Saturday, 2 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 August 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं आज पंतप्रधानांच्या हस्ते वितरण 

·      सत्ताकारणाचं रुपांतर राष्ट्रकारण आणि समाजकारणात होणं आवश्यक-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

·      दहीहंडी उत्सवात दीड लाखांवर गोविंदांना विमाकवच देण्याचा राज्यशासनाचा निर्णय 

·      राज्यभरात आजपासूनहर घर तिरंगाअभियान-तीन टप्प्प्यात विविध उपक्रमांचं आयोजन

·      ७१ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर-श्यामची आई सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर नाळ दोनला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा बहुमान

आणि

·      छत्रपती संभाजीनगर इथं बनावट चलनी नोट छपाई कारखाना उध्वस्त-सात जणांना अटक

****

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. उत्तर प्रदेशात वाराणसीच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते, २० हजार ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम, नऊ कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात आज जमा केली जाईल. छत्रपती संभाजीनगर इथं, पैठण रस्त्यावरच्या कृषी विज्ञान केंद्रात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे. केंद्रप्रमुख ज्येष्ठशास्त्रज्ञ डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या...

बाईट- केंद्रप्रमुख ज्येष्ठशास्त्रज्ञ डॉ. दिप्ती पाटगावकर

****

यूपीआय पेंमेंट ॲपच्या वापरासंबंधीचे नवे नियम कालपासून लागू झाले. आता ग्राहकांना अशा ॲपवरून दिवसभरात आपल्या बँक खात्यातली शिल्लक ५० वेळा तपासता येईल. बँकिंग कायदा सुधारणा अधिनियमही कालपासून लागू झाला.

****

उपराष्ट्रपती निवडणूक कार्यक्रम, केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. येत्या ९ सप्टेंबरला या पदासाठी मतदान होणार आहे.

****

सत्ताकारणाचं रुपांतर राष्ट्रकारण आणि समाजकारणात होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. काल पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार  स्वीकारल्यानंतर गडकरी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच लोकमान्य टिळक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि एक लाख रपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. पुरस्काराला उत्तर देतांना गडकरी म्हणाले..,

बाईट-नितिन गडकरी

देशात पैशाचा किंवा तंत्रज्ञानाचा अभाव नसून, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांचा अभाव जाणवत असल्याचं, गडकरींनी नमूद केलं.

****

लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. शैक्षणिक संस्थांसह शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयांमधून या राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं.

****

दहीहंडी उत्सवात भाग घेणाऱ्या दीड लाखांवर गोविंदांना विमाकवच देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. ओरिएंटल इन्शुरन्स्स कंपनीच्या माध्यमातून हे विमाकवच दिलं जाईल. या उत्सवात मानवी मनोरा रचताना पडल्यामुळे अनेकदा गोविंदा जखमी होतात, ही बाब लक्षात घेऊन क्रीडा विभाग आणि राज्य दहीहंडी गोविंदा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबवली जाणार आहे.

****

मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर इथं सर्किट बेंच उपलब्ध करुन दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ही माहिती दिली. येत्या १८ ऑगस्टपासून हे सर्किट बेंच कार्यान्वित होईल. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी ही व्यवस्था असणार आहे.

****

राज्यभरात आजपासूनहर घर तिरंगाअभियान राबवण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. तीन टप्प्यात हे अभियान राबवलं जाणार असून, पहिल्या टप्प्यात शालेय तसंच महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धात्मक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. अभियानाचा दुसरा टप्पा ९ ऑगस्टपासून तर तिसरा टप्पा १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबवला जाणार आहे.

****

 ७१ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर झाले. 'ट्वेल्थ फेल' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट, 'सॅमबहादूर' हा राष्ट्रीयता आणि सामाजिकता प्रसार करणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', हा सर्वोत्कृष्ट मनोरंजनपर चित्रपट तर 'हनुमान' हा तेलगु चित्रपट सर्वोत्तम ॲनिमेशन पट पुरस्काराचा मानकरी ठरला. 'द केरला स्टोरी' या चित्रपटासाठी सुदिप्तो सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार जाहीर झाला. सुवर्णकमळ आणि तीन लाख रुपये असं या सर्व पुरस्कारांचं स्वरूप आहे.

 

'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' चित्रपटातल्या भूमिकेसाठी राणी मुखर्जी हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर 'जवान' चित्रपटातल्या भूमिकेसाठी शाहरुख खान तसंच 'ट्वेल्थ फेल' चित्रपटातल्या भूमिकेसाठी विक्रांत मेस्सी या दोघांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार विभागून जाहीर झाला. पीव्हीएन एस रोहित सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक तर शिल्पा राव सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्काराची मानकरी ठरली. रौप्य कमळ आणि दोन लाख रुपये असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे.

यंदाच्या पुरस्कारांत मराठी चित्रपटांच्या कामगिरीबाबत माहिती देणारा हा वृत्तांत...

पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पुरस्कार आत्मपाफ्लेटचे दिग्दर्शक आशिष बेंडे यांना तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार नाळ दोन चित्रपटाला जाहीर झाला आहे. सुवर्णकमळ आणि तीन लाख रुपये असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठीचं रौप्यकमळ आणि दोन लाख रुपये पुस्कार श्यामची या आई चित्रपटाला जाहीर झाला.

सर्वोत्कृष्ट बालकलाकारासाठीचं रौप्यकमळ आणि दोन लाख रुपयांचा पुरस्कार जिप्सी चित्रपटातील कबीर खंदारे तसंच नाळ दोन मधील त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप या सर्वांना विभागून देण्यात आला आहे.

****

जालना जिल्हा क्रीडा प्रबोधिनीतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी सखोल चौकशी तसंच दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही आमदार चित्रा वाघ यांनी दिली आहे. काल जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर क्रीडा प्रबोधिनीस भेट देऊन त्यांनी मुलींसोबत संवाद साधला. त्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना, वाघ यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला. त्या म्हणाल्या....

बाईट- आमदार चित्रा वाघ

****

बनावट चलनी नोटा तयार करणाऱ्या सात जणांच्या टोळीला अहिल्यानगर पोलिसांनी काल अटक केली. हे हे सर्व आरोपी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर तसंच बीड जिल्ह्यातले आहेत. त्यांच्या ताब्यातून एकोणसाठ लाख पन्नास हजार रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटांसह एकूण ८८ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या टोळीच्या छत्रपती संभाजीनगर इथं वाळूज औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या नोटा छपाई कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये नोटा छपाईसाठी वापरला जाणारा अत्याधुनिक प्रिंटर, शाई तसंच नोटा छपाईचा कागद जप्त करण्यात आल्याची माहिती अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली

****

नांदेड जिल्हा बँकेच्या माजी संचालक स्नेहलता पाटील यांचं काल निधन झालं, त्या ८० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर आज नांदेड इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या त्या ज्येष्ठ कन्या तर माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पत्नी होत.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्ग इथं विद्युत वितरण विभागाचे उपविभागीय कार्यालय सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली.

****

'संस्कृती आणि भाषेवर आघात झाला तरी मराठवाड्याने मराठी भाषा फक्त जपलीच नाही तर वृद्धिंगत केली, असं प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केलं आहे. लातूर जिल्ह्यात देवणी इथं परिषदेच्या शाखेचं काल उद्घाटन झालं, त्यावेळी बोलतांना पाटील यांनी, मराठवाड्याच्या या योगदानाची वाङ्गमयीन इतिहासाने दखल घेतली नाही, अशी खंत व्यक्त केली.

****

परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीचं बांधकाम आणि कार्यशाळेसाठी शासनातर्फे पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कौशल्य विकास विभागानं याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी काल अखेरच्या दिवशी ११५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. १८ संचालकांच्या निवडीसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

****

क्रिकेट-

भारत आणि इंग्लंड दरम्यान ओवल इथं सुरु असलेल्या तेंडुलकर अँडरसन मालिकेच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारत आपल्या दुसऱ्या डावात २ बाद ७५ या धावसंख्येवरुन पुढे खेळाला सुरुवात करेल. कालचा खेळ थांबला तेव्हा यशस्वी जयस्वाल ५१ तर आकाशदीप ४ धावांवर खेळत होता. इंग्लंडचा पहिला डाव काल २४७ धावांवर संपुष्टात आला.

****

No comments: