Friday, 8 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 August 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०८ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्ष २०२५-२६ साठी १२ हजार ६० कोटी रुपये अनुदान कायम ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

·      भारत छोडो आंदोलनातल्या स्वातंत्र्यसैनिकांना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आदरांजली, विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज बाधित

·      राज्यातल्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची गतीने उभारणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश, पुण्यात विविध प्रकल्पांचं उद्घाटन

·      छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातल्या प्रलंबित कामांसाठी निधी मिळवण्यासाठी प्रयत्म करण्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं आश्वासन

आणि

·      देशभरात हर घर तिरंगा मोहिमेला सुरुवात

****

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्ष २०२५-२६ साठी १२ हजार ६० कोटी रुपये अनुदान कायम ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत १० कोटी ३३ लाखांहून अधिक कुटुंबांना फायदा झाला असल्याचं त्यांनी सांगितलं.

बाईट - अश्विनी वैष्णव, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री

 

सरकारने आय ओ सी एल, बी पी सी एल आणि एच पी सी एल या तीन सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांना ३० हजार कोटी रुपयांची भरपाई देखील मंजूर केली आहे. घरगुती एलपीजीच्या विक्रीतून झालेल्या अंडर-रिकव्हरीसाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.

तांत्रिक शिक्षणातल्या बहुविध शैक्षणिक आणि संशोधन सुधारणा योजनेसाठी चार हजार २०० कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीस, तसंच आसाम आणि त्रिपुरासाठी सध्याच्या केंद्रीय क्षेत्र विशेष विकास पॅकेज योजनेअंतर्गत चार हजार २५० कोटी रुपयांच्या एकूण खर्चासह ४ नवीन घटकांनाही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

****

भारत छोडो आंदोलनातल्या स्वातंत्र्यसैनिकांना आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आदरांजली

वाहण्यात आली. महात्मा गांधीजींनी पुकारलेल्या या आंदोलनाला उद्या ८३ वर्ष होत असून देशाच्या अविरत स्वातंत्र्यलढ्याचा हा निर्णायक टप्पा होता, असं राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी सांगितलं.

लोकसभेत याबद्दल बोलताना अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले

बाईट - ओम बिर्ला, अध्यक्ष, लोकसभा

 

दरम्यान, बिहारमधल्या मतदार यादी पुनरिक्षणाच्या मुद्यावरुन विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज बाधित झालं. राज्यसभा आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झाली.

लोकसभेचं कामकाजही दोन वेळच्या तहकुबीनंतर दुपारी तीन वाजता पुन्हा सुरु झालं. त्यानंतरही बिहारच्या मुद्यावरुन विरोधकांनी घोषणाबाजी करण्यास सरुवात केली. या गोंधळातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर विधेयक २०२५ परत घेण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र गदारोळ वाढत गेल्यानं सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं.

****

खतांची तस्करी आणि साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही रसायने आणि खत मंत्री जे पी नड्डा यांनी आज लोकसभेत दिली. खतांना जीवनावश्यक वस्तूंचा दर्जा कायद्यानं दिलेला असून, राज्य सरकारांना त्याअंतर्गत काळाबाजार रोखण्यासाठी पुरेसे अधिकार दिल्याचं नड्डा यांनी सांगितलं.

****

पूर्व नियोजन, कालमर्यादा, पारदर्शकता, गुणवत्ता आणि विविध विभागांच्या समन्वयाच्या माध्यमातून राज्यातल्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची गतीने उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पुण्यात आज यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी इथं पायाभूत सुविधा विकास प्रकल्प प्रशिक्षणाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्याच्या अर्थव्यवस्थेची एक ट्रिलियन डॉलरकडे सुरू असलेली वाटचाल अधिक गतीने होण्यासाठी राज्यात पायाभूत सुविधा विकास प्रकल्प महत्वाचे आहेत. राज्याने रस्ते, रेल्वे, पूल, भुयारी मार्गासह विविध अभियांत्रिकी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने शहरात उभारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि नवीन उपक्रमाच्या उद्घाटनही आज त्यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. येणाऱ्या काळात अंमली पदार्थांवर अंकुश लावणं हे पोलिसांपुढील सगळ्यात मोठं आव्हान असून, त्यासाठी खूप मोठी लढाई लढावी लागेल, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

****

राखीपौर्णिमेचा सण उद्या साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रक्षाबंधनाचा पवित्र सण भावा-बहिणींमधलं प्रेम आणि विश्वासाच्या अद्वितीय बंधनाचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा सण भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि नैतिक मूल्ये जपण्याची संधी असून, महिलांच्या हक्कांचं रक्षण करण्याचा आणि त्यांचा आदर करण्याचा प्रत्येकाचा दृढनिश्चय बळकट करतो, असंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, श्रावण पौर्णिमा अर्थात नारळी पौर्णिमा आज साजरी होत आहे. यापुढे मासेमारी करण्यासाठी उत्तम काळ जावा याकरता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मासेमार बांधव आजच्या दिवशी सोन्याचा प्रतिकात्मक नारळ अर्पण करुन समुद्राची पूजा करतात.

****

छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीमध्ये आलेल्या रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी तसंच प्रलंबित कामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं. घाटी रुग्णालयाला आज भेट दिल्यानंतर ते बोलत होते. विविध वॉर्डात जाऊन त्यांनी रुग्णांशी संवाद साधत आरोग्यसेवा जाणून घेतली. यावेळी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी घाटीत सुरु असलेल्या विविध विकामकामं, उपक्रमांची माहिती दिली.

****

येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

जालना जिल्ह्यात हर घर तिरंगा, हर घर स्वच्छतामोहीम उत्साहात राबवण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी केलं आहे. स्वच्छ भारत मिशन आणि जलजीवन मिशन अंतर्गत स्वच्छता, जलसंवर्धन, जनजागृती उपक्रम, तसंच १५ ऑगस्ट रोजी अमृत सरोवर आणि सार्वजनिक स्थळी ध्वजारोहणाचं आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायती, स्थानिक संस्था, स्वयंसेवक आणि नागरिकांनी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

बनावट शालार्थ आयडी तयार करून बोगस शिक्षक भरती केल्याप्रकरणी राज्य सरकारने राज्य सरकारने विशेष चौकशी पथकाची स्थापना केली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नेतृत्वाखाली ही समिती नाशिक, जळगाव, मुंबई, बीड आणि लातूरच्या शिक्षक भरतीची चौकशी करुन तीन महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक राख्या तयार केल्या आहेत. धान्यापासून बनवलेल्या या राख्यांविषयी जाणून घेऊया आमच्या वार्ताहरांकडून

यामध्ये कृषीसंस्कृती, निसर्गाचे नाते आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन दिसून येतो. विद्यार्थ्यांनी तयार केलेली राख्या या तांदूळ, काळे तीळ आणि फुलांच्या पाकळ्यांपासून तयार केल्या आहेत. या पर्यावरण पूरक राख्यांतून शेतीमालाचे कौतूक करतानाच सर्व सण, उत्सव हे पर्यावरणस्नेही स्वरूपाने साजरे झाल्यास निसर्गाचा समतोल राखता येतो याचा संदेश देत आहेत. या राख्या तयार करताना विद्यार्थ्यांनी जोपासलेली कलेची, सृजनशीलतेची आणि भारतीय संस्कृतीची अनोखी सांगड दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या राख्यांचे प्रदर्शन शाळेत भरविण्यात आले आहे.

आकाशवाणी बातम्यांसाठी, रमेश कदम, हिंगोली.

****

बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी आज जिल्ह्यातल्या ४९ पोलीस नाईकांना पोलीस हवालदार पदावर आणि २० पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती दिली. त्यांनी या सर्व पोलीस अंमलदारांचं अभिनंदन केलं.

****

महाराष्ट्र फेन्सींग असोसिएशन आणि हिंगोली जिल्हा फेन्सींग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २७ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय कनिष्ठ तलवारबाजी स्पर्धेचं उद्घाटन आज आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते झालं. ५०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

****

बीड जिल्ह्यात केज जवळ पोलिसांनी आज तब्बल एक कोटी रुपयांचा गुटखा पकडला. यावेळी एक कोटी एक लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

परभणी जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंड प्रवृत्तीचे तसंच जिवितास आणि मालमत्तेस धोका निर्माण करणाऱ्या सहा जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं आहे. यापुढेही जिल्ह्याच्या सार्वजनिक शांतेतस धोका निर्माण करणाऱ्या, सामान्य जनतेस वेठीस धरणाऱ्या, अवैध धंदे करणाऱ्या, प्रशासनास वेठीस धरणाऱ्या गुंड प्रवृत्तीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी कायदेशीर आणि सनदशीर मार्गाचा अवलंब करावा, असं आवाहन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केलं.

****

No comments: