Thursday, 7 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 07 August 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      गेल्या दहा वर्षांत सरकारने सुधारणांचं पर्व राबवल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन, दिल्लीत कर्तव्य भवनाचं उद्घाटन

·      अश्लील सामग्री प्रसारित केल्याप्रकरणी ४३ ओटीटी वाहिन्यांवर प्रतिबंध, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती

·      मराठवाड्यातल्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

·      रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दर साडे पाच टक्क्यांवर कायम

·      उत्तराखंडात ढगफुटीमुळे आलेल्या आपत्तीत महाराष्ट्रातले ५१ नागरिक सुरक्षित

आणि

·      मराठवाड्यात धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांसह राज्यात १४ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

****

गेल्या दहा वर्षांत आपल्या सरकारने सातत्यपूर्ण, गतिमान आणि दूरदर्शी सुधारणांचं पर्व राबवल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल दिल्लीत विविध मंत्रालयांची नियोजित कार्यालयं असलेल्या कर्तव्य भवनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. सुशासन आणि विकासाचे स्रोत सुधारणांमध्ये दडलेले असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले...

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

व्यापारी नौवहन विधेयक २०२४ लोकसभेनं काल मंजूर केलं. केंद्रीय जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी हे विधेयक लोकसभेत मांडलं. भारतीय नौवहन क्षेत्राचा विकास आणि भारताच्या व्यावसायिक सागरी क्षेत्राच्या सर्वोत्तम पद्धतीने देखभाल सुनिश्चित करणं, हा या विधेयकाचा उद्देश आहे.

**

अश्लील सामग्री प्रसारित केल्याप्रकरणी ४३ ओटीटी वाहिन्यांना प्रतिबंधित करण्यात आल्याचं, माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल लोकसभेत सांगितलं. सरकारने २०२१ मध्ये संमत केलेल्या कायद्याचं पालन करणं सर्व ओटीटी वाहिन्यांना बंधनकारक असल्याचं, त्यांनी नमूद केलं.

****

मराठवाड्यातल्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यात देवगाव शनी इथं, योगीराज सदगुरु श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहात बोलत होते. समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचं काम याच वर्षात सुरू होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

या अखंड हरिनाम सप्ताहात सहभागी महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली. त्यांनी या जिव्हाळ्यासाठी सर्व लाडक्या बहिणींचे आभार मानले. या परिसरातल्या शनि बंधाऱ्याचं काम पूर्ण करण्याचं तसंच सराला बेटाचा विकास आराखडा मंजूर करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं, ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भक्कम पाठिंबा असल्याचं, शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी आपल्या पक्षाची ही भूमिका स्पष्ट केली...

बाईट - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

दरम्यान, शिंदे आणि शिवसेनेच्या सर्व खासदारांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन, केंद्रीय गृहमंत्री म्हणून सर्वाधिक काळ काम केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं.

****

बीड जिल्ह्याच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल बीड इथं विविध कामकाजाच्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यातल्या काही ठेवीदारांच्या ठेवी विविध पतसंस्थांमध्ये अडकलेल्या आहेत, त्या त्यांना परत मिळण्यासाठी सहकार विभाग, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने समन्वयाने कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली. जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समिती, जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या कामकाजाचाही पवार यांनी आढावा घेतला.

शासनाच्या विविध योजना सामान्य लोकांपर्यंत एका क्लिकमध्ये पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरु करण्यात आलेल्या चॅट बॉट आणि सेवा मित्र सुविधेचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालं.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दर साडे पाच टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर, गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी काल ही माहिती दिली. सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल उत्तम राहण्याचा अंदाज व्यक्त करत, एकूण देशांतर्गत उत्पन्न वाढीचा दर साडे सहा टक्के राहण्याचा अंदाजही मल्होत्रा यांनी वर्तवला.

****

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हीव्हीपॅट शिवाय घेऊ नयेत, ही यंत्र उपलब्ध नसतील तरच मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. निवडणुका पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी व्हीव्हीपॅटची आवश्यकता असल्याचं वडेट्टीवार म्हणाले.

****

उत्तराखंडात भीषण ढगफुटीमुळे आलेल्या आपत्तीत महाराष्ट्रातले ५१ नागरिक सुरक्षित आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या १२ नागरिकांचा समावेश असल्याची माहिती, राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानं दिली आहे.

दरम्यान, या आपत्तीत बचाव कार्य करणारे सेनेचे एक अधिकारी आणि आठ सैनिक बेपत्ता असल्याचं, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे मोहसीन शाहिदी यांनी सांगितलं. आतापर्यंत १९० जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून, त्यांच्यासाठी अन्न, पाणी आणि औषधाची सोय करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तराखंडचे वित्त सचिव दिलीप जवळकर तसंच पोलीस महानिरीक्षक निलेश भरणे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रातल्या पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली.

****

राज्यातल्या विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, यासाठी एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. काल मंत्रालयात यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात एनसीसीची प्रशिक्षण केंद्रं वाढवण्यात येतील तसंच अधिक शाळांमधले विद्यार्थी यात सहभागी व्हावेत, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं भुसे यांनी सांगितलं.

****

महसूल सप्ताहानिमित्त काल जालना जिल्ह्याच्या परतूर इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तसंच विविध योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं.

****

स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने लातूर जिल्ह्यात व्यापक स्वरूपात दोन दिवसीय वृक्षारोपण मोहीम राबली जाणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली. दरम्यान, सलग दोन वर्षे क्षयरोगमुक्त राहिलेल्या ३२ ग्रामपंचायतींचा काल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रौप्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचं, त्यांनी नमूद केलं.

****

बीड जिल्हा परिषदेच्या नैसर्गिक शेती प्रोत्साहन योजने अंतर्गत ५० टक्के अनुदानासह गांडुळ खत निर्मिती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असं आवाहन जिल्हा परिषदेनं केलं आहे. यासाठी येत्या ३१ ऑगस्ट पर्यंत पंचायत समितीत अर्ज सादर करता येणार आहेत.

****

पुणे विमानतळावर सीमाशुल्क विभागाने काल केलेल्या एका कारवाईत सहा किलो ११९ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले. या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत अंदाजे सहा कोटी रुपये असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

हवामान

मराठवाड्यातल्या धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांसह राज्यात १४ जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

****

No comments: