Wednesday, 20 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 August 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश, मुख्यमंत्र्यांची माहिती

·      नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात मदतकार्य प्रगतीपथावर, मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला नांदेडमधल्या परिस्थितीचा आढावा

·      सौरऊर्जा आणि विदा क्षेत्रात विविध कंपन्यांसोबत राज्य सरकारचे दहा सामंजस्य करार, राज्यात ४२ हजार ८९२ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार

·      जालना जिल्ह्यातल्या २५ कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी २८ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

आणि

·      आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची घोषणा

****

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असून, एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले,

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दरम्यान, राज्यात अनेक भागात कालही पाऊस झाला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि ठाणे शहरातल्या विविध भागांची पाहणी करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्रात पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यभरात १० लाख एकर शेती पाण्याखाली गेल्याची माहिती त्यांनी दिली.

****

मराठवाड्यातही अनेक भागात पावसाचा जोर कालही कायम होता. नांदेड जिल्ह्यातल्या हसनाळ इथं काल सकाळी आणखी दोन मृतदेह सापडले असून, जिल्ह्यात पावसाशी निगडित घटनांमधल्या मृतांचा आकडा आता नऊ झाला आहे. मुखेड तालुक्यात मदतकार्य वेगानं सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल नांदेड इथं परिस्थितीचा आढावा घेतला, आपदग्रस्तांची सर्व व्यवस्था केल्याचं, त्यांनी सांगितलं,

बाईट- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

दरम्यान, महाजन यांनी मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्प बाधित गावांची देखील पाहणी केली. या पुरात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली.  

 

हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात पुराच्या पाण्यात आठ नागरीक अडकले होते. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,

बाईट- रमेश कदम,हिंगोली

परभणी जिल्ह्यातही अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून, सोयाबीन, तूर, तसंच काढणीला आलेल्या मूग, उडीद, कापूस आदीपिकाचं मोठं नुकसान झालं आहे. प्रशासनानं तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानाची दखल घेऊन केंद्र सरकारकडून तातडीने मदत मिळावी, यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन, त्यांना निवेदन सादर केलं. दरम्यान, बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातलं नागापूर धरण ओसंडून वाहत असून, परिसरातल्या गावांचा पाणीप्रश्न सुटला आहे.

 

लातूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काल आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तसंच, नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाचे दोन दरवाजे काल बंद करण्यात आले.

जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या एकरूखा गावातले शेतकरी अण्णासाहेब सानप हे परवा सोमवारी पुराच्या पाण्यात वाहून गेले होते, काल संध्याकाळी त्यांचा मृतदेह दहीगव्हाण गावाजवळ सापडला.

****

दरम्यान, हवामान विभागानं आज रायगड आणि पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, तर विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

****

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. काल सायंकाळी मुंबईहून निघालेली जनशताब्दी एक्स्प्रेस ही इगतपुरीपर्यंत आल्यावर रद्द करण्यात आली. तिथून ही एक्स्प्रेस मनमाडपर्यंत जाऊन आज पंचवटी एक्स्प्रेस म्हणून सकाळी निघणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने काल राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्ही व्ही पॅट वापरण्याची मागणी केली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील, प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेड, आदी उपस्थित होते.

****

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काल नवी दिल्लीत आघाडीच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसमावेशक आर्थिक धोरण राबवल्यामुळे भारताची प्रतिमा जगभरात उजळल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. काल केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी याकडे लक्ष वेधलं. ते म्हणाले...

बाईट- केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने काल राजस्थानात कोटा बुंदी इथल्या विमानतळाचा विकास तसंच ओडिशातल्या रस्ते विकास प्रकल्पाला मान्यता दिली.

****

राज्य मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीचीही काल बैठक झाली. पुणे-लोणावळा उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका उभारणं, पुणे मेट्रोच्या बालाजीनगर-बिबवेवाडी तसंच स्वारगेट-कात्रज स्थानकांची उभारणी, ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान २५ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग उभारणं, मुंबईत मेट्रो मार्गिका हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तसंच नागपूरमध्ये एक नवनगर तयार करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच रुग्णालयात गट-क संवर्गातल्या विविध पदावर २९ दिवस तत्त्वावर कार्यरत १७ कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

****

सौरऊर्जा आणि विदा क्षेत्रात काल दहा सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे राज्यात ४२ हजार ८९२ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून २५ हजार ८९२ रोजगारांची निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले...

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या वर्षीपासून राज्य महोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचं अनावरण काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात आलं.

****

जालना जिल्ह्यातल्या अंबड आणि तालुक्याल्या २५ कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी काल २८ जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपींमध्ये तलाठी, महसुल कर्मचारी, संगणक परिचालक तसंच काही अधिकार्यांचा समावेश आहे. या प्रकरणात यापूर्वी २१ तलाठ्यांना निलंबित करण्यात आलं असून त्यांची विभागीय चौकशी सुरु आहे. या प्रकरणात तहसीलदारांच्या ई-मेल आयडींचा गैरवापर करून बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले, तसंच संगणक प्रणालीमध्ये फेरफार करून शासकीय निधीचा अपहार करण्यात आला.

****

आशिया चषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची काल घोषणा करण्यात आली. सूर्यकुमार यादव कर्णधार तसंच शुभमन गिल उपकर्णधार असलेल्या या संघात, शुभम दुबे, तिलक वर्मा, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, हर्षित राणा, अभिषेक शर्मा, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे. भारताचा पहिला सामना १० सप्टेंबरला संयुक्त अरब अमिरातीबरोबर, तर १४ सप्टेंबरला भारत पाकिस्तान सामना होणार आहे.

****

महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा संघ काल जाहीर झाला

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 20 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...