Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 08 August 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ ऑगस्ट २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर
देशभरात हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच आणि गावकऱ्यांनी सहभागी होऊन, मोठ्या उत्साहात ही मोहीम राबवण्याचं
आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी केलं आहे.
****
देशातल्या रस्ते वाहतूक सुविधा जागतिक
दर्जाच्या होत असल्यामुळे प्रवासाच्या वेळेत बचत होत आहे, तसंच पर्यावरणाचंही रक्षण होत असल्याचं
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. भारतीय बांधकाम
साहित्य उत्पादन संघटनेच्या ७५व्या वार्षिक परिषदेत ते काल बोलत होते. सरकार रस्ते
वाहतूक सुविधांचा जागतिक दर्जा कायम राखण्यावर भर देत असल्याचं सांगून पर्यावरण रक्षणासाठी
उद्यजिकांनी डिझेलचा वापर कमी करावा, असं आवाहन गडकरी यांनी
केलं.
****
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतले विरोधी
पक्षनेते, राहुल गांधी यांनी काल पुन्हा एकदा
निवडणूक आयोगावर टीका केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी दरम्यान मोठ्या प्रमाणावर
गडबड करण्यात आल्याचं गांधी यांनी म्हटलं आहे. दरम्यान राहुल गांधी यांचं वक्तव्य म्हणजे
संविधानिक संस्थांचाच नाही, तर मतदारांचा अपमान असल्याचं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे; तर याबाबत राहुल गांधी यांनी आपलं म्हणणं प्रतिज्ञापत्रावर
देण्याची मागणी निवडणूक आयोगाने केली आहे.
****
अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्के
आयात शुल्काचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
काल मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेतली. अमेरिकेच्या शुल्कवाढ धोरणामुळे राज्यातल्या निर्यातप्रधान
उद्योगांवर होणारे संभाव्य परिणाम, तसंच जागतिक बाजारातील
स्पर्धात्मकतेवर होणारे परिणाम याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातल्या उद्योगांचं हित आणि
अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारशी तातडीनं समन्वय साधून आवश्यक उपाययोजना
आखल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या अधिकाधिक आस्थापनांनी
स्प्री अर्थात, स्किम फॉर प्रमोशन ऑफ
रेजिगनेशन ऑफ एम्प्लॉयर्स ॲण्ड एम्प्लॉयी, या योजनेचा लाभ घेऊन कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडे कामगारांची
नोंदणी करावी असं आवाहन विमा आयुक्त रामजी लाल मीना यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित
वार्ताहर परिषदेत ते काल बोलत होते. या योजनेंतर्गत १० पेक्षा अधिक लोक काम करत असलेल्या
विविध आस्थापनांना इएसआयसीच्या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. नोंदणीपूर्वीच्या कालावधीसाठी
त्यांच्याकडून कुठलाही दंड किंवा शुल्क आकारलं जाणार नाही, जुने हफ्ते भरावे लागणार नाहीत, जुने ऑडिट होणार नाही किंवा नोंदणी
पूर्व कालावधीसाठी कुठल्याही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार नाही. याशिवाय ऑक्टोबरपासून
एक योजना सुद्धा सुरू होणार असून, याअंतर्गत इएसआयसी आणि नोंदणीकृत संस्था यांच्यातील न्यायालयात
गेलेले वाद तडजोडीनं सोडवले जाणार आहेत.
****
सामाजिक न्याय विभाग आणि बीड जिल्हा
परिषदेच्या संयुक्त प्रयत्नातून ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्यासाठी राबवण्यात येणाऱ्या
उपक्रमाचं उद्घाटन काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. मिशन साथिया असं
या योजनेचं नाव असून, त्याद्वारे ऊसतोड कामगारांच्या
टोळी मधल्या एका महिलेला आरोग्य सेवेचं प्रशिक्षण आणि आरोग्य किट देण्यात येणार आहेत.
अशा एक हजार किटचं वितरणही काल करण्यात आलं.
****
नारळी पौर्णिमेचा सण आज राज्यात उत्साहात
साजरा करण्यात येत आहे. दरम्यान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना काल आदिवासी महिलांनी
बांबूपासून तयार केलेली राखी बांधली. दृष्टिहीन विद्यार्थिनी, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनी, मुंबई महानगरपालिके अंतर्गत महिला
बचत गटाच्या सदस्यांनी काल राज्यपालांना राखी बांधली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६ कृषी
सेवा केंद्रांनी ऑफलाईन पद्धतीने खतांची विक्री केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
अनुदानित खतांची विक्री, ई-पॉस प्रणालीद्वारे
करणं बंधनकारक आहे, शेतकऱ्यांनी देखील अनुदानित
खतांची खरेदी करताना ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करावा, असं आवाहन कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी केलं
आहे.
****
जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून
नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेतील
दुर्गम भागातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी काल रन फॉर आदिवासी मॅरेथॉन स्पर्धेचं
आयोजन करण्यात आलं होतं. राज्यभरातल्या ६०९ खेळाडूंनी यात सहभाग घेतला होता.
****
राज्यात काल मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक
ठिकाणी पाऊस पडला. पुढच्या दोन दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी
पाऊस पडण्याचा असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यासाठी आज तर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासाठी पुढील
दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment