Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 05
December 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ डिसेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो
दरात पाव टक्क्यांची कपात केली असून, रेपो दर आता पाच पूर्णांक
२५ टक्के इतका झाला आहे. बँकेच्या द्वैमासिक पतधोरण समितीच्या आढावा बैठकीनंतर गव्हर्नर
संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली. यासोबतच स्थायी ठेव सुविधा दर पाच टक्क्यांवर
निश्चित केला जाईल, तर सीमांत स्थायी सुविधा दर आणि बँक दर पाच पूर्णांक पाच
टक्क्यांवर समायोजित करण्यात येतील. सहा सदस्यीय समितीने या दर कपातीसाठी सर्वानुमते
सहमती दर्शवली, असं मल्होत्रा यांनी सांगितलं. आरबीआयने आर्थिक वर्ष २०२५–२६ साठीचा एकूण देशांतर्गत
उत्पन्न – जीडीपी वाढीचा अंदाज आधीच्या सहा पूर्णांक आठ टक्क्यांवरून वाढवून सात पूर्णाक
तीन टक्के केला आहे, हा आरबीआयच्या आधीच्या अंदाजापेक्षा सुमारे अर्धा टक्का
अधिक असल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं.
दरम्यान, महागाईचा अंदाजही
सुधारित करण्यात आला असून, २०२५–२६ साठीचा अंदाज दोन पूर्णांक सहा टक्क्यांवरून कमी
करून दोन टक्के करण्यात आला आहे. महागाईत लक्षणीय घट झाली असून, पुढील काळात
त्यात आणखी कपात आणि शिथिलता अपेक्षित असल्याचं, मल्होत्रा यांनी सांगितलं.
****
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर
पुतीन यांचं आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी औपचारिक स्वागत केलं.
यावेळी पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी राजघाट
इथं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं.
पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक सुरु आहे.
****
तमिळनाडूत मदुराईतल्या एका
मंदिरातल्या दीपप्रज्वलन प्रकरणावरून द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या
गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आज बाधित झालं. कामकाज सुरु होताच विरोधी पक्षातल्या सदस्यांनी
सभागृहाच्या होद्यात उतरुन घोषणाबाजी सुरु केली. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून
सरकारचा याच्याशी काहीही संबंध नाही, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिरला
यांनी सांगितलं. सदस्यांनी आपल्या जागेवर बसावं आणि सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू द्यावं, असं आवाहन
त्यांनी केल. मात्र विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्याने लोकसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत
स्थगित झालं होतं. राज्यसभेतही या प्रकरणावरून डी.एम.के. तसंच इतर विरोधी पक्षांच्या
सदस्यांनी सभात्याग केला.
****
आतापर्यंत एक लाख ५१ हजारांहून
अधिक वक्फ मालमत्ता ‘उम्मीद’ पोर्टलवर नोंदवण्यात आल्या आहेत, अशी माहीती
अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. ते आज दिल्ली इथं पत्रकारांशी बोलत
होते. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर मंत्रालयानं हे पोर्टल सुरू केलं असून, संबंधित पक्षांना
सर्व वक्फ मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता, असही त्यांनी
स्पष्ट केलं.
दरम्यान, आज नोंदणीसाठीचा
अखेरचा दिवस असून, अद्याप लाखो मालमत्ता नोंदणीकृत झालेल्या नाहीत, असे रिजिजू
यांनी सांगितलं. पुढच्या तीन महिन्यांपर्यंत ‘उम्मीद’ पोर्टलवर नोंदणी करणाऱ्यांवर
कोणताही दंड आकारला जाणार नाही किंवी कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, अस आश्वासन
त्यांनी दिलं.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत महावितरणने
एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषिपंप लावण्याचा जागतिक विक्रम नोंदवला, या विक्रमाची
गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं शेंद्रा औद्योगिक परिसरातल्या
ऑरिक सिटी मैदानावर, आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गिनीज बुकतर्फे
विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा होणार आहे.
****
महायुती सरकारच्या एक वर्षांच्या
कार्यकाळानिमित्त मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
यांनी राज्यातल्या विकासकामांचा आढावा घेतला. यामध्ये शेतकरी, गुंतवणूक, पायाभूत सुविधा
आणि महिला सक्षमीकरण यासह विविध क्षेत्रातील उपक्रमांची माहिती देण्यात आली. अतिवृष्टीग्रस्तांना
३२ हजार कोटींपेक्षा अधिक मदत, शेतकरी सन्मान, नमो सन्मान, सौर कृषी पंप
योजनेद्वारे उत्पन्नवाढ, जलशिवार, नदीजोड, मराठवाडा ग्रीडद्वारे
जलसंधारणाची कामं, पाच वर्षांत २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट, पायाभूत सुविधा
विकासासाठी वेगवान निर्णय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, उमेद मोल सारखे
उपक्रम आदी सरकारच्या विविध निर्णयांची चव्हाण यांनी माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सर्वांगीण आणि चौफेर विकासाचा वेग वाढल्याचं
त्यांनी नमूद केलं.
****
जालना एटीएस पथक आणि अंबड
पोलिसंनी काल संयुक्त कारवाई करत अंबड तालुक्यातल्या कौचलवाडी शिवारातून सुमारे एक
कोटी रुपयांचा चार क्विंटल गांजा जप्त केला आहे. गोपनीय माहिती आधारे पथकाने ढवळीराम
चरावंडे या शेतकऱ्याच्या शेतात छापा टाकून ही कारवाई केली तेव्हा गांजाची काढणी सुरू
होती. तर काही गांजा विक्रीसाठी वाळून ठेवण्यात आला होता. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात
अंमली पदार्थ विरोध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
मध्य रेल्वेवरच्या दुरांतो, वंदे भारत
आणि राजधानी गाड्यांच्या तत्काळ तिकीट आरक्षणासाठी उद्या शनिवारपासून ओटीपी आवश्यक
असेल.
****
No comments:
Post a Comment