Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 02
August 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ ऑगस्ट २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान
सन्मान योजनेचा २० वा हप्ता आज जारी करण्यात आला. वाराणसी इथं झालेल्या
कार्यक्रमात २० हजार ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम, नऊ
कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आली. आपलं सरकार
शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
२०१९ मध्ये पीएम किसान योजना सुरु केल्यानंतर विरोधी
पक्षांनी या योजनेबद्दल शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, अशी टीका पंतप्रधानांनी केली. मात्र, सरकारनं या
योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण पावणे चार लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आज झालेल्या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील
शेतकऱ्यांना दोन हजार कोटींहून अधिक रुपये प्राप्त झाले.
****
दरम्यान, सरकारनं शेतकऱ्यांच्या
हितासाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी ही नवी योजना सुरु केल्याचं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी याच कार्यक्रमात सांगितलं. कृषी उत्पादनात पिछाडीवर असलेल्या
जिल्ह्यांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठी २४ हजार कोटी रुपये खर्च
करण्यात येणार आहेत, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
****
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन
सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्यदलाचं अभिनंदन केलं. सैन्यदलाच्या स्वदेशी
आयुधांची ताकद जगानं पाहिल्यांदाच पाहिल्याचं मोदी म्हणाले.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान १६ ऑगस्टपासून, १४ सप्टेंबरपर्यंत जनतेसाठी खुलं करण्यात आलं आहे. या काळात नागरिकांना अमृत
उद्यानात मोफत प्रवेश दिला जाणार आहे. राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर किंवा
राष्ट्रपती भवनासमोरील किओस्कच्या माध्यमातून उद्यान भेटीची वेळ निर्धारीत
करण्याची सुविधा देण्यात आली आहे. २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त
खेळाडूंना आणि ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना अमृत उद्यानात विशेष
प्रवेश मिळेल,
असं याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
****
राज्यात खासगी बाजार समित्यांना देण्यात आलेल्या वनटाईम
परवान्यांबाबत पुर्नविचार सुरु असून, ज्या खासगी बाजार
समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध होतील, अशाच बाजार समित्यांच्या परवान्यांचं नूतनीकरण होईल, अशी
माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. ते आज नंदुबार इथं
माध्यमांशी बोलत होते. बाजारसमित्यांमध्ये बाह्य निधी उभारून मुलभूत सुविधा
उभारण्यावर भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या
चकमकीत आज एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. काल संध्याकाळी ही चकमक सुरु झाली
होती. कुलगाम मधल्या अखल वनक्षेत्रात दहशतवादी असल्याच्या मिळालेल्या माहितीवरुन
सुरक्षा दलानं या परिसरात शोधमोहीम सुरु केली. अद्यापही या परिसरात शोधमोहीम सुरु
आहे.
****
जॉर्जियात झालेल्या फिडे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत विजेतेपद
पटकावलेल्या ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुख हिचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते आज नागपूर इथं नागरी सन्मान करण्यात आला. सरकारकडून दिव्याला तीन
कोटी रुपयांचा धनादेश या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
****
क्रिकेट
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या
दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाकडं ५२ धावांची आघाडी आहे. काल इंग्लंडचा पहिला डाव
२४७ धावांवर संपुष्टात आला. आज तिसऱ्या दिवशी भारत आपल्या दुसऱ्या डावात २ बाद
७५ या धावसंख्येवरुन पुढे खेळायला
सुरुवात करेल,
यशस्वी जयस्वाल ५१ धावांवर खेळत आहे. भारतीय प्रमाण
वेळेनुसार सामना दुपारी साडे तीन वाजता सुरु होईल.
****
No comments:
Post a Comment