Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 19 August
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १९ ऑगस्ट २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
नवी दिल्लीत आज झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या
संसदीय मंडळाच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांचं
अभिनंदन करण्यात आलं. या पदासाठी राधाकृष्णन यांना सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याचं
आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री किरेन
रिजिजू म्हणाले,
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू
****
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या
अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीमध्ये देशातल्या भविष्यातल्या सुधारणा आणि विकासाच्या
आराखड्यासाठी पहिली उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला सर्व मंत्री, सचिव आणि अर्थतज्ज्ञ उपस्थित होते. पंतप्रधानांनी १५ ऑगस्टच्या भाषणात 'नेक्स्ट जनरेशन' सुधारणा आणण्याचा संकल्प जाहीर केला
होता,
आणि या बैठकीत त्या संकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पहिली दिशा
निश्चित करण्यात आली.
समृद्धीला चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये जलद
सुधारणा करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या
संदेशात म्हटलं आहे.
****
देशातल्या बेरोजगारीच्या दरात जुलै महिन्यात किंचित घट होऊन
तो ५ पूर्णांक २ दशांश टक्क्यांवर आला आहे. जून महिन्यात हा दर ५ पूर्णांक ६ दशांश
टक्के इतका होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जाहीर केलेल्या
आकडेवारीत ही माहिती समोर आली. यात महिलांचा बेरोजगारीचा दर ५ पूर्णांक १ दशांश
टक्के,
तर पुरुषांचा दर ५ पूर्णांक ३ दशांश टक्के इतका आहे.
ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर ४ पूर्णांक ८ दशांश टक्के, तर
शहरी भागात तो ६ पूर्णांक ८ दशांश टक्के इतका आहे.
****
नुकत्याच राबवण्यात आलेल्या अवयवदान पंधरवड्यात छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात नागरीकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आतापर्यंत दोन हजार ५६०
नागरिकांनी अवयवदानाची प्रतिज्ञा केली असल्याची माहिती राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण
नोंदणी पोर्टलवर देण्यात आली आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात विशेषतः आदिवासी
भागातल्या मुलांचं कुपोषण दूर करण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य
कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी पोषणदूत संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे.
त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील कुपोषित
बालक दत्तक घेऊन त्याला सुपोषित करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगण्यात आले आहे.
स्वतः ओमकार पवार यांनी वैष्णव नगर इथल्या दीपक पिंपळके या मुलाला दत्तक घेतलं
आहे. कुपोषित मुलांना सुयोग्य आहार देणं तसंच त्यांच्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी
करणं अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका आणि आशा कर्मचार्यांच्या
माध्यमातून त्यांना योग्य पोषण देणं याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग
प्रमुख प्रकल्पाधिकारी,
गटविकास अधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना पोषण दूत
असं संबोधण्यात येणार आहे.
****
राज्यात आजही मुंबईसह बहुसंख्य भागात जोरदार पाऊस सुरू आहे.
मुंबई,
ठाणे, कोकण आणि मराठवाड्यातल्या
काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. ठिकठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी
ओलांडली असून अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. मुंबईसाठी आज रेड
अलर्ट जारी करण्यात आला असून, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
धाराशिव शहरासह जिल्ह्यात काल दिवसभर संततधार पाऊस सुरु
होता. मागील काही दिवसांपासून सतत होत असणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातलं तेरणा, मांजरा,
निम्न तेरणा हे मोठे प्रकल्प पूर्ण भरले असून, अनेक नदी नाल्यांना पूर येऊन गेला आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या जवळपास
साडेचारशे मिलिमीटर पाऊस झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु असल्यानं, अनेक ओढे,
नद्या ओसंडून वाहत आहेत. चिखली तालुक्यात अतीवृष्टी झाली
असून,
हजारो हेक्टर शेतातली पिकं पाण्याखाली गेली आहेत. एक युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला असून, पावसामुळे चिखली शहर आणि तालुक्यातल्या शाळांना दोन दिवस सुटी जाहीर करण्यात
आली आहे.
****
भारतीय आयुर्विमा
महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागात आयुर्विमा पश्चिम क्षेत्रीय कॅरम आणि
बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या २१ आणि २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या
या स्पर्धेत आयुर्विमा महामंडळाचे १०४ कर्मचारी सहभागी
होणार आहेत.
****
कझाकिस्तानमधल्या शीमकेंत इथं सुरु असलेल्या एशियन नेमबाजी
अजिंक्यपद स्पर्धेतच्या कनिष्ठ गटातल्या १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात हरियाणाच्या
कपिल बैंसलनं सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत भारताच्या जोनाथन गॅविननं कांस्यपदक
जिंकलं असून,
कपिल, जोनाथन आणि विजय तोमर या
संघानं सामूहिकरीत्या रौप्य पदक जिंकलं.
****
No comments:
Post a Comment