Thursday, 4 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.12.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 December 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

·      राज्य विधिमंडळाचं येत्या आठ डिसेंबरपासून नागपूर इथं हिवाळी अधिवेशन

·      केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर अतिरीक्त उत्पादन शुल्क लावण्याची विधेयकात तरतूद

·      समाज माध्यमांचा दुरुपयोग आणि फेक न्यूजवर कठोर कारवाईची गरज केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून व्यक्त

·      दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय, मालिकेत साधली बरोबरी

आणि

·      खान्देश तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पुढचे तीन दिवस थंडीचा यलो अलर्ट

 

****

राज्यात अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.  अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं प्रस्तावच पाठवला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला, त्यावर मुख्यमंत्री बोलत होते. संसदेच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही बाब उघड झाल्याचा दावाही विरोधकांनी केला होता. मात्र, तारांकित प्रश्न हे ३५ दिवसांपूर्वी दाखल केले जातात, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. पायाभूत सुविधांबाबतचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं.

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आठ डिसेंबरपासून नागपूर इथं सुरूवात होणार आहे. मुंबईत विधान भवनात काल झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १४ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात १३ तसंच १४ डिसेंबरला शासकीय सुट्टीच्या दिवशीही कामकाज होणार आहे.

****

केंद्रीय उत्पाद शुल्क सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक चर्चेसाठी सदनासमोर सादर केलं. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर अतिरीक्त उत्पादन शुल्क लावण्याची तरतूद या विधेयकात आहे. वस्तू आणि सेवा कर-जीएसटीतला अधिभार रद्द झाल्यावर, तंबाखू, सिगारेट, सिगार, हुक्का, जर्दा, सुगंधी तंबाखू यासारख्या गोष्टींवर हे अतिरीक्त उत्पादन शुल्क लागू होईल. सध्या या वस्तूंवर २८ टक्के जीएसटी लागू आहे.या विधेयकातल्या तरतुदीमुळे सिगारेटवर पावणे तीन ते ११ रुपये तर तंबाखूवर किलोमागे शंभर रुपये उत्पादन शुल्क लागण्याची शक्यता आहे.नागरिकांनी या उत्पादनांचा उपयोग कमी करावा यासाठी हे शुल्क लावलं जात असल्याचं सीतारामन यांनी या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं.

**

समाज माध्यमांचा दुरुपयोग आणि फेक न्यूज या दोन्ही बाबींवर कठोर कारवाईची गरज केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली आहे. ते काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. ए आय निर्मित आक्षेपार्ह साहित्यावरही कठोर कारवाई आवश्यक असल्याचं वैष्णव यांनी नमूद केलं.

**

देशभरात सध्या १६४ वंदे भारत रेल्वेगाड्या धावत असून, त्यापैकी २४ गाड्या महाराष्ट्रात सेवा देत आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. यामध्ये नांदेड – मुंबई आणि मुंबई – साईनगर शिर्डी या गाड्यांचा समावेश आहे.

**

देशात आठ लाखाहून अधिक सहकारी संस्था असून, त्यापैकी सुमारे सव्वा दोन लाख सहकारी संस्था महाराष्ट्रात असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ते काल राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. एन सी ओ एल ने पंजाबराव देशमुख कृषी अभियानांतर्गत अकरा संस्थांसोबत करार केला असून, त्या माध्यमातून विविध कृषी उत्पादनांची खरेदी तसंच निर्यात केली जात असल्याची माहिती मोहोळ यांनी दिली.

**

पानमसाल्याच्या प्रत्येक पाकिटावर किरकोळ किंमत छापणं अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने याबाबतचा आदेश लागू केला. येत्या एक फेब्रुवारीपासून हा नियम सर्वच कंपन्यांना बंधनकारक असणार आहे. यापूर्वी १० ग्रॅम पेक्षा कमी वजनाच्या पाकिटावर किंमत लिहिणं बंधनकारक नव्हतं.

****

दिव्यांग व्यक्तींना समानतेची वागणूक देणारा समाजच खऱ्या अर्थाने विकसित म्हणता येईल, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. दिव्यांग सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना, काल आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनी, राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या.

महाराष्ट्रातल्या अबोली जरीत, भाग्यश्री नडीमेताला, धृती रांका आणि देवांगी दलाल या चार जणींना या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी सन्मानित केलं. दिव्यांगजनांनी विविध क्षेत्रांमध्ये, विशेषतः खेळांमध्ये मिळवलेलं यश म्हणजे सर्वांसाठी प्रेरणास्रोत असल्याचं सांगून गेल्या वर्षीच्या पॅरालिम्पिक्समध्ये २९ पदकं पटकावणाऱ्या भारतीय चमूचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं.

**

दिव्यांग दिनानिमित्त लातूर इथं आयोजित दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या हस्ते झालं. बालकांमधल्या दिव्यांगत्वाचं निदान करून त्यांना वेळीच उपचार उपलब्ध करून देण्यासाठी अंगणवाडीस्तरावर विविध उपक्रम हाती घेण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं. या स्पर्धेत जिल्ह्यातल्या ५७ दिव्यांगांच्या शाळांमधल्या ३३५ विद्यार्थ्यांनी विविध कलांचं सादरीकरण केलं.

**

छत्रपती संभाजीनगर इथं विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या दिव्यांगांचा तसंच दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा काल सत्कार करण्यात आला. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या सर्वांना गौरवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडूनही दिव्यांग विद्यार्थी आणि दिव्यांग मित्र यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

****

ज्येष्ठ सामाजिक कायकर्ते पन्नालाल सुराणा यांचा पार्थिव देह काल सोलापूर वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला. सुराणा यांचं परवा मंगळवारी निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार देहदान करण्यात आलं. राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष असलेले सुराणा यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत…

बाईट-सुराणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुराणा यांना श्रद्धांजली अर्पण केली. समाजकारण आणि राजकारणातील निस्पृहतेचा आदर्श काळाच्या पडद्याआड गेला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.

****

बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या रॅपीडो, उबेर सारख्या ॲप आधारित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. अवैध बाईक टॅक्सी वरुन जाताना एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली असून, याबाबतच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारीची दखल घेत, सरनाईक यांनी हे निर्देश दिले.

****

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानापोटी सरकारने जाहीर केलेल्या अनुदानापैकी एक हजार २७८ कोटी रुपये दिवाळीपासून आजवर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे.

****

रायपूर इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा चार गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने निर्धारित षटकात पाच बाद ३५८ धावा केल्या. ॠतुराज गायकवाडने १०५, तर विराट कोहलीने ९३ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चार चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य साध्य केलं. अर्शदीप सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक – एकनं बरोबरीत असून, तिसरा आणि निर्णायक सामना परवा सहा तारखेला विशाखापट्टणम इथं खेळला जाणार आहे.

****

राज्यात खानदेश तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना दोन दिवस थंडीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात काल सर्वात कमी नऊ पूर्णांक सात अंश सेल्सियस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल नाशिक इथ दहा अंश तर बीड इथं साडे दहा अंश तापमानाची नोंद झाली. पुणे तसंच नागपुरात सुमारे साडे अकरा अंश, धाराशिव – ११ पूर्णांक नऊ, छत्रपती संभाजीनगर – १२ पूर्णांक दोन, तर परभणी इथं १३ अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं. 

****

 

No comments: