Sunday, 10 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 10 August 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० ऑगस्ट २०२ सकाळी .०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंगळुरू दौऱ्यात पुणे ते नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकादरम्यानच्या वंदे भारत रेल्वेचे दूरस्थ पद्धतीने लोकार्पण करणार आहेत. बंगळुरूच्या केएसआर रेल्वे स्थानकावरून पंतप्रधानांच्या हस्ते पुणे ते नागपूर, बंगळुरू ते बेळगाव आणि अमृतसर ते कटरा माता वैष्णोदेवी या तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. अजनी-पुणे ही महाराष्ट्रातली बारावी वंदे भारत गाडी असून ८८१ किमी अंतर कापणारी ती देशातली सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत असेल. ही जलदगती गाडी ७३ किलोमीटर प्रतितास वेगाने धावेल आणि नागपूर ते पुणे दरम्यान १० थांबे घेईल, या रेल्वेला शेगाव इथंही थांबा देण्यात आला आहे, असं मध्य रेल्वेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे.

****

जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील डुल भागात भारतीय लष्कराची दहशतवादविरोधी मोहीम सुरू आहे. व्हाईट नाईट कॉर्प्सच्या माहितीनुसार, सध्या गोळीबार सुरू असून कारवाई प्रगतीपथावर आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांविरुद्ध गेल्या दहा दिवसांपासून लष्करी मोहिम सुरु आहे. काल कारवाईदरम्यान एका दहशदवाद्याला भारतीय जवानांनी कंठस्थान घातलं. तर या मोहिमेदरम्यान झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आणि काही सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.

****

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात धराली भागात झालेलं भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील १७२ पर्यटकांपैकी १७१ पर्यटक उत्तराखंडमध्ये सुरक्षित आहेत. तर एका बेपत्ता पर्यटकाचा शोध सुरू आहे. महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कृती केंद्राच्या माहितीनुसार, माटली, जॉली ग्रँट आणि उत्तरकाशीसारख्या ठिकाणी १६० पर्यटक सुरक्षित आहेत. त्यापैकी अनेकांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. हर्सिलमध्ये अडकलेले अकरा पर्यटकही सुखरुप आहेत.

****

नागपूरच्या कोराडी इथल्या महालक्ष्मी जगदंबा देवस्थानच्या बांधकामाधील गेटचा स्लॅब काल संध्याकाळी कोसळून १७ कामगार जखमी झाले. ही घटना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका गाड्या आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या कर्मचाऱ्यांनाही मदत कार्यासाठी पाचारण करण्यात आले. सध्या जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, "स्लॅबसाठी सिमेंट-काँक्रिट टाकले जात असताना ही दुर्घटना घडली असून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे." असं नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी सांगितलं.

****

कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया उद्या सोमवार आणि परवा मंगळवारपर्यंत केली जाणार आहे, त्यामुळे या काळात मूळ मूर्तीचं दर्शन बंद असणार आहे. भाविकांना यादरम्यान श्रीं ची उत्सवमूर्ती - श्रीकलश दर्शनासाठी ठेवला जाणार असून पितळी उंबऱ्याच्या बाहेरुन या दोन दिवसांसाठी दर्शन घेण्याची सोय करण्यात आली आहे.

****

आज आंतरराष्ट्रीय सिंह दिवस साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या वन्यजीव संरक्षण क्षेत्रीतील भरीव कामगिरीच्या जोरावर अशियायी सिंहांच्या संख्येत ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कार्यान्वयीत ‘लायन ॲट फोर्टी सेव्हन’ अभियानातून हे शक्य झालं. आशियायी सिंहांच भारतात आणि त्यातही गुजरातच्या गीर अभयारण्य एकमात्र प्राकृतिक निवास क्षेत्र आहे. जगभरात सध्या अनेक वन्य प्रजाती लुप्त होत असताना भरताचे प्रयत्न पर्यावरणीय संरक्षणाबाबत कटीबद्ध असल्याचं दर्शवत आहेत.

****

आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या रविवारी येत्या ३१ तारखेला सकाळी अकरा वाजता नागरीकांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १२५ वा भाग असणार आहे. यात जनतेला आपले विचार पोहोचवण्याची संधी असून यासाठी नि:शुल्क दुरध्वनी क्रमांक एक आठ शुन्य शुन्य- अकरा - सात आठ शुन्य शुन्य याचा उपयोग करता येईल.

****

बुलढाणा जिल्ह्यात जनावरांमध्ये लंपी या त्वचा आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या झाल्याने जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील देऊळगाव, मलकापूर, सिंदखेड राजा, खामगाव चिखली तालुक्याच्या गावांमधील जनावरांत लम्पी त्वचाआजाराचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल पुणे इथल्या पशुसंवर्धन रोग आणि अन्वेषण सहआयुक्त कार्यालयाने दिला आहे. त्यानुसार या तालुक्यातील गावे नियंत्रित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली असून, संसर्ग केंद्रापासून १० किमी बाधित क्षेत्र आणि निगराणी क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील गुरांचे बाजार, वाहतूक आणि इतर बाबींसंदर्भात मनाई आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी लागू केला आहे.

****

आज दिवसभरात दक्षिण कोकण-गोवा आणि उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली, तसंच काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट होण्याचा अंदाज असून ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

****

No comments: