Monday, 1 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.12.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 December 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      संसदेचं आजपासून हिवाळी अधिवेशन, १३ विधेयकांवर होणार चर्चा

·      युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन

·      राज्यातल्या २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान

·      एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी विजय, विराट कोहलीचं विक्रमी ५२ वं शतक

आणि

·      मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात पुढील दोन दिवस थंडीची लाट

****

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. १९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण १५ बैठका होतील. या अधिवेशनात १३ विधेयकं चर्चेला येणार असून, २०२५-२६ साठीच्या अनुदानासाठी पुरवणी मागण्यांवरील चर्चा आणि मतदानही होणार आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला ३६ राजकीय पक्षांचे ५० नेते उपस्थित होते. अधिवेशनात अनेक नवीन विधेयकं आणली जाणार असून, संसदेचं कामकाज सुरळीत चालावं अशी भूमिका सरकारतर्फे मांडण्यात आली. ही सर्वपक्षीय बैठक अत्यंत फलदायी ठरली असून, सर्व पक्षांनी मांडलेल्या सूचनांचा सरकार विचार करेल, असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं.

****

युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते काल देशवासियांशी संवाद साधत होते. या कार्यक्रमाचा १२८वा भाग काल प्रसारित झाला. ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ ची भावना बळकट करणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

क्रीडा क्षेत्रातल्या यशाचा उल्लेखही त्यांनी केला. महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद, जपानमध्ये झालेली मूकबधिरांची ऑलिम्पिक स्पर्धा, तसंच जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारतानं मिळवलेलं यश याविषयी त्यांनी सांगितलं. दृष्टीहीन महिलांनी जिंकलेला पहिलाच टी– ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक म्हणजे देशाच्या क्रीडा इतिहासातल्या सर्वात मोठ्या यशांपैकी एक असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

काही दिवसांपूर्वीच साजरा झालेला संविधान दिन, तसंच वंदे मातरम् या गीताला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल देशभरात होत असलेले कार्यक्रम, अयोध्येत राम मंदिरावर धर्मध्वजाचं आरोहण, कुरुक्षेत्रातल्या पांचजन्य स्मारकाचं लोकार्पण याविषयी पंतप्रधानांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवानिमित्तानं विविध देशांत झालेल्या कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. अन्नधान्याच्या उत्पादनात देशाने केलेला विक्रम, देशाचा गौरव वाढवणाऱ्या सांस्कृतिक आणि इतर घडामोडींचाही त्यांनी मन की बात मध्ये उल्लेख केला.

आगामी नाताळ आणि नवीन वर्षाच्या खरेदीसाठीही नागरिकांनी देशात बनवलेल्या वस्तुंची खरेदी करावी असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

****

राज्यातल्या २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. यासाठी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा राज्यभर प्रचार करत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण, आणि बीड नगरपरिषदेत प्रचारसभा घेणार आहेत.

बीड जिल्ह्यात बीड, गेवराई, माजलगाव, धारूर, परळी आणि अंबाजोगाई या सहा नगरपरिषदांमध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हाभरात एकूण ४३४ मतदान केंद्रं उभारण्यात आली असून, सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. परळी नगरपरिषदेतले दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत, तर गेवराई नगरपरिषद निवडणुकीतल्या एका उमेदवाराचं निधन झाल्यामुळे एका प्रभागातली निवडणूक स्थगित केली आहे.

**

दरम्यान, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा प्रचार आज रात्री १० वाजता संपणार आहे. त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. त्यामुळे उद्या मतदानाच्या दिवशी मुद्रित माध्यमांतदेखील जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असं राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

**

दरम्यान, न्यायालयीन अपील झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सुधारित निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने काल जाहिर केला. यानुसार त्यानुसार १० डिसेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून, आवश्यकता भासल्यास २० डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून,

