Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 10
August 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० ऑगस्ट २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आज बंगळुरू रेल्वे स्थानकावरून तीन नवीन वंदे भारत जलदगती रेल्वेचे लोकार्पण केलं.
याप्रसंगी बंगळुरू-बेळगाव रेल्वेला त्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर रेल्वे फेरीला सुरुवात
झाली. तर, कटरा-अमृतसर तसंच नागपूर जिल्ह्याच्या अजनी ते पुणे या रेल्वेंचं पंतप्रधानांनी
दुरस्थ पद्धतीनं लोकार्पण केलं.
अजनी-पुणे ही महाराष्ट्रातली
बारावी वंदे भारत रेल्वे असून ८८१ किलोमीटर अंतर कापणारी देशातली सर्वात लांब पल्ल्याची
वंदे भारत रेल्वे ठरली आहे. ही जलदगती गाडी ७३ किलोमीटर प्रतितास वेगाने धावत नागपूर-पुण्या
दरम्यान दहा थांबे घेईल, यात शेगाव इथंही थांबा असणार आहे.
****
ऑपरेशन सिंदूर हे भारतीय लष्कराच्या
तिन्ही दलांमधील कार्यात्मक समन्वयाचे प्रतीक असल्याचं संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल
चौहान यांनी म्हटलं आहे. सिकंदराबाद इथल्या संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयात २१ व्या
उच्च संरक्षण व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित
करताना ते आज बोलत होते. सशस्त्र दलांमध्ये एकात्मतेबाबतच्या धोरणात्मक दृष्टिकोनाबद्दल
त्यांनी यावेळी मत व्यक्त केलं. भविष्यातील संयुक्त मोहिमांच्या स्वरूपाचाही त्यांनी
उल्लेख केला. आधुनिक युद्ध, स्वावलंबन आणि व्यापक क्षमता विकासात तांत्रिक बदल आणि
बदलत्या लष्करी दृष्टिकोनांची सखोल समज असणे महत्त्वाचे असल्याचंही ते म्हणाले.
****
केंद्र सरकारनं सशस्त्र दलांना
पूर्ण स्वातंत्र्य दिल्यामुळेच ऑपरेशन सिंदूरद्वारे आपण पाकिस्तानला धडा शिकवण्यात
यशस्वी झालो, असं भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते काल चेन्नई
इथं आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
पाकिस्तानात समाज माध्यमांद्वारे
एक खोटं कथन नियोजनबध्दरितीने पसरवून त्यांच्या देशातील जनतेला विश्वासात घेण्यात आलं.
पाकिस्तानच्या या रणनीतीला भारतीय सैन्यानं आपल्या पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं. सामाजिक
माध्यमांचा वापर करून जनतेपर्यंत ‘न्याय झाला’ हा आपलाही संदेश पोहोचवला आणि यासाठी
दोन महिला अधिकाऱ्यांनी वार्ताहर परिषदेतून सैन्याच्या कारवाईचा खरा संदेश प्रचंड मेहनत
घेऊन पोहोचवल्याचं द्वीवेदी म्हणाले. पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरासाठी संरक्षणमंत्र्यांनी
तिन्ही सेनादल प्रमुखांसोबत बैठक घेत, थेट आणि स्पष्ट आदेशाद्वारे
काहीतरी मोठे करण्यास सांगितलं होतं, त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवलं
गेलं असंही ते म्हणाले.
****
दरम्यान, २४ एप्रिल
ते ३० जून या कालावधीत भारतीय विमानांना हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर पाकिस्तानला १२७
कोटी रुपयांचं नुकसान झालं. याबाबतची आकडेवारी नुकतीच पाकिस्तानच्या संसदेत सादर झाल्याचं
वृत्त आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत अद्याप ही हवाई क्षेत्र बंदी
पाकिस्ताननं कायम ठवली आहे.
****
संडे ऑन सायकल अर्थात सायकलसोबतचा
रविवार मोहिमेनं फिट इंडिया अभियानाला एका आंदोलनात रुपांतरीत करण्यात मदत केली आहे, असं केंद्रीय
युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे. आज दिल्ली इथं
त्यांनी संडे ऑन साइकिल फिट इंडिया कार्यक्रमात सहभाग घेतला, त्यावेळी ते
बोलत होते. देशभरातील पन्नास हजारांहून जास्त गावांतील पंचायत सदस्यांनी यात सहभागी
होत फिट इंडीयाचा संदेश दिला आहे.
****
परभणी जिह्यातल्या पूर्णा
नदीपात्रात पाण्याच्या विसर्गामुळं जवळपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा संबंधीत व्यवस्थापन
विभागानं दिला आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या खडकपूर्णा प्रकल्पातून कोणत्याही क्षणी हा
विसर्ग होण्याची शक्यता आहे. या सिंचन प्रकल्पात ७२ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून हवामान
विभागाच्या अंदाजानुसार पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होईल, त्यामुळं प्रकल्पाच्या
पाणीसाठ्यात तासागणिक वाढ होईल आणि पाणीसाठा जर ८५ टक्क्यांवर गेला तर नदीपात्रात पाण्याचा
विसर्ग करावा लागणार आहे.
****
नांदेड रेल्वे स्थानकाचा अमृत
भारत स्थानक योजनेअंतर्गत सर्वांगीण विकास करण्याची मागणी खासदार डॉक्टर अजित गोपछडे
यांनी केली आहे. याबाबत दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन
त्यांना या मागणीचं निवेदन दिलं. नांदेड शहर ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, पर्यटनाच्या
दृष्टिने खूप महत्वाचे आहे. श्री गुरु गोविंद सिंहजी यांची पवित्र भूमी नांदेडचा गुरुद्वारा
तख्त सचखंड हजूर साहिब हे शीख धर्माच्या पाच पवित्र तख्तांपैकी एक असून देश-विदेशातून
दररोज हजारो भाविक- पर्यटक इथं दर्शनासाठी येतात पण नांदेड रेल्वे स्थानकावरील पायाभूत
सुविधा आणि व्यवस्था योग्य दर्जाच्या नसल्यानं स्थानक आधुनिकीकरण गरजेचं असल्याचं गोपछडे
यांनी निवेदनात नमूद केलं आहे. याबाबत केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद
दिला असल्याचं वृत्त आहे.
****
चीनमधील चेंगडू इथं झालेल्या
पुरुषांच्या मिश्र धनुर्विद्या स्पर्धेच्या वैयक्तिक गटात भारताच्या ऋषभ यादवनं कांस्यपदक
जिंकलं. काल झालेल्या या सामन्यात त्यानं अभिषेक वर्माचा पराभव केला.
****
बिहारच्या राजगीरमध्ये २०
वर्षांखालील रग्बी विजेतेपद स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघ चीनशी उपांत्यफेरीचा
सामना खेळणार आहे. पुरुष गटात मात्र भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
****
No comments:
Post a Comment