी देणार आहेत.
याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना झाल्याचं त्यांनी नमूद केलं. जम्मू काश्मीरमधल्या
दाल सरोवरात नुकत्याच झालेल्या
`खेलो इंडिया`
जलक्रीडा महोत्सवाचा पंतप्रनांनी आपल्या संबोधनात विशेष
उल्लेख केला. या स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते खेळाडू ओदिशा इथली रश्मिता साहू आणि
श्रीनगरमधला मोहसीन अली यांच्याशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं.
एक भारत - श्रेष्ठ भारत ही भावना देशाच्या एकात्मतेसाठी आवश्यक असून खेळ यात
महत्त्वाची भूमिका बजावतात असं ते म्हणाले. देशातल्या सौरऊर्जा प्रकल्पांच्या
प्रयोगाबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. सौरऊर्जेच्या वापरामुळं शेतकऱ्यांचं
जीवनमान बदलत असून त्याला त्याच्या मेहनतीचं फळ कैकपटीनं जास्त मिळत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. त्यांनी या संदर्भात बिहारमधील रतनपुरा
इथल्या सोलारदीदी देवकी यांच्या कार्याची माहिती दिली. १५ सप्टेंबरला साजरा केल्या
जाणाऱ्या महान अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जयंतीनिमित्त तसंच १७
सप्टेंबरला साजऱ्या केल्या जाणाऱ्या विश्वकर्मा जयंतीच्या मोदी यांनी शुभेच्छा
दिल्या. सोनार,
लोहार, सुतार, मूर्तीकार यानी
देशाच्या प्रगतीचा पाया घातला आहे, असं ते म्हणाले. १७
सप्टेंबरला देशभरात हैदराबाद मुक्तीसंग्राम दिवस साजरा केला जाणार
असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. रझाकार आणि निजामाच्या अत्याचाराविरोधात लढलेल्या
सर्व स्वातंत्र्यसैनिकांचं त्यांनी स्मरण केलं तसंच देशाचे पहिले गृहमंत्री सरदार
वल्लभभाई पटेल यांची एक ध्वनिफीत श्रोत्यांना ऐकवली.
सरदार पटेल आणि भारतरत्न डॉक्टर
बाबासहेब आंबेडकर यांनी या संदर्भात बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचा त्यांनी
गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले..
बाईट - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
पहिल्या महायुद्धापासून आतापर्यंतच्या
शहीद जवानांची माहिती आणि छायाचित्र जतन करणारे जितेंद्र सिंह राठौड यांचा
पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला. गेल्या काही दिवसात देशभरात अतिवृष्टी आणि इतर
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीबद्दल पंप्रधानांनी दुःख
व्यक्त केलं. तसंच या काळात एनडीआरएफ, एसडीआरएफ, डॉक्टर
आणि मदत करणाऱ्या सर्व नागरिकांचं त्यांनी
कौतुक केलं. भारतीय संस्कृतीचा प्रभाव
परदेशातल्या छोट्या छोट्या शहरातही दिसून येतो असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
त्यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची स्थापना करणाऱ्या इटलीमधल्या कँपरोतोंदो
या शहराचं उदाहरण दिलं. कॅनडात मिसीसागा इथल्या प्रभू श्रीरामाच्या ५१ फुटी
मूर्तीचा उल्लेखही त्यांनी केला. तसंच रशियामधल्या व्लादिवोस्तोक इथं शाळकरी
मुलांनी रामायणातल्या कथांवर आधारित चित्रांचं प्रदर्शन भरवल्याचं सांगत भारतीय
संस्कृतीचा प्रसार जगाच्या कानाकोपऱ्यात होत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी
आनंद व्यक्त केला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे
अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. मोदी शांघाय सहकार्य
संघटनेच्या शिखर बैठकीच्या निमित्तानं चीनमध्ये आहेत. मोदी म्हणाले की, दोन्ही
देशांच्या दोन अब्ज ८० कोटी लोकांच्या जनतेचे हित परस्पर सहकार्याशी जोडलेलं आहे.
भारत आणि चीन यांच्यातल्या सहकार्यामुळं संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग
मोकळा होईल. भारत परस्पर विश्वास, आदर आणि प्रामाणिकपणाच्या आधारावर संबंध
पुढे नेण्यास वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये
सीमाव्यवस्थापनाबाबत सहमती झाली आहे. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली असून
दोन्ही देशांदरम्यान थेट उड्डाणही सुरू केले जात आहे, अशी
माहिती पंतप्रधानांनी दिली. या बैठकीकरता तियानजिनमधे आलेल्या इतर
राष्ट्रप्रमुखांबरोबरही ते द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. त्यात रशियाचे अध्यक्ष
व्लादिमीर पुतीन यांचा समावेश आहे.
****
सरकार मागण्या मान्य करत नसल्यानं
उद्यापासून उपोषणाची तीव्रता वाढवणार असून पाणी घेणंही बंद करणार असल्याचा इशारा
मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला. मुंबईतल्या आझाद मैदान इथं
जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे.
****
जरांगे पाटील यांच्याकडून आलेल्या
प्रस्तावावर उपसमितीनं चर्चा केली असून, सरकार यासंदर्भात कायदेशीर
मार्गदर्शन घेत असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
उपोषणावर मार्ग काढण्यासाठी तसंच त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी
उपसमितीची बैठक मंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानी आज झाली, त्यावेळी
ते बोलत होते. याप्रसंगी मंत्री गिरीष महाजन, दादा भुसे, मकरंद
पाटील, शिवेंद्रराजे भोसले तसंच अन्य मंत्री दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी
झाले होते. सरकारला प्रश्न सोडवायचा आहे, मात्र महाविकास आघाडीचे
नेते केवळ वेगवेगळी विधानं करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
घटनेत बदल करून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याचा सल्ला देणारे शरद पवार केंद्रात
मंत्री असताना गप्प का बसले, असा प्रश्न विखे पाटील यांनी यावेळी
उपस्थित केला. बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले
की, प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपसमिती
काम करीत आहे. काल त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्याच्या महाधिवक्त्यांशीही
यासंबंधी चर्चा करणार असल्याचं विखे पाटील म्हणाले. काल बीड जिल्ह्यातील आमदारांनी
भेट घेवून केलेल्या मागण्याबाबत तसंच समितीकडे आलेल्या अनेक सूचनांचं स्वागत करून
समितीचे सदस्य विचारही करत असल्याचं विखे पाटील म्हणाले.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज
जरांगे हे मराठा आरक्षणाच्या नावाखाली राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची
टीका राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते आज मुंबईत
वार्ताहरांशी बोलत होते. जरांगेंनी यापूर्वी आंदोलन केल्यानंतर
मराठा समाजाला सामाजिक तसंच आर्थिक दृष्ट्या मागास श्रेणीचं आरक्षण देण्यात आलं, मात्र
त्यात राजकीय आरक्षण समाविष्ट नसल्यानं जरांगे आंदोलन करत आहेत अशी टीका पाटील
यांनी केली.
****
जरांगे-पाटील यांच्या मुंबईतल्या आझाद
मैदानावरील उपोषणाला,
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भेट दिली. जरांगे यांच्या तब्बेतीची विचारपूस करून
त्यांना काळजी घेण्याचं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. मराठा आंदोलनाच्या
संदर्भात तातडीनं तोडगा काढण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे, अशी
प्रतिक्रीया काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी नोंदवली आहे.
****
शासनाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या
विविध योजना गावात प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामविकास विभागातर्फे 'मुख्यमंत्री
समृध्द पंचायतराज अभियान'
राबवण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी गावातल्या लोकांनी
ग्रामपंचायतीचा थकीत कर एकरकमी भरल्यास त्यांना थेट ५० टक्के सवलत देण्याची ग्वाही
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे, ते
आज सोलापूर इथं बोलत होते.
****
अभिनेत्री प्रिया मराठे यांचं आज पहाटे
मुंबईत निधन झालं. त्या ३८ वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या
कर्करोगानं ग्रस्त होत्या. विघ्नहर्ता महागणपती, किरण कुलकर्णी
व्हर्सेस किरण कुलकर्णी,
ती आणि इतर, दिल तो बच्चा है जी या
चित्रपटांमध्ये तसंच गाजलेली हिंदी टी व्ही मालिका पवित्र रिश्ता, तर
तुझेच मी गीत गात आहे,
तू तिथे मी, या सुखांनो या, तू
भेटशी नव्याने या मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरण पाणलोट
क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळं आणि धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या
दृष्टीनं आज दुपारी धरणाच्या सांडव्याची दोन दारं उघडण्यात आली आहेत. धरणाच्या
सांडव्याच्या चार दारांतून मांजरा नदीपात्रात तीन हजार ४९४ पूर्णांक २८ दशलक्ष
घनफुट प्रतिसेकंद या वेगानं पाणी सोडणं सुरू आहे. नदी काठावरच्या गावातल्या
नागरीकांनी खबरदारी घ्यावी,
असं आवाहन मांजरा प्रकल्प धनेगाव पुरनियंत्रण कक्षातर्फे
करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment