Wednesday, 6 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 06 August 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी, पाच वर्षात सुमारे सव्वा लाख उद्योजक आणि ५० हजार स्टार्टअप्स् सुरु करण्याचं ध्येय

·      स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दिवाळीनंतर, राज्य निवडणूक आयुक्तांचे सुतोवाच

·      उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी, पर्यटनासाठी गेलेले नांदेड जिल्ह्यातले ११ युवक सुखरुप असल्याची प्रशासनाची माहिती

·      महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान

·      हर घर तिरंगा अभियानात स्वातंत्र्यदिनापर्यंत विविध उपक्रमांचं आयोजन

आणि

·      मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात पुढील तीन दिवसांसाठी हवामान खात्याकडून यलो अलर्ट

****

महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण, २०२५ ला काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या धोरणामुळे राज्यात येत्या पाच वर्षात सुमारे सव्वा लाख उद्योजक तयार होणं तसंच ५० हजार स्टार्टअप्स् सुरू होणं अपेक्षित आहे. यामध्ये शहरी तसंच ग्रामीण भागांत तसंच महिलांच्या आणि युवकांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना विशेष प्रोत्साहन दिलं जाईल. कालच्या बैठकीतल्या अन्य निर्णयाबाबत संक्षिप्त माहिती देणारा हा वृत्तांत...

‘‘एसटी महामंडळाच्या अतिरीक्त जमिनींचा व्यापारी तत्त्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या धोरणानुसार महामंडळाच्या जमिनींच्या भाडेपट्टा कराराचा कालावधी आता ६० वर्षांऐवजी ४९ वर्षांच्या दोन टप्प्यात मिळून ९८ वर्षे करायला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग थेट वाढवण बंदराला जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉर या शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाला मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली. तीन वर्षांत पूर्ण होणं अपेक्षित असलेल्या या महामार्गासाठी दोन हजार ५२८ कोटी ९० लाख रुपये तरतूदीलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

कृष्ठरुग्णांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात सुमारे चार हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. सुमारे २९ संस्थांना या निर्णयामुळे वाढीव अनुदान मिळणार आहे. शासकीय मालकीच्या चिंचोळ्या, अनुपयुक्त आकाराच्या तसंच सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या जमिनी वाटपाच्या धोरणालाही काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.’’

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या नियोजित स्मारकासंदर्भातही काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

****

चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारं, 'यात्री छावा राईड ॲप', एसटी महामंडळ लवकरच सुरू करणार आहे. परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी देण्याच्या उद्देशाने बस, रिक्षा, टॅक्सी आणि ई-बस या वाहन सेवासाठी हे ॲप सुरू करण्यात येणार आहे.

****

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान होतील, असं सूतोवाच राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केलं आहे. काल नाशिक इथं उत्तर महाराष्ट्रातल्या पाचही जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतल्यानंतर वाघमारे बोलत होते. ते म्हणाले...

बाईट - राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

****

राज्यातल्या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी "महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण" स्थापन करण्याची कार्यवाही सुरु करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. नद्यांचे नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी हे प्राधिकरण विकासात्मक भूमिका बजावेल, असं त्यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत सांगितलं. प्राधिकरणाची रचना आणि संकल्पनेचं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी विस्तृत सादरीकरण केलं.

****

उत्तराखंडात उत्तरकाशी जिल्ह्यात काल ढगफुटी होऊन मोठं नुकसान झालं आहे. या घटनेनंतर धराली परिसरात खीरगंगा नदीला मोठा पूर आला, यामुळे अनेक घरं, दुकानं तसंच इतर व्यावसायिक आस्थापनांचं मोठं नुकसान झालं. या भागात सैन्यदल आणि राज्य तसंच केंद्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीनं मदत आणि बचावकार्य राबवलं जात आहे.

नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातल्या डोणगाव इथले ११ युवक उत्तराखंडमध्ये अडकले असून, ते सर्वजण सुखरूप असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आणखी काही यात्रेकरू उत्तराखंडमध्ये अडकून पडले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित तालुक्यातले तहसीलदार किंवा जिल्हा आपत्ती, जिल्हा आपत्कालीन कार्यालयात संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हे पुरस्कार मान्यवरांना प्रदान करण्यात आले. गजलगायक भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना, राजकपूर जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अनुपम खेर यांना, व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना तर व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मांजरेकर यांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या...

बाईट - अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर

राज्य शासनाचा पहिला 'छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार', युनेस्कोमधले भारताचे प्रतिनिधी विशाल शर्मा यांना काल या सोहळ्यात प्रदान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्यात विशाल शर्मा यांचं मोठं योगदान आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संघालाही हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यभरात १४ हजार पुरुषांनी लाभ घेतल्याचं निदर्शनास आलं आहे. या सर्वांना पैसे परत करण्याची नोटीस राज्य सरकारनं बजावली असून, महिनाभरात पैसे परत न केल्यास, गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. योजना सुरू झाल्यापासून सुमारे साडे २१ कोटी रुपये या पुरुषांच्या खात्यात जमा झाले आहेत.

****

दरवर्षीप्रमाणेच यंदाही स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात येत आहे. सर्वांनी तिरंगा ध्वज फडकवावा, त्यासोबतचा आपला सेल्फी हर घर तिरंगा डॉट कॉम या संकेतस्थळावर अपलोड करावा, असं आवाहन सरकारनं केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही हर घर तिरंगा अभियान शाळांमध्ये राबवलं जाणार आहे. यामध्ये दोन ते आठ ऑगस्ट या पहिल्या टप्प्यात शाळेच्या भिंती आणि फलक तिरंगा प्रेरित चित्रांनी सजवणं, सैनिक तसंच पोलिस कर्मचाऱ्यांना राखी पाठवणं, नऊ ते १२ ऑगस्ट दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यात तिरंगा यात्रा तर १३ ते १५ ऑगस्टदरम्यान तिसऱ्या टप्प्यात ध्वजारोहण तसंच तिरंग्यासह सेल्फी काढून संकेतस्थळावर अपलोड करणं, आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

****

परभणी इथल्या ८९ वर्षीय कमलाबाई जोगड यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. जमा केलेली नेत्र बुबुळे जालना इथल्या नेत्र पेढीस पाठवण्यात आली. या वर्षातलं जिल्ह्यातलं हे दुसरं नेत्रदान आहे. नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करण्याचं आवाहन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी केलं.

****

छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण - म्हाडाच्या एक हजार ३४१ निवासी सदनिका आणि नाशिक मंडळातल्या ६७ सदनिका, अशा एकूण एक हजार ४०८ सदनिकांच्या सोडतीसाठी, येत्या ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अनामत रकमेसह प्राप्त अर्जांची येत्या २६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. म्हडा छत्रपती संभाजीनगर विभागाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी ही माहिती दिली.

****

परभणी जिल्ह्यातल्या मानवत आणि परभणी तालुक्यातल्या ५४ गावांना पाणी पुरवठ्यासंदर्भात सर्वेक्षण अहवाल तीन महिन्यात सादर करावा, असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी या कामातल्या दिरंगाई बद्दल तक्रार केली होती, त्यासंदर्भात विखे पाटील यांनी पाटबंधारे महामंडळाला हे निर्देश दिले.

****

नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यात मौजे इळेगाव इथं डेंग्यूचा रुग्ण आढळला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख तसंच जिल्हा हिवताप आणि हत्तीरोग अधिकारी डॉ अमृत चव्हाण यांनी या गावाला भेट देऊन सर्वेक्षण, धूर फवारणी, अळनाशक औषध फवारणीसह वैद्यकीय पथक स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केलं.

****

हवामान

दक्षिण मध्य महाराष्ट्रात तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पुढचे तीन दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments: