Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 31 December 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ डिसेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज
छाननी, दोन जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत
·
राज्यासह मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी महायुती आणि महाविकास
आघाडीतील पक्षांचा स्वतंत्र निवडणूक लढवण्यावर भर
·
२०२५ हे देशात सुधारणांचं वर्ष म्हणून ओळखलं जाईल, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
·
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साह, हॉटेल-रेस्टॉरंट
पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी
आणि
·
श्रीलंकेविरुद्धच्या टी-ट्वेन्टी क्रिकेट मालिकेत भारतीय
महिला संघाचं निर्भेळ यश, मालिकेत ५-० ने विजय
****
राज्यातल्या
महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी होणार आहे. अनेक ठिकाणी
युती आणि आघाडीचा निर्णय होऊन, काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या
दिवशी उमेदवार जाहीर झाले. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी सगळीकडेच मोठी गर्दी पाहायला
मिळाली.
आज छाननी
झाल्यानंतर दोन जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील, तीन जानेवारीला
निवडणूक चिन्हाचं वाटप होईल, आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध
होईल. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
**
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरसह
एकूण १४ महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना युती तुटली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नांदेड,
अमरावती, मालेगाव, अकोला,
मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली आणि जालना
या महापालिकांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये
तिरंगी किंवा बहुरंगी लढती रंगण्याची शक्यता आहे.
मुंबईसह
कोल्हापूर, इचलकरंजी, ठाणे, कल्याण-डोंबिवली
आणि पनवेल इथं शिवसेना–भाजप युती अधिकृतपणे झाली आहे.
**
छत्रपती
संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असल्याची माहिती, शिवसेना नेते
तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. युतीसंदर्भात दोन्ही पक्षांमध्ये
नऊ बैठका झाल्या, मात्र भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांमुळे
युती तुटल्याचा आरोप शिरसाठ यांनी केला. तर, भारतीय जनता पक्ष
युतीसाठी तयार होता. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेच्या निरापोची वाट पाहिल्याचं
भाजप नेते तथा मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर
महापालिकेत एकूण एक हजार ८७० उमेदवारी अर्ज दाखल झाले.
**
जागा वाटपावर
एकमत न झाल्यानं जालन्यातही भाजप – शिवसेना युती अखेर तुटली. भाजपा नेते माजी आमदार
कैलास गोरंट्याल यांनी काल याबाबत माहिती दिली. भाजप ३५ आणि शिवसेना ३० या सूत्रानुसार
जागा वाटपावर एकमत न झाल्यानं युती तुटल्याचं त्यांनी सांगितलं.
**
लातूर महानगरपालिकेतही
भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस युती होऊ शकली नाही. सर्व ७० जागांवर भाजपच्या उमेदवारांनी
अर्ज दाखल केले.
**
नांदेडमध्ये
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र
येत असल्याची घोषणा काँग्रेसचे निवडणूक प्रभारी माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी केली.
महापालिकेतल्या २० प्रभागातल्या ८१ जागांसाठी ९०१ उमेदवारांनी एक हजार २०३ अर्ज दाखल
केले.
**
मुंबई महानगरपालिका
निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटपाचं सूत्र निश्चित होऊन १३७ जागी भारतीय जनता पक्षाचे
उमेदवार तर ९० जागी शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. रिपब्लिकन पक्षाला जागावाटपातून
वगळल्याबद्दल पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त करत
३९ जागांवर मैत्रीपूर्ण लढतीसाठी उमेदवार जाहीर केले. त्यानंतर भाजप नेते प्रविण दरेकर
यांनी आठवले यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाच्या स्वबळावर
लढणा-या ३८ उमेदवारांपैकी मेरीटच्या १५ जागांना महायुतीतुन पाठिंबा देण्याचा निर्णय
घेण्यात आला. रिपब्लिकन पक्षाला निवडक जागा सोडण्याबाबतची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत घेण्यात येणार असल्याची माहिती
दरेकर यांनी दिली.
दुसरीकडे
काँग्रेससोबत आघाडीमधे लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला वीस जागांसाठी उमेदवार कमी पडले.
आघाडीमधे त्यांच्या वाट्याला ६२ जागा आल्या होत्या. उमेदवार न मिळाल्यामुळे वीस फॉर्म
त्यांनी परत पाठवल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसने तीस
उमेदवारांची तिसरी यादी काल जाहीर केली.
****
२०२५ हे
वर्ष देशात सुधारणांचं वर्ष म्हणून ओळखलं जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. वर्षअखेरीस लिहिलेल्या विशेष लेखातून त्यांनी भारताच्या वेगवान प्रगतीचा आढावा
घेतला. भारत आज जगाच्या आकर्षणाचं केंद्र बनला असून, जग आशा आणि
विश्वासानं भारताकडे पाहत असल्याचं त्यांनी नमूद केलं. पुढच्या पिढीच्या सुधारणांना
गती मिळाली असून, युवा पिढी आणि देशबांधवांची दुर्दम्य इच्छाशक्ती
ही या विकासाची खरी ताकद असल्याचं ते म्हणाले. या लेखात त्यांनी २०२५ मध्ये राबवलेल्या
जीएसटीसह विविध क्षेत्रांतील सुधारणांचा उल्लेख केला. कामगार कायदे आणि व्यापारी करारांमुळे
उद्योग, ऊर्जा आणि आर्थिक क्षेत्राला मोठा लाभ होणार असून,
यामुळे ‘विकसित भारत’ संकल्पनेला बळ मिळेल, असंही
त्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधानांनी परदेशी गुंतवणूकदारांना भारतावरचा विश्वास कायम
ठेवून देशात आणि भारतीय जनतेत गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं.
****
ननवर्षाच्या
स्वागतासाठी आज सर्वत्र उत्साहाचं वातावरण असून, विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त आज राज्यातल्या खाद्यागृह, हॉटेल, रेस्टॉरंट आणि ऑर्केस्ट्रा बार या आस्थापना उद्या
पहाटे पाच वाजेपर्यंत खुल्या ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरवर्षी या आस्थापनांकडून
येणारी मागणी मंजूर करण्यात आली.
**
नाताळ सुट्या, नववर्ष आणि
शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे चार वाजेपासून
भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. तर, वणी इथलं श्री सप्तशृंगी
देवीचं मंदिर २४ तास खुलं राहणार आहे. चार जानेवारीपर्यंत होणारी गर्दी लक्षात घेऊन
हा निर्णय घेण्यात आल्याचं मंदिर देवस्थानच्या वतीनं सांगण्यात आलं.
शिर्डी
इथलं साईबाबा मंदिरही आज रात्रभर खुलं असणार असल्याचं संस्थान प्रशासनाचे मुख्य कार्यकारी
अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलं.
**
छत्रपती
संभाजीनगर शहरातही आज मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात ६७ ठिकाणी
तपासणी नाके उभारण्यात आले असून, ८०० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले
आहेत. जागोजागी वाहनांची आणि चालकांची तपासणी केली जाईल, अशी
माहिती पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिली.
****
राज्यातली
शिक्षक भरती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला
आहे. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली
हे कामकाज होईल. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष हे या समितीचे अध्यक्ष असतील तर परीक्षा
परिषदेचे आयुक्त सदस्य सचिव असतील. याशिवाय इतर ३ सदस्य या समितीत असतील. पवित्र पोर्टलच्या
माध्यमातून ही परीक्षा परिषद हे काम करेल.
****
तुळजापूरमध्ये
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवात आज पापनास इथल्या इंद्रायी देवी मंदिरापासून
जलयात्रा काढण्यात येत आहे. दरम्यान, देवीची काल मुरली अलंकार महापूजा बांधण्यात
आली होती.
****
दिव्यांगांसाठी
असलेल्या राज्यातल्या शाळां तसंच कार्यशाळांमधल्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी
सर्वसमावेशक आणि कालबद्ध कार्यपद्घती निश्चित केली असल्याची माहिती दिव्यांग कल्याण
विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली. अशा कर्मचाऱ्यांना समान वेतनश्रेणीतील समकक्ष
पदावर नियुक्ती देण्यात येईल तसंच प्रथम दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, असंही मुंढे
यांनी सांगितलं.
****
महिला क्रिकेटमध्ये, श्रीलंकेला
पाचव्या टी – ट्वेंटी सामन्यातही नमवून भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश
मिळवलं आहे. काल तिरुवअनंतपुरम इथं झालेल्या या शेवटच्या सामन्यात भारतीय महिलांनी
१५ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाकी करत भारताने १७५ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल
श्रीलंकेचा संघ निर्धारित षटकात १६० धावाच करु शकला.
****
दक्षिण
मध्य रेल्वे उद्या एक जानेवारी पासून नवीन वेळापत्रक लागू करत आहे. यानुसार काही रेल्वेगाड्यांच्या
वेळेत बदल करण्यात आला आहे. दीक्षाभूमि एक्सप्रेस, निझामाबाद – पुणे,
पंढरपूर – निझामाबाद, जन शताब्दी, नांदेड-फिरोजपुर, हिसार, साईनगर
शिर्डी, तपोवन, तिरुपती, नगरसोल, वंदे भारत, नागावली एक्सप्रेस
आदी गाड्यांच्या वेळेविषयी माहिती घेण्याचं आवाहन रेल्वे विभागानं प्रवाशांना केलं
आहे.
****
राज्यभर येत्या एक
ते ३१ जानेवारी
दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने
संपूर्ण राज्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. रस्ते अपघातांमध्ये
होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण
करण्याच्या उद्देशाने हा माह साजरा केला जात आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा
महिन्याची संकल्पना “सडक सुरक्षा – जीवन रक्षा” अशी असून, रस्ते सुरक्षा
ही प्रत्येकाच्या जीवनरक्षणाशी निगडित आहे, हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत
पोहोचवण्यावर भर देण्यात येणार असल्याचं परिवहन विभागाकडून सांगण्यात आलं.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या सगरोळी इथं येत्या दोन आणि तीन जानेवारी रोजी संस्कृती संवर्धन मंडळाचे
संस्थापक कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरीय
मुख्याध्यापकांचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment