Wednesday, 20 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 20 August 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० ऑगस्ट २०२ सकाळी.०० वाजता

****

लोकसभेत आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव ऑनलाईन गेमिंग विधेयक मांडणार आहेत. ऑनलाईन गेमिंगमुळे होणारे दुष्परीणाम रोखणं, हे या विधेयकाचं उद्दीष्ट आहे. त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा जम्मू काश्मीर पुनर्गठन संशोधन विधेयक मांडणार आहेत.

****

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज जनसुनावणीदरम्यान हल्ला झाला. या आरोपीला पकडण्यात आलं असून, त्याची चौकशी सुरु आहे. भारतीय जनता पक्षानं या हल्ल्याचा निषेध केला आहे. तर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी यांनीही या हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा तसंच आदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र कोणालाही हिंसा करण्याचा अधिकार नसल्याचं आतिषी यांनी म्हटलं आहे.

****

राज्यातल्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी यंदा रेल्वेनं गाड्यांच्या ३६७ अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. यासाठी गणेशभक्तांच्या वतीनं आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या जादा गाड्या सोडाव्यात अशी मागणी महाऱाष्ट्र शासनानं केली होती, त्याला प्रतिसाद देत, रेल्वे गाड्यांच्या जादा फेऱ्यांचं नियोजन केलं जाईल, असं आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी दिलं होतं.

****

धाराशिव आणि जालना जिल्ह्यात आज पहाटेपासून पाऊस सुरु आहे.

परभणी जिल्ह्यात सेलु तालुक्यातल्या निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यानं, राजवाडी इथल्या पुलावरून पाणी वाहत आहे. या पुलावरुन दुचाकीवरचे दोघे जण काल वाहून गेले असून, एकाचा मृतदेह सापडला, तर दुसर्याचा शोध सुरु आहे. पावसात कुठलंही चुकीचं धाडस न करण्याचं, तसंच प्रशासन देत असलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं आहे.

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यानं नदी-नाल्यांना पूर आला असून, १३ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. पर्लकोर्टा नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्यातल्या ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.

****

नाशिक जिल्ह्यात रात्रीपासून संततधार पाऊस सुरु असून, गंगापूर, दारणासह अनेक धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. गंगापूर धरणातून दीड हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने, दारणा धरणातून अकराशे, तर मुकणे धरणातून ५०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

****

मुंबईत काल संध्याकाळी बंद पडलेल्या मोनोरेलमधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी चार तास बचावकार्य सुरू होतं, त्यातून ५०० हून अधिक प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. म्हैसूर कॉलनी आणि भक्ती पार्क स्थानकांदरम्यान अडकलेल्या मोनोरेल मध्ये वीज आणि वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्यानं काही प्रवाशांचा श्वास गुदमरला. त्यापैकी १४ जणांना घटनास्थळी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं, तर एका मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

****

समृद्धी महामार्गावर नाशिक जिल्ह्यात शहापूर जवळील खुटघर टोल प्लाझाजवळ काल मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.

****

बुलढाणा जिल्ह्यात आदिवासी भागातल्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थांकरता इको फ्रेंडली गणपती तयार करण्याच्या कार्यशाळेला काल प्रारंभ झाला. जळगाव जामोद तालुक्यातल्या सुनगाव या गावामधल्या शाळेपासून या उपक्रमाला सुरुवात झाली. या उपक्रमामुळे निसर्ग संवर्धनाला मोठा हातभार लागणार असून, विद्यार्थीच आता प्रशिक्षण घेऊन घरीच शाडू मातीच्या मुर्त्या बनवून गणरायाची स्थापना करणार आहेत.

****


 

 

धाराशिव जिल्ह्यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड काढण्यासाठी ई-केवायसी मोहिम राबवण्यात येत आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत राबवण्यात येणार्या या मोहिमेत गाव, वाडी, वस्ती, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन ई-केवायसी केली जात आहे.

****

राज्यातील चारही कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील रिक्त जागा भरण्याची कारवाई पूर्ण करावी अशी मागणी परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केली आहे. कृषी पदवीधारक विद्यार्थ्यांनी पाटील यांच्या नेतृत्वात या मागणीचं निवेदन काल जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे सादर केलं.

****

कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने नियुक्त केलेली निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. परवा २१ ऑगस्टला विभागीय आयुक्त कार्यालयात शिंदे समिती आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

****

महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा संघ काल जाहीर झाला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातल्या या संघात रेणूका ठाकूरचं पुनरागमन झालं असून, शेफाली वर्माला विश्रांती देण्यात आली आहे, तर पूजा वस्त्राकारच्या जागी अष्टपैलू अमनज्योत कौरला संधी मिळाली आहे.

****

 

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 20 August 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छ...