Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01 August 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ दुपारी १.०० वा.
****
विविध मुद्यांवरुन विरोधकांनी
केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभेत
अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधी पक्षांनी बिहारमधल्या
मतदार याद्यांच्या पुनरिक्षणासह विविध मुद्दे उपस्थित करुन घोषणाबाजी करण्यास
सुरुवात केली. अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरु ठेवण्याचं आवाहन केलं, मात्र तरीही गदारोळ सुरुच
राहील्यानं सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
राज्यसभेत आज कामकाज सुरु
झाल्यावर उपसभापती हरीवंश यांनी, विरोधकांनी दिलेले ३० स्थगन प्रस्ताव फेटाळून लावले.
त्यामुळे विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित
झालं होतं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर बिहारच्या मुद्यावरुन विरोधकांनी पुन्हा
घोषणाबाजी सुरु केली. या गदारोळातच तालिका अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरु
ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र सतत व्यत्यय येत असल्यानं राज्यसभचं कामकाज
दिवसभरासाठी स्थगित झालं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या उत्तरप्रदेशात
वाराणसी इथं जाणार असून, पंतप्रधान
किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. या योजनेअंतर्गत
नऊ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना २० हजार ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक
रक्कम वितरीत केली जाईल. उत्तर प्रदेशातल्या दोन हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास
प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी
स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. यंदाच्या भाषणात कोणते
विषय समाविष्ट व्हावेत, याविषयी
नागरीकांनी MyGov आणि NaMo App वर विचार
शेअर करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात केलं आहे.
****
खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा
आज सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली. यात्रेकरुंना भगवती नगर इथल्या शिबिरांमध्ये ठेवण्यात
आलं आहे. तीन जुलै पासून सुरु झालेल्या या यात्रेत आतापर्यंत चार लाखाहून अधिक भाविकांनी
अमरनाथाचं दर्शन घेतलं आहे.
****
भाषा राजाश्रीत असली तरी ती लोकाश्रीत
असली पाहिजे, संस्कृत
ही हळूहळू बोलचालीची भाषा झाली पाहिजे याकरता प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
नागपूर इथल्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या अभिनवभारती आंतरराष्ट्रीय
शैक्षणिक परिसरात डॉ. केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनाचं लोकार्पण
आज भागवत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
संस्कृत फक्त शासनाच्या ब्रीदवाक्यापुरतीच
मर्यादित न राहता ती जनमानसात रुजावी अशी अपेक्षा फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
संस्कृत विद्यापीठाला जागतिक दर्जाचं विद्यापीठ बनवण्यासाठी मास्टर प्लान सादर करावा
अशी सूचनाही त्यांनी केली.
****
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या
पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. टिळक स्मारक समितीच्या वतीने
देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज पुण्यात ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान
करण्यात येणार आहे.
रत्नागिरीतील टिळक आळी इथल्या टिळकांच्या
जन्मस्थळी त्यांना अभिवादन करण्यात आलं. याठिकाणी असलेल्या टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्याला
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही
रानडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या
जयंतीनिमित्त त्यांना राज्यात सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी आज नागपूर इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
केलं. अण्णाभाऊ साठे यांनी दाखवलेल्या वंचितांच्या विकासाच्या मार्गावर राज्य शासन
चालेल, असं
ते यावेळी म्हणाले.
अण्णाभाऊ साठे यांच्या सांगली जिल्ह्यातल्या
वाटेगाव इथल्या इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यात येणार असून या स्मारकासाठी
२५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या
भानखेडा शिवारात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने वाळूचे टिप्पर पकडल्यानंतर वाळू माफियांनी
ग्राम महसूल अधिकाऱ्यास मारहाण करून टिप्पर पळवल्याची घटना घडली आहे. सेनगाव ते येलदरी
मार्गावर एका टिप्पर मधून वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी
समाधान घुटूकडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी काल रात्री वाळू वाहतूक करणारं टिप्पर पकडलं,
त्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
****
क्रिकेट
भारत आणि इंग्लंड दरम्यान ओवल इथं
सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव सहा बाद २०४ धावांपासून
पुढे सुरु होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. करुन
नायर ५२, तर वॉशिंग्टन सुंदर १९ धावांपासून आज पुढे खेळतील.
****
No comments:
Post a Comment