‘‘राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी चार नोव्हेंबरला निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता, या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्रांची छाननी झाल्यानंतर आक्षेप असलेल्या उमेदवाराला जिल्हा न्यायालयात अपील करण्याची तरतूद आहे. यानुसार उच्च न्यायालयात काही प्रकरणात याचिका दाखल झाल्या आहेत. या अपिलांवरील निकाल २२ नोव्हेंबर पर्यंत लागणं अपेक्षित होतं, जेणेकरुन संबंधित उमेदवारला त्याचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कायद्यातील तरतुदीनुसार तीन दिवसांचा कालावधी मिळाला असता, त्यानंतर २६ नोव्हेंबरला वैधरित्या नामनिर्देशीत उमेदवाराला निवडणूक चिन्ह वाटप करणं नियमानुसार योग्य ठरलं असतं. मात्र काही नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्यांनी अशा उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देताच निवडणूक चिन्हाचं वाटप केल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी केलेली चिन्ह वाटपाची कार्यवाही नियमबाह्य ठरते. या सगळ्या बाबींचा विचार करता सुधारित कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.’’

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर आणि गंगापूर मधल्या प्रत्येकी दोन जागा, तर पैठण नगरपरिषदेतल्या चार जागांवर नव्याने निवडणुका होणार आहेत.

नांदेड जिल्ह्यात मुखेड आणि धर्माबाद नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया नव्याने होणार असून, भोकर, लोहा आणि कुंडलवाडी नगरपालिकेतल्या प्रत्येकी एका प्रभागाचं मतदानही पुढे ढकलण्यात आलं आहे.

हिंगोली जिल्ह्यात वसमत नगरपरिषदेची तर हिंगोली नगर परिषदेतल्या दोन प्रभागांची निवडणूक, तसंच धाराशिव नगरपरिषदेतल्या तीन जागांची निवडणूक नव्या कार्यक्रमानुसार होणार आहे.

परभणी जिल्ह्यात जिंतूरमधल्या एक, तर पूर्णा मधल्या दोन जागा, बीड जिल्ह्यात परळी मधल्या पाच, अंबाजोगाई मधल्या चार, तर बीड आणि धारुर मधल्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.

****

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी – एनडीएच्या एकशे एकोणपन्नासाव्या तुकडीचा दिमाखदार दीक्षांत संचलन सोहळा काल पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानात पार पडला. नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी संचलन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आज तंत्रज्ञानात वेगाने बदलत असून, या बदलत्या जगाला सामोरं जाण्यासाठी आत्मविश्वास, धैर्य आणि तुमची शिस्त हे तीन सद्गुण यशस्वी होण्यासाठी उपयोगी पडणार आहेत, असं नौदल प्रमुखांनी यावेळी सांगितलं.

****

क्रिकेट

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारताने १७ धावांनी जिंकलं. काल रांची इथं झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत विराट कोहलीच्या १३५ धावांच्या बळावर ३४९ धावा केल्या. के एल राहुलने ६०, रोहित शर्माने ५७ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा संघ शेवटच्या षटकात ३३२ धावांवर सर्वबाद झाला. कुलदिप यादवने चार, हर्षित राणाने तीन गडी बाद केले. विराट कोहलीला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात अला. कोहलीचं हे ५२वं शतक असून, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो सर्वाधिक शतक करणारा फलंदाज ठरला आहे.

****

धाराशिव नगरपालिकेत २०१६ ते २०२२ या काळात जवळपास २०० ते २५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी काल पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. महालेखापाल यांनी केलेल्या लेखापरीक्षणा अहवालात या भ्रष्टाचाराची नोंद झाली असून, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि तत्कालीन नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर हे तिघेही यावर काहीच बोलत नाहीत, यांच्याकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही, असं ते म्हणाले.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या १९व्या गोविंदभाई श्रॉफ संगीत महोत्सवाचा काल समारोप झाला. ज्येष्ठ कीर्तनकार गायक चारुदत्त आफळे यांनी या समारोप सत्रात नाट्यसंगीताची वाटचाल या विषयावर सादरीकरण केलं. त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध नाट्यगीते यावेळी सादर केली. आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी पंडित गिरीश गोसावी यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

****

नांदेड जिल्ह्यात वन विभागानं बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पंधरा पथकं तैनात केली आहेत. नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असं आवाहन जिल्हा उपवनसंरक्षक केशव वाबळे यांनी केलं आहे.

****

राज्यात कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट झाली. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किंचित घट झाली. येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. काल पुणे इथं ९ पूर्णांक ८, नाशिकमध्ये ९ पूर्णांक ९ तर धाराशिवमध्ये १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: