Monday, 4 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 August 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      राष्ट्रीय रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून गेल्या १६ महिन्यांत ११ लाख जणांना रोजगार

·      गलवान संघर्षाबाबत राहुल गांधी यांच्या विधानावर सर्वोच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त

·      झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन

·      महाराष्ट्रात मराठी विरुद्ध अमराठी असा कुठलाच वाद नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा

आणि

·      ओव्हल कसोटी जिंकत तेंडुलकर अँडरसन मालिका बरोबरीत राखण्यात भारतीय संघ यशस्वी

****

राष्ट्रीय रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून गेल्या १६ महिन्यांत ११ लाख जणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत, एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालानुसार गेल्या दशकात १७ कोटीहून अधिक युवकांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजने अंतर्गत येत्या ५ वर्षात ४ कोटीहून अधिक रोजगार संधी निर्माण करण्यासाठी सरकारनं दोन लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहितीही मांडवीय यांनी दिली. 

****

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२० मधे गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते म्हणून गांधी यांनी असे मुद्दे समाजमाध्यमांवर न मांडता लोकसभेत मांडावेत, असं न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि ए जी मसीह यांच्या पीठानं सांगितलं. चीनने भारताचा दोन हजार किलोमीटर भूभाग ताब्यात घेतल्याच्या गांधी यांच्या दाव्यावरही न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवीन प्रभाग रचनेला आणि त्यातल्या ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. या निवडणुका नवीन प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणासहच होतील, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या निकालामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून अनिश्चिततेचा विषय ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

****

झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज दिल्लीत सर गंगाराम रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. स्वतंत्र झारखंड राज्य निर्मितीसाठी त्यांनी दीर्घकाळ संघर्ष केला होता. त्यानंतर ते तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री झाले होते. शिबू सोरेन यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इतर मान्यवरांनी समाजमाध्यमांवरून शोकभावना व्यक्त केली आहे.

****

संसदेच्या दोन्ही सभागृहात सोरेन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राज्यसभेचं कामकाज त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

दरम्यान, लोकसभेत विविध मुद्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज आधी दुपारी दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित झालं. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांच्या या गोंधळाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली, आज सदनात राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ आणि राष्ट्रीय डोपिंग प्रतिबंधक सुधारणा विधेयक २०२५, या दोन महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला असताना, विरोधकांनी असा अडथळा आणणं योग्य नसल्याचं रिजीजू यांनी म्हटलं आहे.

****

राज्यात मराठी विरुद्ध अमराठी असा कुठलाच वाद नसल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता निवडणुकीत योग्य जागा दाखवेल, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

मालेगाव स्फोटाच्या संदर्भात न्यायालयानं दिलेल्या निकालाच्या विरोधात राज्य शासनानं आठ दिवसात उच्च न्यायालयात दाद मागावी, या मागणीसाठी मालेगाव इथं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन करण्यात आलं. मायनोरिटी डिफेन्स कमिटीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. सदर स्फोटातल्या सहाही मृतांच्या नातेवाइकांच्या हस्ते तहसीलदार विशाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आलं.

****

मोबाइलद्वारे फसवणुकीच्या संभाव्य प्रकरणांना प्रतिबंध करण्यासाठी 'सायबर संस्कार' नावाचा एक कार्यक्रम आज रत्नागिरीत इथं पार पडला. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत नगरपालिकेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात डॉक्टर अक्षय फाटक या तरुण अभियंत्याने उपस्थितांना मार्गदर्शन केलं. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे प्रतिनिधी

बाईट – अनिकेत कोणकर

****

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती परवा, बुधवारी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करेल.

****

तेंडुलकर अँडरसन कसोटी क्रिकेट मालिकेतला अखेरचा सामना सहा धावांनी जिंकत, मालिका बरोबरीत राखण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला आहे. ओव्हल कसोटीत आज अखेरच्या दिवशी जिंकण्यासाठी भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करतांना, यजमान संघ ३६७ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात भारताच्या मोहम्मद सिराजने पाच, प्रसिद्ध कृष्णाने चार तर आकाशदीपने एक बळी घेतला. इंग्लंडला विजयासाठी सात धावांची गरज असतांना अखेरचा बळी घेऊन भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलेला मोहम्मद सिराज सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला, तर कर्णधाराला साजेशी खेळी करत, मालिकेत एक द्विशतक आणि तीन शतकं झळकावणारा शुभमन गिल तसंच दोन वेळा शतकी खेळी करणाऱ्या इंग्लंडच्या हॅरी ब्रूक या दोघांना मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. या मालिकेतला पहिला सामना इंग्लंडने, दुसरा भारताने आणि तिसरा सामना इंग्लंडने जिंकला, तर चौथी कसोटी अनिर्णित राहिली होती.

****

महिलांच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी नवी दिल्ली इथे झालेल्या पात्रता सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या वैष्णवी पाटीलनं ६५ किलो वजन गटात आपलं स्थान निश्चित केलं आहे. ५३ किलो वजन गटात अंतिम पंघाल, ६२ किलो वजन गटात मनिषा भानवाला, ७२ किलो वजन गटात ज्योती तर ७६ किलो वजन गटात प्रिया मलिक भारताचं प्रतिनिधित्व करतील.

****

येत्या सात तारखेपासून बीड जिल्ह्यात हरित बीड वृक्षारोपण अभियान राबवलं जाणार आहे. या अभियानांतर्गत एकाच दिवशी एकाच वेळी ३० लाख रोपांची, तर वर्षभरात एक कोटी रोपांची लागवड करण्यात येणार आहे. नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे.

या अभियानांतर्गत एकाच दिवशी एकाच वेळी ३० लक्ष रोपांची लागवड करण्यात येणार आहे. तर वर्षभरात एक कोटी रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ येत्या गुरुवारी म्हणजेच ७ ऑगस्ट २०२५ रोजी उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार सर यांच्या शुभहस्ते खंडेश्वरी मंदिर परिसरातील मैदानावर होणार आहे. जिल्ह्यातील नागरिक, शासकीय कर्मचारी, शाळा-महाविदयालय, स्वंयसेवी संस्था, आणि युवक मंडळांनी एकत्र येऊन या अभियानात सहभागी होणे, ही काळाची गरज आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं अतिक्रमण निष्कान मोहीम आजही राबवण्यात आली. शहरातला नारेगाव परिसर तसंच वाळूज औद्योगिक परिसरात आज ही मोहीम राबवण्यात आली.

****

दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं आज नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथे भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मध्यरात्री या भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरूवात केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्याचं दिसून आलं. बीड जिल्ह्यात परळी इथं वैद्यनाथ तसंच हिंगोली जिल्ह्यात औंढा इथं नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीतल्या चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून हिंगोलीकडे दरवर्षी निघणारी कावड यात्रा आज सुरू झाली. अठरा किलोमीटरच्या या यात्रेत महादेवाच्या जयघोषात शिवभक्त हिंगोलीकडे रवाना झाले.

****

No comments: