Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 18 August
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १८ ऑगस्ट २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी
योगिता शेटे आपलं स्वागत करते.
****
राज्यात अनेक
ठिकाणी सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली असून विविध धरणांमधून
विसर्ग सुरु आहे.
नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पातल्या चार दरवाजांतून पाण्याचा
विसर्ग सुरु आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी काल विष्णुपुरी प्रकल्पाला भेट
देऊन पाहणी केली.
दरम्यान, जिल्ह्यातल्या
मुखेड तालुक्यात लेंडी नदीला पूर
आला आहे. भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव परिसरातील अनेक
गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. अनेक घरे पाण्यात बुडाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. उपविभागीय अधिकारी अनुप पाटील आणि
तहसीलदार राजेश जाधव यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
***
हिंगोली जिल्ह्यातल्या विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे
जलसंपदा विभागानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. परभणी जिल्ह्यात सततच्या पावसाने ओढे, नाले आणि नद्यांना पूर आला असून
सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, हळद, ऊस पिकांसह
भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे.
***
कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुंभी धरणातून, तसंच सांगली जिल्ह्यातल्या वारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मुसळधार पावसामुळे जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील
सोमठाणा धरणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणात आतापर्यंत ७२
टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
***
रत्नागिरीत पावसाचा जोर कायम असून जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली
आहे. हवामान विभागाने आज रत्नागिरी जिल्ह्याला रेड अॅलर्ट दिला आहे. संगमेश्वर
इथल्या शास्त्री आणि राजापुरातली कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.
***
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात
पाऊस सुरू असल्याने पिकांचं मोठे नुकसान झालं आहे. राज्य सरकारने तातडीने
शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत जाहीर करावी तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर
करण्याची तसंच विशेष अधिवेशन घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
***
मुंबईतल्या सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार
पावसामुळे पाणी साचल्यानं रस्त्यावरील वाहतूक मंदावली आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील
रेल्वे दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत. हवामान खात्यानं आज मुंबईला ऑरेंज
अलर्ट देण्यात आला आहे.
***
हिमाचल प्रदेश आणि जम्मूमध्ये ढगफुटी आणि सततच्या
पावसामुळे पंजाबमधील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. रावी आणि बियास
नद्यांच्या पाण्याची पातळी बरीच वाढली असून
या नदी काठी राहणाऱ्या पठाणकोट, गुरुदासपूर, कपूरथला, होशियारपूर, फाजिल्का आणि फिरोजपूर
जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
****
राज्यात पुढील 24 तासासाठी पुणे घाट भागात
अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला
आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर
जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर परभणी, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यासाठी हवामान विभाागनं यलो अलर्ट जारी केला आहे.
पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात तसेच
सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात
आला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या
21 ऑगस्टपर्यंत राज्यात काही ठिकाणी
अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य
आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना
देण्यात आल्याचं राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आलं आहे.
***
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या नीट पीजी परीक्षेचा निकाल येत्या तीन सप्टेंबरला
जाहीर होणार आहे. राष्ट्रीय चाचणी
मंडळाने गेल्या ३ ऑगस्ट रोजी ही परीक्षा घेतली
होती. nbe.edu.in आणि
natboard.edu.in या संकेतस्थळांवर निकाल पाहता
येतील.
***
राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार आज मुंबईत दाखल होणार असून राज्य
शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर या तलवारीचं स्वागत करण्यात येईल.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या तलवारीचं लोकार्पण
होईल. या तलवारीसह युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या १२ गडांच्या
माहितीचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. हे प्रदर्शन १९ ते २५ ऑगस्ट दरम्यान, सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या
वेळेत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत सर्वांना विनामूल्य पाहता येईल.
दरम्यान, मुंबईत सुरू
असलेल्या मुसळधार पावसामुळे ही तलवार आणताना
काढण्यात येणारी बाईक रॅली रद्द करण्यात आली आहे.
***
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात एक
सुरक्षा जवान शहीद झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. बस्तर विभागातील बिजापूर
जिल्ह्यात आज ही घटना घडली. सकाळी नॅशनल पार्क परिसरात जवान गस्तीवर असताना ही
नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला.
***
No comments:
Post a Comment