Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 06 August 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ ऑगस्ट २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर पाच
पूर्णांक पाच टक्के इतका कायम ठेवला आहे. बॅंकेच्या मुंबईत झालेल्या पतधोरण समितीच्या
बैठकीनंतर, गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही
माहिती दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत
कर्तव्य पथावरील कर्तव्य भवनाचं उद्घाटन करणार आहेत. कर्तव्य भवन हा सेंट्रल व्हिस्टाच्या
माध्यमातून घडवलेल्या व्यापक परिवर्तनाचा एक भाग आहे. प्रशासनिक प्रक्रिया सुव्यवस्थित
करण्यासाठी आणि गतिमान प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी सामान्य केंद्रीय सचिवालय इमारती
उभारण्याची सरकारची योजना असून, त्यापैकी कर्तव्य भवन
ही पहिली इमारत आहे. यामध्ये विविध मंत्रालयं आणि विभाग एकाच ठिकाणी आणण्यात आली आहेत.
****
झारखंडच्या गुमला जिल्ह्यातल्या
कामदारा इथं सुरक्षा बल, गुमला पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये
झालेल्या चकमकीत नक्षलवादी कार्यकर्ता
मार्टिन केरकेट्टा ठार झाला. त्याच्यावर १५ लाख रुपयांचं
बक्षीस होतं. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं
आणि स्फोटकं जप्त करण्यात आली.
****
उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात
धाराली इथं ढगफुटी होऊन मोठं नुकसान झालं असून, या भागात सैन्यदल आणि राज्य तसंच केंद्रीय आपत्ती प्रतिसाद
दलाच्या वतीनं मदत आणि बचावकार्य राबवलं जात आहे. आतापर्यंत १३० हून अधिक लोकांना सुरक्षित
ठिकाणी हलवण्यात आलं आहे, तसंच अन्न, पाणी, औषध आणि निवाऱ्याची व्यवस्था करून मदत शिबिर उभारण्यात
आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी
यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधून धारालीमध्ये सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्याची
माहिती घेतली.
****
सहकार क्षेत्राला गतीमान करुन सहकारी
संस्थांचं यशस्वी व्यावसायिक संस्थांमध्ये रुपांतर करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध
असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. पाच वर्षात देशात दोन लाख
बहुउद्देशीय सहकारी संस्था उभारण्याचं सरकारचं उद्दीष्ट असून, यामधल्या ३५ लाखांपेक्षा अधिक नवीन
सहकारी संस्था स्थापन झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. सहकार मंत्रालयाच्या सल्लागार
समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते.
****
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होऊन
तीन आठवडे झाल्यानंतरही विरोधकांच्या गदारोळामुळे कुठल्याच सभागृहात कामकाज होत नसल्याबद्दल
संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काल नाराजी व्यक्त केली. तीन आठवड्यांत संसदेत
एकही विधेयक मंजूर होऊ शकलं नाही असं ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. विरोधकांनी सहकार्य
करुन संसदेचं कामकाज सुरळीत चालू द्यावं असं आवाहन रिजिजू यांनी केलं.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. वैजापूर तालुक्यातल्या श्रीक्षेत्र देवगाव शनी इथं
आज योगिराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांचा १७८ वा अखडं हरिनाम सप्ताह सोहळ्यात ते
सहभागी होणार आहेत.
****
मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये
अतिरिक्त खेळ मिळवून देण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावर समिती स्थापन
करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या समितीत गृहविभागासह
संबंधित विभागांचे सचिव, निर्माते, मल्टिप्लेक्स मालक, चित्रपट महामंडळाचे प्रतिनिधी यांचा
समावेश असेल. या समितीने दीड महिन्यात अहवाल सादर करावा, असे निर्देशही शिंदे यांनी दिले.
****
राज्यातल्या सर्व कार्यालयांचं पॉश
ऑडिट करावी अशी मागणी, राज्य महिला आयोगानं
राज्य सरकारकडे केली आहे. यानुसार महिलांसाठी कामाचं ठिकाण म्हणून सुरक्षित आहे की
नाही, याची तपासणी व्हावी असं महिला आयोगाच्या
अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या. यामुळे कायद्याकडे दुर्लक्ष करणार्यांना, पळवाट शोधणाऱ्यांना चाप बसेल आणि
महिलांना सुरक्षित वातावरण मिळेल, असं त्या म्हणाल्या.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुलींचा
जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती, प्रशिक्षण आणि तपासणी
आदी उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले
आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्यात दर हजार मुलांमागे ९२७ मुली
असं प्रमाण आहे. मुलींच्या जन्मदरात गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाली असली तरी ही
वाढ समाधानकारक नसल्याचं ते म्हणाले. यासंदर्भात कायद्याच्या आधारे अपप्रवृत्तींवर
कारवाई करणं आणि मुलींच्या जन्माबाबत समाजाची
मानसिकता, दृष्टिकोन बदलवणं या
गोष्टीवर भर देणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले.
****
हिंगोली रेल्वे स्थानकार उभ्या असलेल्या
एका रेल्वे बोगीला आज सकाळी अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात
आली. मागील काही महिन्यांपासून यासह आणखी दोन बोगी रेल्वे स्थानकावर उभ्या आहेत.
****
धाराशिव शहर आणि परिसरात आज सकाळपासून
पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा आधार झाला असून, जिल्ह्यातली पाणी पातळी वाढण्यासही
मदत होत आहे. मागील काही दिवसांच्या खंडानंतर
पावसाची संततधार पुन्हा सुरू झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. छत्रपती
संभाजीनगर शहरातही अनेक दिवसांच्या खंडानंतर आज सकाळी जोरदार पाऊस झाला.
****
No comments:
Post a Comment