Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 05 August 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी
आरक्षणासह होणार, न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांची माहिती
·
संसदेतल्या कामकाजात व्यत्ययाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत
आज एनडीएची बैठक
·
झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री
शिबू सोरेन यांचं निधन
·
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा २०२५
कार्यक्रमाची गिनिज बुकात नोंद
आणि
·
ओव्हल कसोटीत रोमहर्षक विजय मिळवत तेंडुलकर अँडरसन मालिका
बरोबरीत राखण्यात भारतीय संघाला यश
****
स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या नवीन प्रभाग रचनेला आणि त्यातल्या ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या
याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. या निवडणुका नवीन प्रभाग रचना आणि ओबीसी
आरक्षणासहच होतील, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या निकालामुळे आगामी
निवडणुकीत सगळ्या जिल्ह्यांना ओबीसी आरक्षण लागू असेल, असं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, राज्यात मराठी
विरुद्ध अमराठी असा कुठलाच वाद नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. असा वाद निर्माण
करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता निवडणुकीत योग्य जागा दाखवेल, असं ते म्हणाले,
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय समितीची
बैठक होणार आहे. बिहारमधल्या मतदार यादी पडताळणीच्या मुद्यावरुन विरोधी पक्षांनी संसदेचं
कामकाज बाधित केलं, त्यामुळे या अधिवेशनात अद्याप एकही विधेयक चर्चेसाठी आलं नाही,
त्या पार्श्वभूमीवर एनडीएची बैठक होणार आहे. काल लोकसभेत राष्ट्रीय क्रीडा
प्रशासन विधेयक आणि राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक सुधारणा विधेयक चर्चेला येऊ
शकले नाही.
****
झारखंड
मुक्ती मोर्चाचे संस्थापक आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं काल दिल्लीत
दीर्घ आजारानं निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. स्वतंत्र झारखंड राज्य निर्मितीसाठी त्यांनी
दीर्घकाळ संघर्ष केला होता. त्यानंतर ते तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री झाले होते.
सोरेन यांनी तीन वेळा लोकसभेत तर दोन वेळा राज्यसभेत सदस्य म्हणून काम केलं. संयुक्त
पुरोगामी आघाडी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी कोळसा मंत्री म्हणूनही जबाबदारी
सांभाळली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोरेन
यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना पुष्पचक्र अर्पण केलं. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी
राधाकृष्णन आणि इतर मान्यवरांनी समाजमाध्यमांवरून शोकभावना व्यक्त केल्या.
****
लोकसभेतले
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२० मध्ये गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या संघर्षाच्या
पार्श्वभूमीवर सैन्यदलाबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त
केली आहे. विरोधी पक्षनेते म्हणून गांधी यांनी असे मुद्दे समाजमाध्यमांऐवजी लोकसभेत
मांडावेत, असं न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि ए जी मसीह यांच्या पीठानं नमूद
केलं. चीनने भारताचा दोन हजार किलोमीटर भूभाग ताब्यात घेतल्याच्या गांधी यांच्या दाव्यावरही
न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा २०२५, या कार्यक्रमाने विश्वविक्रम केला असून,
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे. या कार्यक्रमाच्या
आठव्या भागासाठी माय गव्ह प्लॅटफॉर्मवर तीन कोटी ५३ लाख जणांनी नोंदणी केली होती. एका
महिन्यात सर्वाधिक लोकसहभागाची नोंद झालेला कार्यक्रम असं गिनीज बुकने यासंदर्भातल्या
नोंदीत म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत गिनीज बुकने याबाबतचं अधिकृत प्रमाणपत्र केंद्रीय
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना प्रदान केलं.
****
गेल्या
अडीच वर्षात हिंगोली जिल्ह्याच्या विविध विकासकामांसाठी दोन हजार ६०० कोटी रुपयांचा
भरघोस निधी दिला, भविष्यातही हा निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी दिली. हिंगोली इथं कावड यात्रा महोत्सव समितीच्या वतीनं यात्रेचा
समारोपीय कार्यक्रम गांधी चौकात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, कावड यात्रा
काल उत्साहात पार पडली. कळमनुरी इथल्या चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून हिंगोलीकडे
सुमारे अठरा किलोमीटरच्या या यात्रेत महादेवाच्या जयघोषात अनेक शिवभक्त सहभागी झाले
होते. आमदार संतोष बांगर, आमदार राजेश नवघरे यांच्यासह अन्य मान्यवर
यावेळी उपस्थित होते.
****
तेंडुलकर
- अँडरसन कसोटी क्रिकेट मालिकेतला अखेरचा सामना सहा धावांनी जिंकत, मालिका बरोबरीत
राखण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला आहे. ओव्हल कसोटीत काल अखेरच्या दिवशी भारतीय संघाने
दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करतांना, यजमान संघ ३६७ धावांवर सर्वबाद
झाला. इंग्लंडला विजयासाठी सात धावांची गरज असतांना अखेरचा बळी घेऊन भारताच्या विजयावर
शिक्कामोर्तब केलेला आणि दुसऱ्या डावात यजमानांचा निम्मा संघ गारद केलेला मोहम्मद सिराज
सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेत विक्रमी ७५४ धावा करणारा कर्णधार शुभमन
गिल आणि दोन वेळा शतकी खेळी करणाऱ्या इंग्लंडच्या हॅरी ब्रूक या दोघांना मालिकावीर
पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
****
धाराशिव
इथल्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात संशोधन करणारा शुभम धूत या विद्यार्थ्याला, राष्ट्रपती
दौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिन सोहळ्याचं विशेष निमंत्रण पाठवलं आहे. शुभम धूत
हा विहामांडवा या गावचा रहिवासी असून, तो हिमोफेलिया या विषयावर
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ना.सू. गंगासागरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन
करत आहे. राष्ट्रपतींच्या या निमंत्रणाबाबत शुभम याने आपल्या भावना या शब्दांत व्यक्त
केल्या...
बाईट
– शुभम धूत
****
येत्या
सात तारखेपासून बीड जिल्ह्यात हरित बीड वृक्षारोपण अभियान राबवलं जाणार आहे. या अभियानांतर्गत
एकाच दिवशी ३० लाख रोपांची, तर वर्षभरात एक कोटी रोपांची लागवड करण्यात येणार आहे. नागरिकांनी
या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं. ते म्हणाले,
या अभियानांतर्गत एकाच दिवशी एकाच वेळी ३० लक्ष रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
तर वर्षभरात एक कोटी रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ येत्या
गुरुवारी म्हणजेच ७ ऑगस्ट २०२५ रोजी उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार सर
यांच्या शुभहस्ते खंडेश्वरी मंदिर परिसरातील मैदानावर होणार आहे. जिल्ह्यातील नागरिक, शासकीय कर्मचारी, शाळा-महाविदयालय, स्वंयसेवी संस्था, आणि
युवक मंडळांनी एकत्र येऊन या अभियानात सहभागी होणे, ही काळाची गरज आहे.
****
दुसऱ्या
श्रावणी सोमवार निमित्तानं काल नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथं भाविकांनी मोठी
गर्दी केली होती. मध्यरात्री या भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरूवात केली. छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथं घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यात परळी इथं वैद्यनाथ तसंच
हिंगोली जिल्ह्यात औंढा इथं नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
****
नांदेड
इथं मुक्तेश्वर आश्रमात संत पाचलेगावकर महाराज यांचा ३९ वा पुण्यतिथी सोहळा काल साजरा
झाला. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर टाक यांच्या हस्ते पादुकांची अभिषेक पूजा करण्यात आली.
महाराजांचे ज्येष्ठ अनुयायी दत्तोपंत डहाळे यांनी यावेळी बोलतांना, महाराजांच्या
राष्ट्र कार्याचा उचित गौरव झाला नाही, अशी खंत व्यक्त केली.
****
मनरेगा
योजनेंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या गायरान जमिनीवर चारा पिकांची लागवड सुरू करण्यात
येत असून, यासाठी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या निर्देशानुसार
तालुका स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. तहसीलदार, गट विकास
अधिकारी, वन विभाग, सामाजिक वनीकरण आणि
पशुसंवर्धन विभाग यांच्या समन्वयाने ही कार्यवाही केली जात आहे.
****
तुळजापूर
इथं, तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देत असतानाचं १०८
फूट उंचीचं भव्य शिल्प लवकरच साकारलं जाणार आहे. त्यासाठी राज्याच्या कला संचालनालयाकडे
देशभरातल्या शिल्पकारांकडून शिल्प नमुने मागवण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली असल्याची
माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. मुंबईत काल तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास
आराखड्याच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं अतिक्रमण निष्कासन मोहीम कालही राबवण्यात आली. शहरातल्या नारेगाव परिसरातली
पावणे दोनशे अतिक्रमणं जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई आजही चालू राहणार आहे.
****
हवामान
दक्षिण
मध्य महाराष्ट्रात तसंच मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम
स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment