Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 08
August 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ ऑगस्ट २०२५ दुपारी १.०० वा.
****
विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे संसदेचं
कामकाज आजही बाधित झालं.
राज्यसभेचं कामकाज सुरु झाल्यावर भारत छोडो चळवळीदरम्यान
स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. उद्या, नऊ ऑगस्ट रोजी ऐतिहासिक भारत छोडो चळवळीचा ८३ वा वर्धापन
दिन आहे, जो देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या
अथक संघर्षाचा एक निर्णायक अध्याय होता, असं उपसभापती हरीवंश यावेळी म्हणाले.
त्यानंतर उपसभापतींनी विरोधकांनी विविध मुद्यांवर दिलेले
२० स्थगन प्रस्ताव फेटाळून लावत असल्याचं सांगितलं. त्यामुळे विरोधकांनी समोर येऊन
घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. राज्यसभेत सतत व्यत्यय येत असल्याने ५६ तासांहून अधिक
वेळ वाया गेल्याचं सांगून, हरीवंश यांनी सदस्यांना कामकाज सुरु ठेवण्याचं आवाहन केलं. मात्र
गदारोळ वाढत गेल्यानं सदनाचं कामकाज आधी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी
स्थगित झालं.
लोकसभेतही भारत छोडो आंदोलनादरम्यान स्वातंत्र्यासाठी
लढणाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. याबद्दल बोलताना अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले –
बाईट – ओम बिर्ला, अध्यक्ष, लोकसभा
सभागृहाने माजी सदस्य सत्यपाल मलिक यांनाही श्रद्धांजली
वाहिली. त्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न
केला. मात्र विरोधी पक्षांनी बिहारमधल्या मतदारयादी पुनरिक्षणाच्या मुद्यावर चर्चेची
मागणी लाऊन धरली. बिर्ला यांनी सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल नाराजी व्यक्त
केली. गोंधळ सुरूच राहिल्याने लोकसभेचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत, आणि नंतर दुपारी तीन वाजेपर्यंत स्थगित झालं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा दहा तारखेला अमृतसर ते श्रीमाता
वैष्णोदेवी कटरा दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन करणार आहेत. ही गाडी मंगळवार
व्यतिरिक्त इतर सर्व दिवशी धावणार असून, जम्मू, पठाणकोट कँट, जालंधर आणि व्यास या स्थानकांवर थांबणार आहे.
****
उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यातल्या धाराली परिसरात झालेल्या भीषण ढगफुटीनंतर मदत आणि बचाव कार्य
युद्धपातळीवर सुरू आहे. भारतीय हवाई दलाने आतापर्यंत २२६ नागरिकांना सुरक्षितस्थळी
हलवण्यात आलं आहे. सुमारे २० टन मदत साहित्य प्रभावित भागात पोहोचवण्यात आल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर
घर तिरंगा मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन
करण्यात आलं आहे.
****
बनावट शालार्थ आयडी तयार करुन बोगस शिक्षक भरती केल्याप्रकरणी
राज्य सरकारने राज्य सरकारने विशेष चौकशी पथकाची स्थापना केली आहे. पुण्याचे विभागीय
आयुक्त चंद्रकांत कुणकुणवार यांच्या नेतृत्वाखाली ही समिती नाशिक, जळगाव, मुंबई, बीड आणि लातूरच्या शिक्षक भरतीची चौकशी करुन तीन महिन्यात आपला
अहवाल सादर करणार आहे.
****
राज्यात अनेक भागांमध्ये केळीला समाधानकारक दर मिळत नसताना
बुलडाणा जिल्ह्यातली केळी थेट इराणमध्ये गेली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्णपणे उध्वस्त
झालेलं उभ्या शेतातलं पिक आदिवासीबहुल संग्रामपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्ण नियोजनानं नव्या जोमानं उभं केलं. हा अभिनव
प्रयोग संपूर्ण राज्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श निर्माण करणार आहे.
****
सामाजिक न्याय विभाग आणि बीड जिल्हा परिषदेच्या संयुक्त
प्रयत्नातून ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं उद्घाटन
काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. मिशन साथिया असं या योजनेचं नाव असून, त्याद्वारे ऊसतोड कामगारांच्या टोळी मधल्या एका महिलेला
आरोग्य सेवेचं प्रशिक्षण आणि आरोग्य किट देण्यात येणार आहेत. अशा एक हजार किटचं वितरणही
काल करण्यात आलं.
****
श्रावण पौर्णिमा अर्थात नारळी पौर्णिमा आज साजरी होत आहे.
आषाढ महिन्यात खवळलेला समुद्र श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या सुमारास शांत होतो.
यापुढे मासेमारी करण्यासाठी उत्तम काळ जावा याकरता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मासेमार
बांधव सोन्याचा प्रतिकात्मक नारळ अर्पण करुन समुद्राची पूजा करतात.
दरम्यान, राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना काल आदिवासी महिलांनी बांबूपासून
तयार केलेली राखी बांधली. दृष्टिहीन विद्यार्थिनी, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनी, मुंबई महानगरपालिके अंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी
काल राज्यपालांना राखी बांधली.
****
परभणी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सर्वदूर संततधार पाऊस
सुरू आहे. अनेक दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. फुलोऱ्यात आलेलं सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून, ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत.
****
No comments:
Post a Comment