Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 20
August 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ ऑगस्ट २०२५ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री
अश्विनी वैष्णव यांनी, ऑनलाईन गेमिंग संशोधन
विधेयक सादर केलं. ई-स्पोर्ट्स, शैक्षणिक खेळ आणि सामाजिक खेळ यासह ऑनलाइन गेमिंग
क्षेत्राला प्रोत्साहन आणि नियमन करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे.
दरम्यान, बिहारमधल्या मतदार यादी पुनरिक्षणाच्या मुद्यावरुन विरोधकांनी
केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज बाधित झालं. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी
दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार
सी पी राधाकृष्णन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह एनडीएच्या घटक पक्षांचे
प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नऊ सप्टेंबरला होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव
गांधी यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीतील वीरभूमी इथं
राजीव गांधी यांच्या समाधीवर काँग्रेस अध्यक्ष
मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या
प्रियंका गांधी यांच्यासह इतर पदाधिकार्यांनी पुष्पांजली वाहिली. संसदेच्या केंद्रीय सभागृहातही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह इतर सदस्यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.
****
राज्यात मागील चार दिवसांपासून झालेल्या पावसाने
सर्वाधिक नुकसान नांदेड आणि वाशिम जिल्ह्यात झाल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय
भरणे यांनी दिली. ते आज वाशिम जिल्ह्यात
अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर बोलत होते. या जिल्ह्यांमध्ये ३५० गावं बाधित झाली असून, चार लाख ११ हजार एकरवरील पिकाचं नुकसान झाल्याचं भरणे
यांनी सांगितलं. ते म्हणाले.
बाईट- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
दरम्यान, मुंबईत आज मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. सकाळपासून लोकल, बस आणि इतर वाहतूक सुरळीत सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे. धाराशिव आणि जालना जिल्ह्यात आज
पहाटेपासून पाऊस सुरु आहे.
परभणी जिल्ह्यात सेलु तालुक्यातल्या निम्न दुधना
प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यानं, राजवाडी इथल्या पुलावरून पाणी वाहत आहे. या पुलावरुन दुचाकीवरचे
दोघे जण काल वाहून गेले असून, एकाचा मृतदेह सापडला, तर दुसर्याचा शोध सुरु आहे. पावसात कुठलंही चुकीचं धाडस करू नका, प्रशासन देत असलेल्या सूचनांचं पालन करा, असं आवाहन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं.
नाशिक जिल्ह्यातही आज संततधार पाऊस सुरु असून, गंगापूर, दारणासह अनेक धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. गंगापूर धरणातून दीड हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने, दारणा धरणातून अकराशे, तर मुकणे धरणातून ५०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग
करण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या
पावसामुळे नदी-नाल्यांचा पूर आला आहे. अहेरी तालुक्यातल्या पल्ले इथल्या जिल्हा परिषद
प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वसंत तलांडे यांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू
झाला. शाळा सुटल्यानंतर ते गावाकडे
जात असताना सिपनपल्ली नाल्यात ते बुडाले, आज त्यांचा मृतदेह आढळून आला.
अकोला आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा जोर काहीसा
कमी झाला असून, पूर परिस्थिती कायम असल्याचं आमच्या
वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यातले तहसीलदार प्रशांत थोरात यांच्यावर
झालेल्या एकतर्फी निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि
नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने काल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना निवेदन देण्यात
आलं. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी
करून वस्तुस्थिती उघड करावी आणि थोरात यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निरोप समारंभ कार्यक्रमात गाणं म्हटल्यामुळे थोरात
यांना निलंबित करण्यात आलं आहे.
****
बीड शहरात प्रवेश करताना आणि बीड शहरात फिरताना
वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम तोडल्यास सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांच्यावर नजर
ठेवली जाणार आहे. यासाठी शहरात ४७ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वाहतुकीचे
नियम तोडल्यास चलन करून दंड करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक
नवनीत कॉंवत यांनी दिली.
****
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती
वर्षानिमित्त आदिवासी गौरव विशेष कार्यक्रमांतर्गत बीडमध्ये येत्या २४ आणि २५ ऑगस्टला
दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचं योगदान आणि
भूमिका, या विषयावर आधारित चर्चासत्राचं
उद्घाटन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते होणार आहे.
****
No comments:
Post a Comment