Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 10 August 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० ऑगस्ट २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
निकषांची पूर्तता न केलेल्या ३४५ राजकीय पक्षांची मान्यता
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून रद्द
·
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अजनी-पुणे यासह
तीन वंदे भारत रेल्वे गाड्यांचा शुभारंभ
·
भारतीय रेल्वेची ‘राउंड ट्रिप पॅकेज’ योजना; प्रवाशांना
परतीच्या प्रवासभाड्यात २० टक्के सवलत
·
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतानं पाकिस्तानची सहा विमानं
पाडल्याची हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांची माहिती
आणि
·
राज्यात विविध उपक्रमांनी रक्षाबंधनाचा सण साजरा
****
३४५ राजकीय
पक्षांची मान्यता केंद्रीय निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. गेल्या सहा वर्षांत या पक्षांनी
एकही निवडणूक लढवली नसल्याने, तसंच इतर निकषांची पूर्तता न केल्याने
ही कारवाई करण्यात आली. निवडणूक आयोगाकडून ही माहिती देण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातल्या
आवामी विकास पार्टी, नवभारत डेमोक्रॅटिक पार्टी, नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी, युवा शक्ती संघटना आदी
नऊ पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे आता देशात सहा राष्ट्रीय तसंच ६७ प्रादेशिक पक्षांसह
दोन हजार ५२० नोंदणीकृत पक्ष असल्याचं, निवडणूक आयोगाकडून सांगण्यात
आलं आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज बंगळुरू रेल्वे स्थानकावरून तीन नवीन वंदे भारत गाड्यांचा शुभारंभ
करणार आहेत. यात नागपूर जिल्ह्यातल्या अजनी ते पुणे, बंगळुरू-बेळगाव
आणि कटरा-अमृतसर वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे.
अजनी -
पुणे ही रेल्वे वर्धा-अकोला-शेगाव-भुसावळ-जळगाव-मनमाड -पुणतांबा आणि दौंड मार्गे धावणार
आहे. मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस पुणे इथून तर अजनी इथून सोमवार वगळता इतर सहा
दिवस ही रेल्वे गाडी धावणार आहे. या गाडीला शेगांव इथं थांबा मंजूर झाला आहे.
****
भारतीय
रेल्वे ‘राउंड ट्रिप पॅकेज’ नावाची योजना सुरू करणार आहे. याअंतर्गत प्रवाशांना परतीच्या
प्रवास भाड्यात २० टक्के सवलत दिली जाईल. दोन्ही बाजूंच्या प्रवासाचं आगाऊ तिकीट घेतल्यावरच
ही सवलत लागू होईल, या योजने अंतर्गत आरक्षित केलेलं तिकीट रद्द केल्यावर त्याचा परतावा
दिला जाणार नाही. एकदिशा प्रवासाकरता आगाऊ आरक्षण फक्त ६० दिवस आधी करता येत असलं तरी,
परतीच्या प्रवासाचं तिकिट काढताना ६० दिवसांचा आगाऊ आरक्षण कालावधी लागू
होणार नाही.
****
आर्थिक
वर्ष २०२४-२५ मध्ये देशाचं संरक्षण उत्पादन एक लाख ५१ हजार कोटी रुपयांच्या उच्चांकी
पातळीवर पोहोचलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली.
गेल्या वर्षीपेक्षा ही उत्पादनवाढ १८ टक्के जास्त आहे.
दरम्यान, भारताची संरक्षण
क्षेत्रातली निर्यात पुढच्या दोन ते तीन वर्षांत ४५ हजार कोटी रुपयांवर पोहोचेल,
असा विश्वास, संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे
सचिव डॉ समीर कामत यांनी व्यक्त केला आहे. ते काल पुण्यात उन्नत संरक्षण तंत्रज्ञान
संस्थेच्या दीक्षांत सोहळ्यानंतर बोलत होते. या सोहळ्यात पदवी प्रदान केलेल्या विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करतांना डॉ कामत यांनी, सर्व नूतन पदवीधरांना राष्ट्रप्रथम
या कर्तव्य भावनेनं काम करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले...
बाईट
- डॉ समीर कामत, सचिव,
संरक्षण संशोधन आणि विकास विभाग
****
ऑपरेशन
सिंदूरदरम्यान भारतानं पाकिस्तानची सहा विमानं पाडल्याची माहिती हवाई दलप्रमुख एअर
चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी दिली आहे. ते काल बंगळुरू इथं एका व्याख्यानात बोलत होते.
ही कारवाई जवळपास ३०० किलोमीटर अंतरावरून केल्याचं सांगून जमिनीवरून हवेत मारा करण्याचा
हा उच्चांक असल्याचंही सिंह यांनी नमूद केलं.
****
लोकसभा
निवडणुकीत बनावट मतदानाचा आरोप करत, विरोधी पक्षांनी उद्या सोमवारी केंद्रीय
निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस
शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती
दिली. सदर निवडणुकीत बनावट मतदान झाल्याचं सादरीकरण लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल
गांधी यांनी सखोल अभ्यास करून केलं आहे, मात्र निवडणूक आयोगानं
गांधी यांना शपथपत्र सादर करायला सांगितलं, हे योग्य नाही असं
मत पवार यांनी मांडलं.
दरम्यान, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे हे आरोप फेटाळून लावत, असं
शपथपत्र देण्याला हरकत नसावी, असं नमूद केलं. ते म्हणाले....
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
गेल्या
सहा महिन्यांपासून अंत्योदय तसंच प्राधान्य योजनेतून धान्य न उचलणाऱ्या सुमारे तीन
लाख ३३ हजार ८८१ शिधापत्रिकांवरचं धान्य बंद करण्याचे आदेश राज्य शासनानं दिले आहेत.
यातून शिल्लक राहिलेलं धान्य प्रतीक्षा यादीतल्या शिधापत्रिकाधारकांना देण्याच्या सूचनाही
देण्यात आल्या आहेत. या शिधापत्रिकाधारकांचं धान्य बंद केलं असलं, तरी त्या
शिधापत्रिका रद्द होणार नाही. संबंधितांनी मागणी केल्यास शिधापत्रिका पुनरुज्जीवित
करून त्या पुढच्या महिन्यात धान्य देण्यात येईल, असं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
वकिलांनी
इमानदारी-जबाबदारीनं वागत कायद्याचं पुरेसं ज्ञान घेत आयुष्यभर शिकत राहाणं अपेक्षित
आहे, असं प्रतिपादन देशाचे माजी सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचुड
यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल ‘वकिली व्यवसायाचे वर्तमान आणि भविष्य:
संधी, आव्हाने आणि तोटे’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं
त्यावेळी ते बोलत होते. शहरातल्या माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयातर्फे हा कार्यक्रम
घेण्यात आला. न्यायापासून वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी तरुण वकिलांनी वकिली अस्थापनांपेक्षा
जिल्हा-तालुका न्यायालयांत वकिली करावी असं चंद्रचूड यांनी सूचित केलं.
****
भाऊ-बहिणीच्या
पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन काल सर्वत्र साजरा झाला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
यांना मुंबईत राजभवन इथं आदिवासी विद्यार्थिनी, दृष्टिहीन विद्यार्थिनी तसंच महिला बचतगटाच्या
सदस्य आणि शालेय विद्यार्थिनींनी राखी बांधून औक्षण केलं.
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत लाडक्या बहिणींसोबत रक्षाबंधनाचा सोहळा साजरा केला. तर
छत्रपती संभाजीनगर इथं दामिनी पथकातल्या महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी विधान परिषदेतले
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना राखी बांधून हा सण साजरा केला.
**
नांदेड
जिल्ह्यातल्या पेनुर इथं जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी टाकाऊ वस्तूंपासून
पर्यावरण पूरक राख्या तयार केल्या. या राख्यांवर विविध सामाजिक संदेश देण्यात आले आहेत.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी तसंच शिक्षकांनी मार्गदर्शन केलं. जिल्हा
परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी वडाच्या
झाडाला राखी बांधून वृक्ष संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली.
**
छत्रपती
संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी शाळेतल्या विद्यार्थिनींनी झाडांना राख्या
बांधून हा सण साजरा केल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी दिली...
बाईट
- मुख्याध्यापक संजीव सोनार
****
बीड जिल्ह्यातले
काकासाहेब माळी यांचा सात वर्षांपूर्वी कुटुंबापासून दुरावलेला मुलगा परवा सायंकाळी
आपल्या कुटुंबात परतला. बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, संवेदनशीलतेनं
राबवलेल्या या शोधमोहिमेची माहिती देणारा हा संक्षिप्त वृत्तांत..
‘‘बीड जिल्ह्यातलं एक ऊसतोड कामगार दाम्पत्य, गाळप हंगाम संपल्यावर कर्नाटकातून घरी परतलं, तर त्यांचा दहावीत शिकणारा राजू त्यांना कुठेच दिसला नाही. बऱ्याच दिवसांपासून
तो शाळेतही येत नसल्याचं शिक्षकांनी सांगितलं. आदिवासी भिल्ल समाजातल्या या
अतिसामान्य कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता. एक दोन नव्हे तर सात वर्ष त्यांचे हे
प्रयत्न सुरू होते. अखेर राजूच्या आईने पिंपळनेर पोलिस ठाणं गाठलं. तिथून हे प्रकरण मानवी तस्करी
विरोधी पथकाकडे गेलं, आणि उपनिरीक्षक
पल्लवी जाधव यांनी स्वत: लक्ष घालून तपास केला, आणि सात वर्षांच्या दुराव्यानंतर परवा, आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला राजू आपल्या कुटुंबात परतला. बीड पोलिस
ठाण्यात मायलेकरांची ही भेट होत असतांना, उपस्थितांच्या डोळ्यातही पाणी आलं. खाकी वर्दीच्या आत असलेल्या मातृहृदयाचं
दर्शनच या प्रसंगामुळे सर्वांना घडलं.’’
· आकाशवाणी बातम्यांसाठी, रवि उबाळे - बीड
****
आदिवासी
दिनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांनी काल हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
काढण्यात आला. विविध मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला सादर करण्यात आलं.
****
जालना जिल्ह्यातल्या
जाफ्राबादच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही महसूल
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. शहरातल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन केल्यानंतर
ते काल बोलत होते.
****
हवामान
दक्षिण
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात आज सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह
पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट
देण्यात आला आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथं झालेल्या जोरदार पावसामुळे आमगव्हाण
गावाचा संपर्क खंडीत झाला होता.
****
No comments:
Post a Comment