Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 August 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
भारताला एअरबस सी-२९५ प्रकारातील
सोळा लष्करी वाहतूक विमानं स्पेनकडून उपलब्ध झाली आहेत. गुजरातच्या वडोदरा इथल्या कारखान्यात
या विमानांची जुळवणूक तसंच देखभालही केली जाणार आहे. देशाची सुरक्षा भक्कम करणाऱ्या
या विमानांमधील पुढील ४० विमानं भारतात तयार होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
निवडणूक आयोगानं मतदार याद्या तयार
करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बुथ लेव्हल ऑफिसर्स म्हणजेच मतदार केंद्रिनिहाय
अधिकाऱ्यांचं मानधन दुप्पट करण्यात आलं आहे आणि बीएलओ पर्यवेक्षकांच्या मानधनातही वाढ
करण्यात आली आहे. बूथ लेव्हल ऑफिसरचं मानधन सहा हजारांवरुन बारा हजार रुपये इतकं केलं
आहे. तर मतदार यादीच्या पुनरावृत्तीसाठी प्रोत्साहन मानधन १ हजारांवरुन दोन हजार इतकं
केलं. तर बुथ लेव्हल पर्यवेक्षकाचं मानधन १२ हजारांवरुन १८ हजार इतकं केलं असल्याचं
निवडणूक आयोगानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीची
नीट-पीजी परीक्षा आज सकाळी नऊ वाजता देशभरातील विविध केंद्रांवर सुरु झाली. दुपारी
साडेबारापर्यंत या परीक्षेचा कालावधी असून जवळपास अडीच लाख विद्यार्थी, ही संगणक आधारित परीक्षा देत आहेत.
****
कर्नाटकातला माजी खासदार प्रज्वल
रेवण्णा याला महिला अत्याचार प्रकरणी जन्मठेप आणि १० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला
आहे. ४७ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार आणि अश्लील चित्रफितींशी संबंधित प्रकरणात
बंगळुरू इथल्या खासदार आणि आमदारांसाठीच्या विशेष न्यायालयानं ही शिक्षा सुनावली. प्रज्वल
रेवण्णा हा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आहे. त्याच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आणि पदाचा गैरवापर केल्याचा
आरोप आहे. न्यायालयानं त्याला पीडितेला सात लाख रुपये देण्याचे आदेशही दिले आहेत.
****
राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी- वरिष्ठ
अधिकाऱ्यांच्या सहा समित्यांनी केलेल्या शिफारसीनुसार; जनतेला अपेक्षित असलेल्या उत्तम प्रशासनाचा प्रत्यय लवकरच
मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते काल नागपूर इथं भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या परिषदेत
बोलत होते. कोणतीही जिल्हा वार्षिक योजना रोजगाराचं फक्त साधन न ठरता यातून रोजगाराची
मोठ्या प्रमाणात निर्मिती व्हावी, हे अभिप्रेत आहे. यासाठी
आवश्यक सुधारणांचा अभ्यास करुन कोणत्या योजना स्वीकाराव्या आणि कोणत्या वगळाव्या याची मांडणी या समित्यांनी केली असल्याचं मुख्यमंत्री
म्हणाले.
****
'संस्कृती आणि भाषेवर आघात झाला तरी मराठवाड्यानं मराठी
भाषा केवळ जपलीच नाही तर वृद्धिंगत केली असल्याचं मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष
प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी म्हटलं आहे. लातुर जिल्ह्यात मसापच्या देवणी शाखेचं
मान्यवरांच्या उपस्थितीत काल उद्घघाटन झालं याप्रसंगी ते बोलत होते. मराठी भाषेचं संवर्धन
आणि जतनाचं काम मराठवाड्यानं करूनही त्याची वाड्मयीन इतिहासानं दखल घेतली नसल्याची
खंत यावेळी ठाले पाटील यांनी व्यक्त केली.
****
भंडारा जिल्ह्यात पवनी इथं ५२ एकरातील
कुराडा तलावात ३५ कोटींचा निधी खर्चून ५१ फुटांची संत जगनाडे महाराजांचे देशातील पहिले
स्मारक उभारण्यात येणार आहे. यामुळे संत जगनाडे महाराजांच्या विचारांनी प्रेरित नागरिक
मोठ्या संख्येने येतील, असं आकर्षणाचं केंद्र
इथं निर्माण होणार असल्याची माहिती आमदार
नरेंद्र भोंडेकर यांनी दिली. काल या ठिकाणी बांधकामाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
या तलावात सौंदर्यीकरण, वाचनालय, भक्तनिवासाचीही उभारणी करण्यात येणार
असल्याचं ते म्हणाले.
****
हवामान - मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भ-कोकणात तुरळक भागात आज दिवसभरात
हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता
हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा
अंदाज आहे.
****
ग्रीसमध्ये, १७ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत, भारतीय कुस्तीगीर लैकी यानं पुरुषांच्या
११० किलो फ्रीस्टाइलमध्ये रौप्यपदक जिंकलं आहे. दरम्यान, आणखी एक भारतीय कुस्तीगीर सिटेंडरनं
पुरुषांच्या ६० किलो फ्रीस्टाइलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिटेंडरनं उपांत्य
फेरीत कझाकस्तानच्या बेकासिल असाम्बेकचा पराभव केला. भारताच्या गौरव पुनियाला ६५ किलो
फ्रीस्टाइल स्पर्धेच्या कांस्य लढतीत इराणच्या मोर्तेझा मुल्ला मोहम्मदीकडून पराभव
पत्करावा लागला.
****
क्रिकेट -डब्लुसीएल म्हणजेच चॅम्पियनशिप
ऑफ लीजेंड्स स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाचं विजेतेपद दक्षिण आफ्रिकेनं पटकावलं आहे.
अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानचा नऊ गड्यांनी पराभव केला. इग्लंडच्या बर्मिंगहॅम
इथं हा सामना झाला. पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याच्या भारतीय चॅम्पियन्स संघाच्या
निर्णयानंतर पाकिस्तानला अंतिम फेरीची संधी मिळाली होती.
****
येत्या नऊ सप्टेंबरपासून सुरु होणा-या
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघात संयुक्त अरब अमिराती-यु.ए.ई.च्या दुबई इथं लढत होणार असल्याचं वृत्त आहे. प्राप्त वेळापत्रकानुसार उभय संघातील
स्पर्धेतील साखळी फेरीचा १४ सप्टेंबरचा सामना दुबईमध्ये होणार आहे.
****
No comments:
Post a Comment