Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 09
August 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ ऑगस्ट २०२५ दुपारी १.०० वा.
****
भारतीय रेल्वे राउंड ट्रिप पॅकेज योजना सुरू करणार आहे, या योजनेत प्रवाशांना परतीच्या प्रवासात २० टक्के सूट
दिली जाईल. प्रवासाला जाण्याची आणि येण्याची तिकिटं आरक्षित करणारे प्रवासी किंवा त्यांच्या
गटासाठी या योजनेअंतर्गत सवलत लागू राहील. या योजनेअंतर्गत तिकिट आरक्षित केल्यानंतर
त्याचे भाडे परत केले जाणार नाही. १३ ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीसाठी या योजनेअंतर्गत
बुकिंग १४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. परतीच्या प्रवासासाठी तिकिटे बुक करताना ६० दिवसांचा
आगाऊ आरक्षण कालावधी लागू होणार नाही, असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे.
****
निवडणूक आयोगावरील आक्षेपांवर आयोगाचंच उत्तर अपेक्षित
असून अन्य कुठल्याही पक्षाची त्यावरील प्रतिक्रिया अपेक्षित नाही, असं राज्यसभा खासदार- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत
होते.
महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाबाबत
काँग्रेस नेते -लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले प्रश्न दुर्लक्षित
करून चालणार नाही. यासंदर्भात राहुल यांनी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी केलेलं सादरीकरण
पाहण्यासाठी आपण स्वतः, फारूख अब्दुल्लांसोबत मागिल रांगेत बसलो. सादरीकरण नीट बघण्यासाठी उद्धव ठाकरेही मागच्या रांगेतच बसले. मात्र,त्यांच्या बसण्यावरुन जास्त चर्चा झाली .वास्तविकत: सादरीकरणावर
सखोल विचाराची गरज असल्याचं पवार म्हणाले.
अजित पवार गटाशी युतीबाबत बोलताना भाजपसोबत असणाऱ्यांसोबत
आम्ही कधीच जाणार नाही असं सांगून महाविकास आघाडीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या
निवडणुकीतील आघाडींबाबत अद्याप कुठलीही चर्चा झाली नसल्याचं ते म्हणाले.
****
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील मैलाचा दगड ठरलेल्या भारत
छोड़ो आंदोलनाच्या स्मृतींना उजाळा देण्यात येत आहे. या आंदोलनाला आज रोजी ८३ वर्ष
पूर्ण होत आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वातील
या आंदोलनात सहभागी स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्याचं स्मरण सामाजिक माध्यमावरील संदेशातून
केलं आहे. काल संसदेच्या दोन्ही सभागृहांत भारत छोडो आंदोलनातल्या स्वातंत्र्यसैनिकांना
आदरांजली वाहण्यात आली.
दरम्यान, आज क्रांती दिनानिमित्त छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या
वतीनं या लढ्यातील विरांना अभिवादन करण्यात आलं. क्रांती चौक इथं छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या पुतळ्यासह शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आलं.
****
बहिण-भावाचं नातं वृद्धींगत करणाऱ्या रक्षाबंधन अर्थात
श्रावणी पौर्णिमेनिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हा सण महिलांच्या अधिकारांचं रक्षण आणि त्यांच्या सन्मानाच्या संकल्पाला अधिक मजबूत करतो तसंच भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशासह नितीमुल्यांना
संरक्षित करतो असं राष्ट्रपतींनी नमूद केलं.
****
राखीपौर्णिमेनिमित्त छत्तीसगडमधील बिलासपूर इथून ‘ऑपरेशन
सिंदूर’च्या संकल्पनेवर आधारित, तब्बल ३५ किलो वजनाची, ३० फूट लांब आणि सहा फूट रुंद अशी भव्य राखी श्री साई चरणी अर्पण
करण्यात आली. ही अनोखी राखी सुप्रसिद्ध कलाकार दिलीप दिवाकर पात्रीकर यांनी १५ दिवसांत
साकारली.
****
जालना जिल्ह्यातल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यासंदर्भात
गुन्हा नोंदवण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. जालना इथं
जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत काल त्यांनी हे आदेश दिले असून शेतकऱ्यांच्या भावनांशी
कुणीही खेळू नये, असं त्यांनी म्हटलं
आहे.
जालना जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या काळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना
शासनाकडून दिलेल्या अनुदान वाटपात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे
प्राप्त झाल्या होत्या. यानंतर तपासात जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानामध्ये
तहसीलदारांचे लॉगिन आणि पासवर्ड वापरून सुमारे ४० कोटींचा घोटाळा तलाठी, लिपिकासह कृषी सहायकांनी केल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणात
१७ तलाठ्यांसह २२ महसूल कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
****
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुणे नजिक
चाकण औद्योगिक क्षेत्राची पाहणी करुन नागरी समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी चाकण, हिंजवडी तसंच उरळी देवाची-फुरसुंगी-मांजरी मिळून एक अशा
तीन महापालिका करण्याचं नियोजन करावं लागणार असल्याचं नमूद केलं. या भागातील नागरी
सोयी-सुविधांसाठी काळानुरूप निर्णय घ्यावे लागतील असं ते म्हणाले.
****
दुसऱ्यांसाठी जीवन देणाऱ्या अवयवदानासारख्या महत्त्वपूर्ण
विषयावर जनजागृती करण्यासाठी अकोला जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या पुढाकारानं व्यापक
मोहिमेला सुरुवात झाली आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टपर्यंत ही मोहीम राबविण्यात
येणार आहे. देहदान महादान, दुसऱ्याला जीवनदान हे यंदाच्या मोहिमेचे घोषवाक्य आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या केजजवळ पोलिसांनी सुमारे एक कोटी रुपयांचा
गुटखा जप्त केला. ही कारवाई काल करण्यात आली असून याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
****
१९ वर्षांखालील आशियाई मुष्ठीयुद्ध स्पर्धेत आज बँकॉकमध्ये
झालेल्या उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर, सात महिलांसह दहा भारतीय मुष्ठीयोद्धे सुवर्णपदकासाठी लढतील.
****
No comments:
Post a Comment