Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 01 August 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
बँकिंग क्षेत्रातल्या प्रशासनात सुधारणा आणण्यासाठी तसंच ठेवीदार आणि गुंतवणुकदारांना अधिकाधिक संरक्षण देण्याच्या उद्देशानं बँकिंग कायदा सुधारणा अधिनियम २०२५ आजपासून लागू होत आहे. हा कायदा यावर्षी १५ एप्रिलला अधिसूचित करण्यात आला होता. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये लेखापरिक्षणाची गुणवत्ता वाढवणं आणि सहकारी बँकेतले अध्यक्ष, तसंच पूर्णवेळ संचालकांव्यतिरिक्त इतर संचालकांच्या कार्यकाळात वाढ करण्याची तरतूद या विधेयकात आहे. त्याशिवाय यात व्याजाची मर्यादा पाच लाखांवरुन दोन कोटी रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.
****
उपराष्ट्रपतीपदाच्या
निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने काल मतदार यादी प्रसिद्ध केली. संविधानाच्या कलम ६६ एक नुसार लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व
सदस्य उपराष्ट्रपतींची निवड करतात. या
निवडणुकीची अधिसूचना लवकरच
प्रसिद्ध होईल असं निवडणूक आयोगाच्या पत्रकात
म्हटलं आहे.
****
कृष्णा नदीवरच्या अलमट्टी धरणाची
उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटक
सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
केंद्राला केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय
जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना विस्तृत पत्र पाठवलं आहे. या धरणाची उंची वाढवली तर
महाराष्ट्रातल्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह, कृष्णा नदी काठच्या परिसराला
फटका बसू शकतो. अलमट्टी धरणाच्या बॅक
वॉटरमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीबाबत
शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करण्याचं काम महाराष्ट्र शासनानं रुरकीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी यांच्याकडे सोपवलं आहे. याबाबतचा अहवाल
अजून प्राप्त झालेला नाही, तोवर या धरणाची उंची वाढवण्याचा
निर्णय विवेकी ठरणार नाही, असं फडणवीस यांनी या पत्रात
म्हटलं आहे.
****
भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं उद्दीष्ट पूर्ण करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे, राज्याची अर्थव्यवस्था एक
ट्रिलियन डॉलर करण्याच्या दिशेनं राज्य वेगान वाटचाल करत असल्याचं, मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेच्या इन्व्हेस्टमेंट सोल्यूशनचे उपाध्यक्ष अजय कुमार पांडे यांच्यासोबत मुंबईत आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेनं सहकार्य करावं, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. लोकमान्य टिळक
राष्ट्रीय पुरस्कार आज पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात
येणार आहे.
****
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या
जयंतीनिमित्त त्यांना राज्यात सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. अण्णाभाऊ साठे
यांनी दाखवलेल्या वंचितांच्या विकासाच्या मार्गावर राज्य शासन चालेल, असं ते यावेळी म्हणाले.
अण्णाभाऊ साठे यांच्या सांगली
जिल्ह्यातल्या वाटेगाव इथल्या प्रस्तावित स्मारकाच्या
जागेच्या बाबतीतले सर्व दावे इस्लामपूर न्यायालयानं फेटाळून लावले आहेत. त्यामुळे इथं अण्णाभाऊ साठे यांचं
आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला असून, यासाठी २५ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली
आहे.
****
हवामान आधारित फळ पिक विमा
योजनेमध्ये मृग बहार २०२५ मध्ये द्राक्ष, पेरू, लिंबू, संत्रा, चिकू, मोसंबी या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी अंतिम
मुदत १४ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी केंद्र विमा योजना संकेतस्थळाला भेट देऊन
अर्ज करण्याचं आवाहन कृषी मंत्रालयानं केलं आहे.
****
आगामी स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रत्येक माजी खासदार आणि
आमदाराने संघटनात्मक रचनेतील एक -एक मंडल दत्तक घ्यावं, असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र
चव्हाण यांनी केलं आहे. ते काल मुंबईत
प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती आखण्यात येत असून, या बैठकीत संघटनात्मक स्थितीचा जिल्हानिहाय आढावा
घेण्यात आला.
****
भंडारा जिल्ह्यात रोवणी
कामासाठी महिला मजुरांना घेऊन जाणारं वाहन
उलटून झालेल्या अपघातात २१ महिला जखमी झाल्या. लाखनी तालुक्यात
मासलमेटा लाखोरी वळणावर वाहन चालक एका बालकाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. जखमी झालेल्या महिला मजुरांना लाखनी इथल्या ग्रामीण
रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
परभणी कृषी विज्ञान केंद्राच्या
वतीनं आज परभणी जिल्ह्यातल्या कातनेश्वर इथं कापूस उत्पादन वाढीचं नव तंत्रज्ञान
आणि आणि गळ फांदी ओळख, या विषयावर शेती कार्यशाळा घेण्यात आली. कापसाच्या झाडाची वाढ, उंची, खत आणि फवारणी याविषयी यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं.
****
मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत
भारताच्या थरुन मन्नेपल्ली आणि लक्ष्य
सेन यांनी पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या आयुष शेट्टी याला मात्र मलेशियाच्या जस्टीन होह याच्याकडून पराभव पत्करावा
लागला.
****
No comments:
Post a Comment