Monday, 4 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 August 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ऑगस्ट २०२५ सकाळी ७.१० मि.

 ****

·      भारतीय रेल्वेचं मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन 

·      राज्यात अवयवदान पंधरवड्याला प्रारंभ, विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन

·      आकांक्षित जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आलेल्या संपूर्णता अभियानात धाराशिव आणि नांदेड जिल्ह्याची उत्तम कामगिरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

·      नाशिकमध्ये उल्हास वैतरणा नदी जोड प्रकल्प कार्यालयाचं जलसंपदामंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, मराठवाड्याला मिळणार पाणी

आणि

·      भारत-इंग्लंड पाचवी कसोटी रंगतदार अवस्थेत

****

भारतीय रेल्वेचं मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत असल्याचं प्रतिपादन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. गुजरातमध्ये भावनगर रेल्वे स्थानकात आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. गेल्या अकरा वर्षात ३४ हजार किलोमीटरचे नवे रेल्वेमार्ग तयार झाले असून, देशातल्या तेराशे रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास प्रकल्प हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प असल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,

बाईट- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगाने होत असून, लवकरच या दोन शहरातलं अंतर केवळ दोन तास सात मिनिटांवर येईल असं वैष्णव यावेळी म्हणाले. भावनगर ते अयोध्या या साप्ताहिक गाडीला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला, तसंच पुण्याहून मध्यप्रदेशातल्या रिवा कडे जाणाऱ्या आणि जबलपूर ते रायपूर या गाडीचं उद्घाटनही त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं.

****

राज्यात काल अवयवदान पंधरवड्याला प्रारंभ झाला आहे. अवयवदान व्यापक समाज चळवळीचं पाऊल, या अनुषंगानं राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातर्फे हा उपक्रम राबवला जात आहे. यानिमित्त जनजागृतीपर रॅली, सायकल रॅली, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी काल अवयवदानाचा अर्ज केला आणि सर्वांना अवयवदान करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,

बाईट- कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

****

आकांक्षित जिल्हे आणि तालुके या कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या काळात राबवण्यात आलेल्या संपूर्णता अभियानामधल्या कामगिरीसाठी चंद्रपूर जिल्ह्याला सुवर्णपदक मिळालं आहे. काल नागपूर इथं चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या वतीने प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या अभियानात धाराशिव जिल्ह्याला कांस्य पदक मिळालं असून, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर नांदेड जिल्ह्यातल्या किनवटच्या कामगिरीबद्दलही जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

****

नाशिकमध्ये उल्हास वैतरणा नदी जोड प्रकल्प कार्यालयाचं उद्घाटन काल जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालं. या प्रकल्पातून संभाजीनगरसह मराठवाड्याला लाभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हे पाणी मराठवाड्यात पोहोचेपर्यंत एक लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. दमणगंगा -एकदरे, दमणगंगा- वैतरणा- देवनदी- गोदावरी लिंक, उल्हास- वैतरणा- गोदावरी, पार- गोदावरी प्रकल्प शासनाच्या वतीने राबवण्यात येणार असून, नाशिक, अहिल्यानगरसह मराठवाड्याला या माध्यमातून मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याचंही विखे पाटील यांनी सांगितलं.

****

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच जारी करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातले लाभार्थी भोजराज गंगाधर राखोंडे यांनी यासंदर्भात सांगितलं,

बाईट- भोजराज राखोंडे

****

परभणी जिल्ह्यात पेडगाव इथल्या महावितरणच्या उपकेंद्रामध्ये नव्याने आस्थापित केलेल्या अतिरिक्त उर्जा रोहित्र आणि क्षमतावाढ केलेल्या उर्जा रोहित्राचं लोकार्पण काल पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. विविध योजनांच्या माध्यमातून सौर ऊर्जा वापरण्यासाठी शासन प्रोत्साहन देत असून, शेतकरी आणि नागरिकांनी विविध सौर ऊर्जा योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन बोर्डीकर यांनी यावेळी केलं.

****

शैक्षणिक संस्था विशेषतः शाळांमधून ग्रंथालयांची अवस्था सुधारण्याची गरज, वाचक चळवळीतले कार्यकर्ते अभिजीत जोंधळे यांनी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल, ग्रंथसखा श्याम देशपांडे पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. वाचनाच्या सवयीचे परिणाम दिसून येण्यासाठी संयमाने वाट पहावी लागेल, असं मत जोंधळे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले...

बाईट- अभिजीत जोंधळे

आपल्या पुस्तक पेटी उपक्रमाबद्दल जोंधळे यांनी माहिती दिली. अंबाजोगाई परिसरातल्या शाळांमधून सुरू झालेला हा उपक्रम राज्यभरात विस्तारत गेला असून, प्रत्येकी सरासरी शंभर पुस्तकं असलेल्या पुस्तक पेट्यांची संख्या आता पावणे दोनशेपर्यंत पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं.

****

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या काटी इथल्या महालक्ष्मी मूर्तींना परदेशात बाजारपेठ मिळत आहे. हा व्यवसाय करणाऱ्या कुंभार बंधुंना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे या व्यवसात वाढवण्यास मदत मिळाली. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गौरी गणपतीच्या मुर्त्या ते सुबकरीत्या तयार करतात. साधारणपणे वर्षभर सुरू असणाऱ्या या व्यवसायातून गावातल्या महिला आणि पुरुषांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. याबद्दल अधिक माहिती देत आहेत मंगेश कुंभार,

बाईट- मंगेश कुंभार

****

क्रिकेट

भारत-इंग्लंड ओव्हल कसोटी सामना अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. ३७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या ६ बाद ३३९ धावा झाल्या आहे. इंग्लंडला विजयासाठी आणखी ३५ धावांची तर भारतीय संघाला चार बळींची आवश्यकता आहे. इंग्लंडकडून हॅरी ब्रूक आणि जो रुट यांनी शतकी खेळी केल्या. भारताकडून प्रसिद्धी कृष्णानं आतापर्यंत तीन तर मोहम्मद सिराजनं दोन बळी टिपले आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल अंतर्गत मी आयुक्त होणार हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये महानगरपालिकेच्या मिटमिटा इथल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आयुक्तांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आयुक्तांनी या विद्यार्थ्यांसोबत फ्रेंडशिप डे साजरा केला. 

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राजू नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने काल हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या बाभुळगाव इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं. यावेळी पाच हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर ते खुलताबाद रस्त्यावर काल सकाळी वेरुळकडे दर्शनासाठी जाणाऱ्या कारनं, दोघांना जोरानं धडक दिली. यात दोन्ही पादचाऱ्यांचा जागेवरच मृत्यू झाला. अशोक  घुसळे आणि ज्ञानेश्‍वर जाधव अशी मृतांची नावं आहेत.

****

लातूरच्या आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन सदस्यांनी २०२१ मध्ये जागतिक मैत्री दिनानिमित्त तीन हजार २०० झाडं लावली होती, या झाडांचा चौथा वाढदिवस काल साजरा करण्यात आला. लातूर महानगरपालिका शहरातल्या जलसंपदा विभागाच्या पाटबंधारे वसाहतीत दीड एकर जागेवर ही झाडं लावण्यात आली आहेत. लातूर महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी मिना यावेळी उपस्थित होत्या.

****

No comments: