Saturday, 2 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 02 August 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ ऑगस्ट २०२ सकाळी.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण होत आहे. उत्तर प्रदेशात वाराणसीच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते, २० हजार ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम, नऊ कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात आज जमा केली जाईल. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते २२ हजार कोटी रुपायांहून अधिक खर्चाच्या ५२ विकासप्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमीपूजन करण्यात येणार आहे.

****

राखीपोर्णिमेच्या पूर्वसंध्येला ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थींना जुलै महिन्याचा लाभ वितरित केला जाणार आहे. महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी समाजमाध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. लाभाची रक्कम लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा होईल, असं या वृत्तात म्हटलं आहे.   

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना, १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणाच्या संदर्भात त्यांचे विचार आणि संकल्पना पाठवण्याचं आवाहन केलं आहे. यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आपणास कोणते विषय किंवा संकल्पना प्रतिबिंबित झालेल्या आवडतील यासाठी नागरिकांनी MyGov आणि NaMo App वरील खुल्या मंचावर  आपले विचार व्यक्त करावेत, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.

****

 

न्यू इंडिया सहकारी बँकेला सारस्वत बँकेत विलीन करायला रिझर्व्ह बँकेनं मंजुरी दिली आहे. सोमवारी ऑगस्टपासून हे विलिनीकरण प्रत्यक्षात येईल.  १२२ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया सहकारी बँकेवर निर्बंध लादले होते. या बँकेच्या एकूण २७ शाखा असून सध्या बँकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे.

****

गर्दीच्या प्रमुख ७३ रेल्वे स्थानकांवर स्थानक संचालक तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल राज्यसभेत दिली. सण-उत्सवांच्या काळात रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी हे संचालक त्वरित निर्णय घेऊ शकतील. रेल्वे स्थानकाबाहेर कायमस्वरूपी होल्डिंग एरिया आणि रुंद फूट ओव्हर ब्रिज तयार करून गर्दी व्यवस्थापन सुधारले जाईल. प्रमुख स्थानकांवर सीसीटीव्ही निगराणी, वॉकी-टॉकी घोषणा प्रणाली आणि वॉर रूम स्थापित केले जात आहेत. फक्त निश्चित तिकीटधारकांनाच प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी असेल, असं त्यांनी सांगितलं.

****

मराठवाड्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असलेल्या छत्रपती संभाजीनगर-परभणी या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारनं दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या सुमारे १७७ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी दोन हजार एकोणऐंशी कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे. या दुहेरीकरणामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना मोठा फायदा होणार असून यामुळे केवळ प्रवासी रेल्वेच नव्हे तर मालगाड्यांची वाहतूक सुद्धा अधिक वेगाने आणि अचूक वेळापत्रकानुसार होईल. हा संपूर्ण मार्ग २०३० पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे.

****

अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मनुष्यबळ पुरवठ्याच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील आणि प्रशासकीय अधिकारी . एन. हामरे यांना काल कार्यासन अधिकारी प्र. ज्ञा. सोनटक्के यांनी निलंबित केलं. निलंबनानंतर या तिन्ही अधिकाऱ्यांची आणखी विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदारा जलाशयाचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शताब्दी महोत्सव समिती गठीत करण्याचा  निर्णय घेतला आहे. ही समिती भंडारदरा जलाशयाचं संवंर्धन आणि या भागातील पर्यटन संधी निर्माण करून देण्याच्या उपाययोजनांच्या सूचनांचा आढावा घेणार आहे

****

रशियाचे माजी अध्यक्ष आणि रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सध्याचे उपप्रमुख दिमित्री मेदवेदेव यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन अणु पाणबुड्या योग्य ठिकाणी तैनात करण्याचे आदेश दिल्याचे म्हटले आहे. रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांच्या विधानानंतर रशिया आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. मात्र, या दोन पाणबुड्या कुठे तैनात केल्या जात आहेत हे ट्म्प यांनी स्पष्ट केले नाही.

****

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम  कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाकडं ५२ धावांची आघाडी आहे. काल इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर संपुष्टात आला. आज  तिसऱ्या दिवशी भारत आपल्या दुसऱ्या डावात बाद ७५ या धावसंख्येवरुन पुढे खेळाला सुरुवात करेल, यशस्वी जयस्वाल ५१ धावांवर खेळत आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सामना दुपारी साडे तीन वाजता सामना सुरु होईल.

****

No comments: