Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 August 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
रक्षाबंधन
सणाचा सर्वत्र उत्साह-राख्या, भेटवस्तू आणि मिठायांनी बाजारपेठा फुलल्या
·
भारताची
संरक्षण क्षेत्रातली निर्यात पुढच्या दोन ते तीन वर्षांत ४५ हजार कोटी रुपयांवर पोहोचणार
·
भारतीय
रेल्वेची ‘राउंड ट्रिप पॅकेज’ योजना-प्रवाशांना परतीच्या प्रवासभाड्यात २० टक्के सवलत
आणि
·
लोकसभा
निवडणुकीत कथित बनावट मतदान प्रकरणी विरोधी पक्षांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चाचा
इशारा
****
भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन
आज सर्वत्र साजरा होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी रंगीबेरंगी राख्या,
भेटवस्तू,
मिठाईने बाजारपेठा फुलल्या आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,
तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
रक्षाबंधना निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भावाबहिणीतलं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक असलेला हा सण आपल्या समृद्ध परंपरेचा ठेवा
असल्याचं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
दिल्लीतल्या निवासस्थानी लहान मुलांबरोबर रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दृष्टिहीन विद्यार्थिनी,
ठाणे,
रायगड आणि पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी
विद्यार्थिनी तसंच महिला बचतगटाच्या सदस्य आणि शालेय विद्यार्थिनींनी मुंबईत राजभवन
इथं राज्यपालांना राखी बांधून औक्षण केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
मुंबईत लाडक्या बहिणींसोबत रक्षाबंधनाचा सोहळा साजरा केला. महिलांनी मुख्यमंत्र्यांना
राखी बांधून या सणाच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
ठाणे इथं सकाळ वृत्तपत्र समूहाच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात महिलांनी शिंदे यांना राखी
बांधून हा सण साजरा केला.
****
छत्रपती संभाजीनगर इथं दामिनी पथकातील
महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना राखी बांधून
हा सण साजरा केला. दानवे यांनी औक्षण केल्यानंतर महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना भेट
वस्तू दिल्या. यावेळी पोलिस आयुक्त प्रविण पवार आणि उपायुक्त भास्कर नवले उपस्थित होते.
****
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशाचं संरक्षण
उत्पादन एक लाख ५१ हजार कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलं आहे. संरक्षण मंत्री
राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. गेल्या वर्षीपेक्षा ही उत्पादनवाढ
१८ टक्के जास्त आहे. याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी संरक्षण उत्पादन विभाग आणि इतर संबंधितांचं
कौतुक केलं आहे.
दरम्यान,
भारताची संरक्षण क्षेत्रातली निर्यात
पुढच्या दोन ते तीन वर्षांत ४५ हजार कोटी रुपयांवर पोहोचेल,
असा विश्वास,
संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे
सचिव डॉ समीर कामत यांनी व्यक्त केला आहे. ते आज पुण्यात उन्नत संरक्षण तंत्रज्ञान
संस्थेच्या दीक्षांत सोहळ्यानंतर बोलत होते. पश्चिम तसंच दक्षिण आशियाई देशांसह आफ्रिकेतल्या
देशांमधूनही भारतीय संरक्षण साहित्याला मोठी मागणी असल्याचं डॉ कामत यांनी सांगितलं.
दरम्यान, या
सोहळ्यात पदवी प्रदान केलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ कामत यांनी,
सर्व नूतन पदवीधरांना राष्ट्रप्रथम
या कर्तव्य भावनेनं काम करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले...
बाईट - डॉ समीर कामत, सचिव, संरक्षण संशोधन आणि विकास विभाग
****
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतानं पाकिस्तानची
सहा विमानं पाडल्याची माहिती हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी दिली
आहे. ते आज बेंगळुरू इथं एका व्याख्यानात बोलत होतेही कारवाई जवळपास ३०० किलोमीटर अंतरावरून
केल्याचं सांगून जमिनीवरून हवेत मारा करण्याचा हा उच्चांक असल्याचंही सिंह यांनी नमूद
केलं. शाहबाज जेकोकाबाद हवाई तळावर भारतानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात काही विमानांचं
नुकसान झाल्याचंही ते म्हणाले.
****
आज ऑगस्ट क्रांतीदिन. राष्ट्रपिता महात्मा
गांधींच्या नेतृत्वाखालील भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या शूर सैनिकांना पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. यांच्या साहसामुळेच लोकांमध्ये देशभक्तीची
भावना आणि स्वातंत्र्याची इच्छा जागृत झाली, असं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं
आहे.
काकोरी रेल्वे कारवाईलाही आज शंभर वर्ष
होत आहेत. पंतप्रधानांनी या कारवाईत सहभागी सर्व क्रांतिकारकांना अभिवादन केलं आहे.
मुंबईत गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य
टिळक पुतळ्यापासून पदयात्रा काढण्यात आली. यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्यासह काँग्रेस आणि सामाजिक संघटनांनी
पदयात्रा काढत हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या केएसआर
बेंगळुरू रेल्वेस्थानकावरून तीन नवीन वंदे भारत गाड्यांचा शुभारंभ करणार आहेत. यात
नागपूर जिल्ह्यातल्या अजनी ते पुणे, बेंगळुरू-बेळगाव आणि कटरा-अमृतसर वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश
आहे.
अजनी पुणे ही रेल्वे वर्धा-अकोला-शेगाव-भुसावळ-जळगाव-मनमाड
-पुणतांबा आणि दौंड मार्गे धावणार आहे. मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस सकाळी सहा
वाजून पंचवीस मिनिटांनी पुणे इथून सुटून संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी अजनी
इथं पोहचेल. तसंच अजनी इथून सोमवार वगळता इतर सहा दिवस सकाळी नऊ वाजून ५० मिनिटांनी
सुटून रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी पुणे इथं पोहोचेल.
नागपुर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला
बुलडाणा जिल्हयातल्या संतनगरी शेगांव मध्ये थांबा मिळाला आहे,
यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांनी
केंद्रीय रेल्वे मंत्री
आश्विनी वैष्णव यांची भेट घेवून मागणी केली होती.
****
भारतीय रेल्वे ‘राउंड ट्रिप पॅकेज’
नावाची योजना सुरू करणार आहे. या अंतर्गत प्रवाशांना परतीच्या प्रवासात तिकिट दरात
२० टक्के सवलत दिली जाईल. दोन्ही बाजूंच्या प्रवासाचं आगाऊ तिकीट घेतल्यावरच ही सवलत
लागू होईल, या
योजने अंतर्गत आरक्षित केलेलं तिकीट रद्द केल्यावर त्याचा परतावा दिला जाणार नाही.
ऑक्टोबर १३ या तारखेपासूनची परतीची
तिकिटं येत्या १४ ऑगस्ट पासून आरक्षित करता येतील. एकदिशा प्रवासाकरता आगाऊ आरक्षण
केवळ ६० दिवस आधी उपलब्ध असलं तरी परतीच्या प्रवासाचं तिकिट काढताना ६० दिवसांचा आगाऊ
आरक्षण कालावधी लागू होणार नाही.
****
उत्तरकाशीमध्ये धाराली इथं अडकलेल्या
महाराष्ट्रातल्या सर्व पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचं आपत्तीव्यवस्थापन
मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे. आज सकाळी पूरग्रस्त भागातल्या ७४ नागरिकांची
सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असल्याचं महाजन यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीत बनावट मतदानाचा आरोप
करत, विरोधी
पक्षांनी परवा सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा
दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नागपूर
इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
सदर निवडणुकीत बनावट मतदान झाल्याचं
सादरीकरण लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सखोल अभ्यास करून केलं आहे,
मात्र निवडणूक आयोगानं गांधी यांना
शपथपत्र सादर करायला सांगितलं, हे योग्य नाही असं मत पवार यांनी मांडलं. राहुल गांधी यांनी
केलेल्या आरोपासंदर्भात निवडणूक आयोगानं सखोल चौकशी करायला हवी,
अशी मागणी पवार यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
विरोधकांचे हे आरोप फेटाळून लावत, असं शपथपत्र देण्याला हरकत नसावी,
असं नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान,
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पक्ष आजपासून राज्यभरात जनजागृती अभियान राबवणार आहे. राज्यात पन्नास टक्के लोकसंख्या
तरुणांची असून त्यांच्यासमोर असलेल्या असंख्य प्रश्नांची सोडवणूक करायची गरज आहे,
त्यादृष्टीने हे अभियान राबवलं जात
असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.
****
जालना जिल्ह्यातल्या जाफ्राबादच्या
विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. शहरातल्या
पाणी पुरवठा योजना, बसस्थानक,
ई-बस चार्जिंग स्टेशन या विकास कामांचा
भूमिपूजन सोहळा आज महसूलमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यात
पाणी पुरवठा योजनेसाठी ४९ कोटी ४३ लाख, बसस्थानक बांधकामासाठी पाच कोटी रुपये आणि ई-बस चार्जिंग स्टेशनसाठी
तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. यावेळी खासदार
डॉ कल्याण काळे, आमदार
संतोष दानवे, माजी
केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
****
आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी
बांधवांनी आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात माजी
मंत्री शिवाजीराव मोघे, आदिवासी
युवक कल्याण संघाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्यासह अनेक नेते
सहभागी झाले होते.
****
No comments:
Post a Comment