Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 21 August 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ ऑगस्ट
२०२५ सकाळी ७.१० मि.
****
· केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून लोकसभेत तीन नवी विधेयकं सादर, गंभीर गुन्ह्यात लोकप्रतिनिधींना पदावरुन हटवण्याच्या तरतूदीला विरोधकांचा आक्षेप
· प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग विधेयक लोकसभेत संमत
· समृद्धी महामार्गाप्रमाणेच नांदेड-जालना द्रुतगती महामार्गासाठी मोबदला निश्चित
करण्याच्या पर्यायाचा विचार करावा, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांचे निर्देश
· राज्यात अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरपेक्षा अधिक पीकांचं नुकसान,
पंचनामे तातडीने करणार असल्याची, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
आणि
· जायकवाडी आणि मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु, प्रशासनाकडून
नदीकाठच्या गावांना खबरदारीची सूचना
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
यांनी लोकसभेत ‘१३०वं घटना दुरुस्ती विधेयक २०२५’, ‘केंद्रशासित प्रदेश सरकार विधेयक २०२५ आणि ‘जम्मू आणि काश्मीर
पुनर्रचना विधेयक’ २०२५ मांडलं. पंतप्रधान, मुख्यमंत्री तसंच मंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांबाबत आरोप झाल्यास
किंवा त्यांना ३० दिवसांचा तरुंगवास झाल्यास पदावरुन हटवण्याची तरतूद या विधेयकात आहे.
काँग्रेस, एमआयएम तसंच समाजवादी पक्षासह विरोधकांनी या विधेयकांचा
विरोध करून ही विधेयकं
संसदीय लोकशाहीला मारक असल्याची टीका विरोधकांनी केली. सदनानं ही तीनही विधेयकं सविस्तर
अभ्यासासाठी संसदेच्या संयुक्त समितीकडे वर्ग केली.
**
प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग
विधेयक काल लोकसभेनं संमत केलं. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी
वैष्णव यांनी याविषयी माहिती दिली.
बाईट - इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव
ई-स्पोर्ट्स, शैक्षणिक
आणि सामाजिक गेम्स यासह ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला चालना देण्यासोबतच त्यावर नियमन आणणं, हा या विधेयकाचा उद्देश आहे. याद्वारे गेमिंग क्षेत्राबाबत राष्ट्रीय पातळीवर एक
कायदेशीर चौकट तयार केली जाईल. तसंच कोणत्याही प्रकारे ऑनलाईन गेम्सद्वारे सेवा, जाहिरातींच्या रुपाने आर्थिक व्यवहारांवर पूर्ण बंदीची तरतूद या विधेयकात आहे.
या विधेयकात तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि एक कोटी रुपये दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची
तरतूद आहे.
या विधेयकामुळे नागरिकांवर, विशेषतः तरुणांवर होणारे सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि गोपनीयतेशी संबंधित दुष्परिणाम टाळायला मदत होईल, असा विश्वास छत्रपती संभाजीनगर इथले मानसोपचार तज्ज्ञ डॉ संजीव सावजी यांनी व्यक्त
केला. ते म्हणाले...
बाईट - डॉ संजीव सावजी, मानसोपचार तज्ज्ञ
राज्यसभेत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान
यांनी सादर केलेलं भारतीय व्यवस्थापन संस्था सुधारणा विधेयक काल संमत झालं.
दरम्यान, संसदेच्या
पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप होत आहे.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती
पदाचे उमेदवार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काल संसद भवनात आपला उमेदवारी अर्ज
दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातले मान्यवर सदस्य
तसंच एनडीएच्या घटक पक्षांचे खासदार यावेळी उपस्थित होते.
****
समृद्धी महामार्गाप्रमाणेच नांदेड-जालना
द्रुतगती महामार्गासाठीही जमीन संपादनाचा मोबदला निश्चित करण्याच्या पर्यायाचा विचार
करावा,
असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ते
काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. २०२१ च्या बाजारभावाप्रमाणे दर निश्चित करण्यासाठी
जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल तयार करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. फळबागा आणि
घरांच्याही भरपाईचा आराखडा तयार करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. नगरपालिका
आणि महानगरपालिका हद्दीतील घरं नियमित करण्यासाठी एक विशेष दिवस राखीव ठेवण्याची सूचनाही
बावनकुळे यांनी केली.
****
सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून उभारलेल्या
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ एमकेसीएल संस्थेने गेल्या २५ वर्षांच्या वाटचालीत उत्तम काम
केल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. एमकेसीएलच्या रौप्य
महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या संस्थेमुळे उद्योजकांचं
जाळं राज्यात उभं राहिल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले...
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ८१ व्या
जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांना आदरांजली अर्पण केली. संसदेच्या
मध्यवर्ती सभागृहातही लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह इतर सदस्यांनी राजीव गांधी
यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. मुंबईत राजभवनात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला
पुष्पांजली वाहून त्यांना अभिवादन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर, तसंच परभणी इथं राजीव गांधी यांना अभिवादन करुन, सद्भावना
दिवसाची शपथ घेण्यात आली.
****
राज्यात नऊ ऑगस्टपासून आतापर्यंत १९ जिल्ह्यातल्या
१८७ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून, या काळात आठ लाखांपेक्षा
जास्त हेक्टर पीकांचं नुकसान झालं आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती
दिली. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं
नुकसान झालं आहे. हिंगोली जिल्ह्यात ४० हजार हेक्टर, धाराशिव
२९ हजार हेक्टर तर परभणी जिल्ह्यात २० हजार हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालं
आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून, जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पीडित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम
करावे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, असे
निर्देश भरणे यांनी दिले. राज्यात अतिवृष्टीमुळे जवळपास २१ लोकांचा मृत्यू झाला असून, पशूधनाचीही मोठी हानी झाली आहे.
दरम्यान, कृषीमंत्री
भरणे यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यात करमोडी इथं पीक नुकसानाची पाहणी
केली. पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, नांदेड
तहसील कार्यालयात नागरिकांसाठी विशेष आपत्ती हेल्पलाइन केंद्र सुरू करण्यात आलं आहे.
नागरिकांनी 024
62-23 67 69 आणि 72 62 89 88 15 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असं
आवाहन करण्यात आलं आहे.
**
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत आणि औंढा इथं
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल भेट देऊन पिकांच्या नुकसानाची पाहणी केली. नुकसानाचे
तात्काळ पंचनामे करून माहिती पाठवण्याचे निर्देश त्यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना
यावेळी दिले.
**
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात पूरग्रस्त
मौजे बोरगाव बुद्रुक, धडकनाळ आणि टाकळी या गावांना जिल्हाधिकारी
वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाची बैठक घेऊन
पंचनामे,
उपाययोजना आणि नागरिकांच्या आरोग्य सुविधांबाबत आढावा घेतला.
****
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना
हेक्टरी ५० हजार रुपये मदत तातडीने द्यावी, अशी
मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. या मागणीचं पत्र त्यांनी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलं. या कठीण प्रसंगी सर्व नियम, अटी,
शर्ती बाजूला ठेवून शासनानं शेतकऱ्यांची मदत करावी, अस या पत्रात म्हटलं आहे.
****
राज्यात मुंबईसह कोकणातल्या बहुतांश भागात
आज यलो अलर्ट तर पुणे जिल्ह्यांतल्या घाट भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भासह राज्यात उर्वरित भागात पावसाचा जोर ओसरल्याचं, हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या
जायकवाडी धरणातून आज सकाळी सहा वाजल्यापासून पाणी सोडण्यात आलं. धरणाचे अठरा दरवाजे
अर्धा फूट उचलून सुमारे साडे नऊ हजार दशलक्ष घनफूट वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात
येत आहे. धरणाचा पाणीसाठा सुमारे ९५ टक्क्यांवर आहे.
मांजरा प्रकल्पाचेही दोन दरवाजे काल उघडण्यात
आले असून,
एक हजार ७४७ घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरु आहे.
****
लातूर जिल्ह्यात सध्या जनावरांमध्ये लंपी
या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, उद्या साजरा होणारा बैलपोळा उत्सव साध्या आणि सुरक्षित पद्धतीने साजरा करण्याचं
आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. जिल्ह्यात ४११ जनावरं या रोगाने बाधित झाली असून, त्यापैकी १७९ जनावरांवर अद्याप उपचार सुरु आहेत, तर
३२ जनावरांचा मृत्यू झाला. बाधित गावांमध्ये आणि पाच किलोमीटर परिघातल्या क्षेत्रांमध्ये
जनावरांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजारपेठा आणि जत्रांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment