Saturday, 9 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 09 August 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ ऑगस्ट २०२ सकाळी.०० वाजता

****

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांविरुद्ध गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेल्या लष्करी कारवाईदरम्यान आज सकाळी एका दहशदवाद्याला भारतीय जवानांनी कंठस्थान घातलं. काल रात्री झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले असून अनेक सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.

लेफ्टनंट कर्नल प्रितपाल सिंग आणि शिपाई हरमिंदर सिंग यांच्या सर्वोच्च बलिदानाला श्रद्धांजली वाहत असून त्यांचं धाडस आणि समर्पण आपल्याला नेहमीच प्रेरणा देईल, अशा शब्दात भारतीय लष्करानं शोकसंवेदना व्यक्त केली. ऑपरेशन अखल संदर्भात समाज माध्यमांवर या अनुषंगानं भारतीय लष्करातर्फे माहिती देण्यात आली आहे. 

****

आज ऑगस्ट क्रांतीदिन ९ ऑगस्ट १९४२ रोजी राष्ट्रपीता महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली 'भारत छोडो आंदोलन' सुरू झालं, यामुळे स्वातंत्र्यलढ्याला एक नवीन दिशा मिळाली आणि अनेक विरांनी देशासाठी प्राण अर्पण केलं. या दिनाचं स्मरण म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या शूर सैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनम्र श्रद्धांजली वाहिली आहे. या विरांच्या साहसामुळेच असंख्य लोकांमध्ये देशभक्तीची भावना आणि स्वातंत्र्याची इच्छा जागृत झाली, असं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

****

आज भाऊ बहिणीच्या पवित्र रक्षाबंधनाचा सण उत्साहपुर्ण वातावरणात देशभरात साजरा होत आहे. बहिण-भावाचं अतुट न आतं राखीच्या धाग्यातून अधिक बळकट करुन भावाकडून बहिणीला काळजी-संरक्षणाबाबत आश्वस्त करण्याचा यामागे उद्देश आहे. यानिमित्त ठिकठिकाणी रंगीबीरंगी राख्या, भेटवस्तु, मिठाईने बाजारपेठा फुलल्या आहेत.

नारळी पौर्णिमेचा सण काल राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात आला. कोळी बांधवांनी समुद्रकिनारी दर्याची पूजा करून पारंपरिक नृत्यात सहभाग घेतला. मासेमार बांधव या दिवशी सोन्याचा प्रतिकात्मक नारळ समुद्रात अर्पण करुन कृतज्ञता व्यक्त करतात आणि यापुढे मासेमारी करण्यासाठी उत्तम काळ जावा अशी प्रार्थना करतात.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाद्वारे सरकारला आतापर्यंत ३४ कोटी रुपयांपेक्षा जास्त महसुली उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल. मुरुगन यांनी काल राज्यासभेत दिली. या मासिक रेडियो कार्यक्रमाच्या माध्यामातून पंतप्रधान मोदी यांनी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, नवोन्मेष आणि समाज सेवेच्या कार्यात भारतीय नागरिकांच्या प्रेरणादायी कामाची माहिती दिली. देशभरात मोठ्या प्रमाणात विविध डीजीटल-ऑनलाईन माध्यमांद्वारे या कार्यक्रमाचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मन की बात कार्यक्रमातून नागरिकांमध्ये राष्ट्र निर्माणाचे भागिदार होण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचं मुरुगन यांनी नमूद केलं.

****

पिंक ई-रिक्षा योजनेअंतर्गत, महाराष्‍ट्र सरकार प्रत्येक ई-रिक्षाच्या किंमतीवर वीस टक्‍के अनुदान देणार आहे. वर्षभरात महाराष्‍ट्रातील दहा हजार महिला लाभार्थ्‍यांना या रिक्षांचं वितरण होणार आहे, असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल कोल्हापुरात सांगितलं. तटकरे यांच्या हस्ते एका कार्यक्रमात पिंक ई-रिक्षा आणि रुपे कार्डचं वितरण करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. वाहनाचं अद्ययावत ठिकाण दर्शवणाऱ्या जीपीएस प्राणालीसह रिक्षात बसलेल्या व्यक्तीचं छायाचित्र काढण्याची सुविधाही या रिक्षात आहे.

****

शाश्वत शेती, कृषी, शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातलं मोलाचे योगदान आणि कार्याबद्दल, अकोला इथल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला यंदाचा इन्स्टिट्यूशनल फेलो राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान नवी दिल्लीतल्या भारतीय बागायती संघटनांचे संघटन असलेले कॉन्फिडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया वतीनं बिहारमधील साबौर इथं आयोजित राष्ट्रीय फलोत्पादन परिसंवादात प्रदान करण्यात आला. विद्यापीठाच्या वतीनं डॉक्टर प्रकाश कडू यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

****

नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यात मालसाने शिवारात सोग्रस फाट्याजवळ शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना भरधाव प्रवासी वाहनाची धडक बसली. या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला असून अकरा विद्यार्थी जखमी झाले आहेत. काल सायंकाळी साडेसहा वाजता शाळा सुटल्यानंतर भुत्याने आणि मालसाणे या गावचे १२ ते १४ विद्यार्थी घोळक्याने राष्ट्रीय महामार्ग ओलांडून जात असताना हा अपघातात घडला.

****

अहिल्यानगर जिल्ह्याच्या प्रवरानगर इथं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२५व्या जयंतीदिनानिमित्त प्रवरा परिवारातर्फे काल साहित्य आणि कला गौरव पुरस्कार वितरण सोहळा आणि शेतकरी दिनाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी कोल्हापूरचे डॉक्टर सुनिलकुमार लवटे यांना पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मुंबईच्या डॉक्टर मिनाक्षी पाटील आणि डॉक्टर एच. व्ही. देशपांडे यांना तसंच राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार दिलीप जगताप यांना, तर राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार अतांबऱ्या शिरढोणकर आणि प्रसाद अंतरवेलीकर यांना प्रदान करण्यात आले.

****

परभणी जिल्ह्यात वेगवेगळया पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुंड प्रवृत्तीचे तसंच नागरिकांना आणि मालमत्तेला धोका निर्माण करणाऱ्या सहा जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं आहे.

****

No comments: