Saturday, 9 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 August 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी १२ हजार ६० कोटी रुपये अनुदान कायम ठेवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

·      पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची गतीने उभारणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश 

·      राज्यातली सर्व शासकीय बांधकामं आता कृत्रिम वाळूचा वापर करून बांधली जाणार

·      स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर घर तिरंगा मोहिमेला कालपासून सुरुवात

आणि

·      आज रक्षाबंधन-विविध प्रकारच्या राख्या तसंच भेटवस्तूंनी बाजारपेठा सजल्या

****

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्ष २०२५-२६ साठी १२ हजार ६० कोटी रुपये अनुदान कायम ठेवण्यात येणार आहे. काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत १० कोटी ३३ लाखांहून अधिक कुटुंबांना फायदा झाला असल्याचं त्यांनी सांगितलं.

बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

 

सरकारने इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांना ३० हजार कोटी रुपयांची भरपाई देखील मंजूर केली आहे. घरगुती वापराच्या गॅस विक्रीसाठी ही मदत देण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.

तांत्रिक शिक्षणातल्या बहुविध शैक्षणिक आणि संशोधन सुधारणा योजनेसाठी चार हजार २०० कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीलाही काल केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाद्वारे सरकारला आतापर्यंत ३४ कोटी रुपयांपेक्षा जास्त महसुली उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल. मुरुगन यांनी काल राज्यसभेत दिली. विविध डीजीटल-ऑनलाईन माध्यमांद्वारे या कार्यक्रमाचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

****

राज्यातल्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची गतीने उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल पुण्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी इथं पायाभूत सुविधा विकास प्रकल्प प्रशिक्षणाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्याच्या अर्थव्यवस्थेची एक ट्रिलियन डॉलरकडे सुरू असलेली वाटचाल अधिक गतीने होण्यासाठी पायाभूत सुविधा विकास प्रकल्प महत्त्वाचे असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि नवीन उपक्रमाच उद्घाटनही काल मुख्यमंत्र्यांनी केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. अंमली पदार्थांच्या वापरावर अंकुश लावणं हे पोलिसांपुढील सगळ्यात मोठं आव्हान असल्याचं, फडणवीस म्हणाले.

****

राज्यातली सर्व शासकीय बांधकामं आता कृत्रिम वाळूचा वापर करून बांधली जाणार असल्याचं, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं आहे. जालना जिल्ह्यात अंबड इथं जिल्हास्तरीय महसूल सप्ताहाचा समारोप काल बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. कृत्रिम वाळू धोरणाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी ५० वाळू क्रशर दिली जाणार आहेत, वादग्रस्त पाणंद रस्त्यांबाबत वर्षभरात रस्त्यांच्या सीमा निश्चित करण्यात येणार असून, वाळू चोरी रोखण्यासाठी आणखी पावलं उचलली जाणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं काल महसूल सप्ताहाचा समारोप विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत झाला. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनतेला उत्तम सेवा पुरवण्याच्या माध्यमातून आपल्या विभागाचं प्रतिमा संवर्धन करण्याचं आवाहन आयुक्तांनी केलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी बोलतांना, दैनंदिन कार्यालयीन कर्तव्य बजावतांना आपली माहिती अद्ययावत करत राहण आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं

****

येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर घर तिरंगा मोहिमेला कालपासून सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

जालना जिल्ह्यात 'हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता' मोहीम उत्साहात राबवण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी केलं आहे. स्वच्छ भारत मिशन आणि जलजीवन मिशन अंतर्गत स्वच्छता, जलसंवर्धन, जनजागृती उपक्रम, तसंच १५ ऑगस्ट रोजी अमृत सरोवर आणि सार्वजनिक स्थळी ध्वजारोहणाचं आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायती, स्थानिक संस्था, स्वयंसेवक आणि नागरिकांनी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

हिंगोली जिल्ह्यातही "घरोघरी तिरंगा, घरोघरी स्वच्छता", "स्वातंत्र्याचा उत्सव, स्वच्छतेसोबत" या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी केलं. 

****

भावा बहिणीच्या नात्याचा रक्षाबंधनाचा सण आज साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सणामुळे समाजात एकात्मतेचा आणि ऐक्याचा संदेश प्रसारित होतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

राखपौर्णिमेंच्या सणासाठी विविध प्रकार आणि आकाराच्या राख्यांनी तसंच आकर्षक भेटवस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक राख्या तयार केल्या आहेत. धान्यापासून बनवलेल्या या राख्यांविषयी जाणून घेऊया आमच्या वार्ताहरांकडून,

बाईट – रमेश कदम, हिंगोली

****

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देशभरातल्या बचत गटातल्या महिलांशी संवाद साधला. यावेळी छत्रपती संभाजीनगरमधल्या उमेद अभियानातल्या महिला बचत गटांना साडे सहा कोटी ९८ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला. ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते या निधीचं वितरण करण्यात आलं.

****

रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकं तसंच रेल्वेस्थानकं प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेली आहेत.

स्वाध्याय परिवाराचा रक्षाबंधन आज छत्रपती संभाजीनगर इथं साजरा होत आहे. परिवाराच्या प्रमुख धनश्री दिदी तळवळकर यांच्या उपस्थितीत वाळुज इथं हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतल्या स्वाध्याय परिवाराच्या वतीने काल छत्रपती संभाजीनगर इथं वाहनफेरी काढण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं शहर विकासासाठी म्हणून पाडलेल्या मालमत्तांना भरपाई कशा प्रकारे देणार, असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारला आहे. ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. महानगरपालिकेने किती वैध आणि अवैध मालमत्ता पाडल्या, असा प्रश्नही दानवे यांनी विचारला.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीला दानवे यांनी काल भेट दिली. रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात तसंच प्रलंबित कामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं, दानवे यांनी सांगितलं.

****

धाराशिव शहरातले अंतर्गत रस्ते, तसंच तेरणा आणि रुईभर धरणातून वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी विशेष बाब म्हणून ३३० कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. या कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचं, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल सांगितलं.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं परवापासून तीन दिवस मल्टिमिडीया चित्र प्रदर्शन भरवण्यात येत आहे. केंद्र सरकारची ११ वर्षे-सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची या अभियानातंर्गंत नांदेड इथल्या केंद्रीय संचार ब्यूरोच्यावतीने आयोजित या प्रदर्शनात विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

****

बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी काल जिल्ह्यातल्या ४९ पोलीस नाईकांना पोलीस हवालदार पदावर आणि २० पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती दिली. अधीक्षकांनी या सर्व पोलीस अंमलदारांचं अभिनंदन केलं.

****

२७ व्या राज्यस्तरीय कनिष्ठ तलवारबाजी स्पर्धेला काल हिंगोली इथं प्रारंभ झाला. आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. राज्यभरातून ५०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. 

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात डॉ. संतोष कडले यांच्या मार्गदर्शनाखाली अवयवदावासंदर्भात जनजागृती करण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत रांगोळी, पथनाट्य आदी माध्यमातून अवयव दानाचं महत्व पटवून देण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या व्यापाऱ्याच्या जीएसटी क्रमांकाचा गैरवापर करत गोविंद लाहोटी या कर सल्लागाराने ७३ लाख ६३ हजार ३६७ रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

बीड जिल्ह्यात केज जवळ पोलिसांनी काल सुमारे एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

****

हवामान

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात आज सोसाट्याचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा वगळता मराठवाड्यात सर्वत्र यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments: