Tuesday, 30 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.12.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 December 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

·      मराठवाड्यातील पाच महापालिकांमध्ये बहुतांश राजकीय पक्षांचा स्वतंत्र निवडणूक लढवण्यावर भर

·      अरावली टेकड्यांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

·      हिंगोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का

आणि

·      राज्यात बहुतांश भागात किमान तापमानात घट

****

राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांमध्ये पक्षांतर तसंच युती सारख्या हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी स्थानिक घटकांवर जोर देत वेगवेगळ्या तडजोडी करत आहेत.

****

मराठवाड्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत तिढा कायम असून, अनेक पक्षांचे उमेदवार जाहीर झाले नाहीत.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत जागा वाटपावरुन भाजप – शिवसेनेत मदभेत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या काही उमेदवारांची घोषणा करत युतीतून बाहेर पडली आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ हे नाराज असून, त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.

परभणी महानगरपालिकेत वेगळा पॅटर्न समोर आला आहे. याठिकाणी महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांची युती असून, दोन्ही राष्ट्रवादी मिळून एक आघाडी, तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांची तिसरी आघाडी झाली आहे.

जालना महानगरपालिकेत महायुतीमधल्या भाजप आणि मित्रपक्षांच्या जागा वाटपाचं सूत्र अद्यापही न ठरल्याने युती होणार की नाही याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जागा वाटप निश्चित करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या मॅरेथान बैठका सुरू आहेत.

दरम्यान, जालन्यात काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. काल एकाच दिवशी शहरातल्या १६ प्रभागांतून २५२ अर्ज दाखल झाले.

नांदेडमध्ये देखील महायुतीसह महाविकास आघाडीचीही अद्याप घोषणा झाली नाही. भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांकडून चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, नांदेड महापालिकेच्या वीस प्रभागातल्या ८१ जागांसाठी आतापर्यंत ३०२ अर्ज दाखल झाले आहेत.

एमआयएम पक्षाने नांदेड महानगरपालिकेसाठी २० उमेदवारांची पहिली यादी काल जाहिर केली.

लातूर महानगरपालिकेतही महायुती आणि महाविकास आघाडी मधल्या पक्षांनी स्वंतत्र लढण्याची तयारी सुरु केली आहे.

दरम्यान, लातूर महापालिकेत चार दिवसांत दोन हजार ३७३ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली असून, १५६ अर्ज दाखल झाले आहेत.

****

मुंबईसाठी काँग्रेसने ८७ उमेदवारांची, राष्ट्रवादी काँग्रेसने २७ उमेदवारांची दुसरी, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काल सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. काँग्रेससोबत निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षानं मुंबईसाठी सहा उमेदवार जाहीर केले. तर महायुतीने रिपब्लिकन पक्षाला किमान १६ जागा द्याव्यात, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

मनसेने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म द्यायला काल सुरूवात केली. त्याआधी राज ठाकरे यांनी एका बैठकीत पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. कोविड महामारीच्या काळात महाविकास आघाडीने केलेल्या कामगिरीची माहिती यात दिली आहे.

****

शिवसेनेनं प्रकाश महाजन यांची प्रवक्ते पदी नियुक्ती केली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. महाजन यांनी नुकताच मनसे मधून शिवसेनेत प्रवेश केला.

****

परभणी महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी शहरातल्या १४६ ठिकाणी ३४१ बुथ तयार करण्यात आले आहेत. या बुथवर राखीव कर्मचाऱ्यांसह अठराशे मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान केंद्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. नियुक्त कर्मचाऱ्यांना पाच जानेवारीला पहिलं प्रशिक्षण तर १० जानेवारीला दुसरं प्रशिक्षण देण्यात येणार असून, यासाठी ७९ झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

****

अरावली डोंगररांगांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. अरावली पर्वत रांगांच्या नव्या व्याख्येवरून पर्यावरण तज्ज्ञ आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंतेची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली, काल याप्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती ए जी मसीह आणि जे के महेश्वरी यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. अरावली टेकड्यांच्या नव्या व्याख्येबाबत काही गोष्टी स्पष्ट करणं आवश्यक आहे, आधीच्या समितीच्या शिफारशींची पडताळणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल, ज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश असेल असं न्यायालयानं सांगितलं.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं.

****

येत्या एक जानेवारीला होणाऱ्या भीमा कोरेगाव शौर्यदिन विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था आखली आहे. याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत माहिती दिली. पेरणे फाटा परिसरात तब्बल सहा हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक नियोजनासाठी २० ते २२ पार्किंग स्थळं निश्चित करण्यात आली असून, एक जानेवारी रोजी पेरणे फाटा परिसरातले रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. नागरिकांना शटल सेवेच्या माध्यमातून विजयस्तंभ परिसरात पोहोचता येणार आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात वसमत, औंढा आणि कळमनुरी तालुक्यातल्या गावांना आज पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला. दांडेगाव, रामेश्वर तांडा, आखाडा बाळापूर, पोत्रा, कवडा, बोल्डा, पांगरा, वापटी, पिंपलदरी सह अनेक भागात हा तीव्र धक्का जाणवल्यानं, नागरिक भयभीत झाले आहेत. अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीड जिल्ह्यात मांजरसुंबा महसूल मंडळातल्या मौजे मोरगाव इथं तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी अतिक्रमणासोबतच शेतातील रस्त्याची पाहणी केली. त्यांनी मंडळस्तरीय आढावा बैठक घेत शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या. अतिक्रमण तसंच शेतातल्या रस्त्याच्या तक्रारी मिळताच त्यांनी कर्मचाऱ्यांसह जागेवर पाहणी केली आणि रस्ता खुला करून देण्याचं आश्वासन दिलं. विविध शासकीय प्रमाणपत्रे आणि लाभपत्रांचं वाटपही यावेळी करण्यात आलं. प्रशासन जर गावात उतरलं, तर समस्या जागेवरच सुटतात, असा विश्वास या उपक्रमातून निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

****

लातूर जिल्ह्यातल्या शिरुर अंनतपाळ इथं महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसंच श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालयाच्या वतीनं आयोजित ग्रंथरसिक साहित्य संमेलन काल पार पडलं. प्राचार्य नागोराव कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात ग्रंथादिंडी, ज्येष्ठ साहित्यिक धनंजय गुडसूरकर यांची प्रकट मुलाखत, कवी संमेलन, परिसंवाद आणि कार्यक्रम पार पडले.

****

धाराशिव जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत प्रत्येक तालुक्यातून प्रथम पाच ग्रामपंचायतींची निवड झालेल्या गावांमध्ये आज आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये नागरिकांना पूर्णपणे मोफत आरोग्य सेवा दिल्या जाणार आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरीदास यांनी नागरीकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन  केलं आहे. 

****

नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा शिवसेना दक्षिण विधानसभा प्रमुख अशोक पाटील उमरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी खासदार तथा लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत आज हा पक्षप्रवेश झाला.

****

तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवा दरम्यान काल तुळजाभवानी मातेची  रथ अलंकार महापूजा मांडली होती. तसंच रात्री छबिना काढण्यात आला. भगवान सूर्यनारायणांनी श्री देवीस त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला, त्या प्रसंगाची आठवण म्हणून रथ अलंकार महापूजा मांडली जाते.

****

लातूर-कल्याण प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाचा मूळ मार्ग हा बीड जिल्ह्यातूनच जावा, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. सोनवणे यांनी याबाबतचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं. या महामार्गामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक, शेतीपूरक आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार असून, या महामार्गाच्या माध्यमातून व्यापार, उद्योग आणि रोजगारनिर्मितीसाठीच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं सांनवणे यांनी पत्रात नमूद केलं आहे.

****

भारतीय कापूस महामंडळाच्या खरेदी केंद्राच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरता राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी काल अचानक धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा इथल्या कापूस खरेदी केंद्राला भेट दिली. यावेळी रावल यांनी कापूस नोंदणी, स्लॉट बुकिंग आणि प्रत्यक्ष खरेदी प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या अडचणी तात्काळ सोडवण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

****

राज्यात विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. राज्यात काल सर्वात कमी सात पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं नऊ पूर्णांक नऊ, छत्रपती संभाजीनगर दहा पूर्णांक पाच, तर धाराशिव इथं १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: