Thursday, 21 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 21 August 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ऑगस्ट २०२ सकाळी .०० वाजता

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप होत आहे.

राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जम्मू आणि कश्मीर पुनर्स्थापना सुधारणा विधेयक २०२५, संघ राज्य क्षेत्र शासन सुधारणा विधेयक २०२५, संविधानाच्या १३० व्या सुधारणा विधेयक २०२५ सादर करणार आहेत. काल लोकसभेनं हे तिनही विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मंजूर केला. तसंच काल लोकसभेत मंजूर झालेलं ऑनलाईन गेमिंग सुधारणा विधेयकही आज राज्यसभेत मांडलं जाऊ शकतं. लोकसभेत सुरु असलेली अंतराळ क्षेत्रावरची चर्चा आजही चालू राहण्याची अपेक्षा आहे. भाजपने राज्यसभेत सादर होणाऱ्या महत्त्वाच्या विधेयकांसाठी खासदारांसाठी व्हीप जारी केला आहे.

****

ओदिशातल्या चंडीपूर इथं काल अग्नी पाच या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. या प्रक्षेपणामुळे सर्व तांत्रिक आणि कार्यात्मक बाबींची पडताळणी झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. हे प्रक्षेपण स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.  

****

जीएसटी सुधारणांच्या पुढच्या टप्प्यामुळे भारताचा आत्मनिर्भर भारत बनण्याच्या प्रवासाला सुरुवात होईल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. भरपाई उपकर, आरोग्य आणि आयुर्विमा आणि दर सुसूत्रीकरणासाठी स्थापन केलेल्या मंत्र्यांच्या गटाला त्या नवी दिल्ली इथं संबोधित करत होत्या. सामान्य माणूस, शेतकरी, मध्यमवर्ग तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना दिलासा देणं, एक पारदर्शक आणि विकासकेंद्री कर व्यवस्था सुनिश्चित करणं हे या करांचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांमध्ये दहा महिला नक्षलवाद्यांसह २९ नक्षलवाद्यांनी काल आत्मसमर्पण केलं. त्यांच्यावर सुमारे ५५ लाख रुपयांचं इनाम होतं. राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार आत्मसमर्पण केलेल्या प्रत्येक नक्षलवाद्याला ५० हजार रुपये इतकी रक्कम प्रोत्साहन निधी म्हणून दिली गेली. सरकार त्यांना कौशल्य विकास आणि शेतीचं प्रशिक्षणही देणार आहे.

****

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगवान लाटेतही यशस्वी होण्याची क्षमता भारतीयांमध्ये आहे, त्यासाठी हे ज्ञान सामान्य जनांपर्यंत पोहोचवणाऱ्या शैक्षणिक संस्थांची आवश्यता असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल पुण्यात ‘सिम्बायोसिस कृत्रिम बुद्धिमत्ता संस्थेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. राज्य शासनानं एआय चॅटबॉट्स तयार केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कळेल अशा भाषेत शंकांचं समाधान होऊ शकेल. मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यानं मुंबई, पुणे आणि नागपूर इथं कृत्रिम बुद्धीमत्तेशी संबंधित तीन संस्था सुरू केल्या असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत गुणवंत अधिकारी - कर्मचारी तसंच आदर्श ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांचा सन्मान सोहळा काल पार पडला. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यावेळी उपस्थित होते. प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि कार्य तत्परतेने काम करणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचं, पापळकर यावेळी म्हणाले.

****

संयम, संपर्क, समन्वयाने गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. ते काल या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. बीड इथंही गणेशोत्सव शांतता समितीची बैठक काल झाली. नागरिकांनी कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता सलोखा अबाधित ठेवत हे सण आनंदाने आणि शांततेत साजरे करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं.

****

नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली मतदारसंघातील मतदारांच्या संख्येत केवळ काही महिन्यातच लाखो मतदारांची नावं वगळण्यात आली, असा दावा करणाऱ्या दिल्ली इथल्या सी एस डी एस चे राजकीय विश्लेषक संजीव कुमार यांच्यावर निवडणूक आयोगाविषयी बदनामी केल्याप्रकारणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक विभागातर्फे नायब तहसीलदार प्रवीणा तडवी यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. देवळाली लोकसभा मतदारसंघातली मतदार संख्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ३८ टक्क्यांनी म्हणजेच तब्बल १ लाख ७९ हजार २७२ इतकी कमी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी समाज माध्यमांवर केला होता.

****

परभणीच्या जिल्हाधिकारी पदावर मुंबईतील मुद्रांक शुल्क विभागाचे अतिरिक्त नियंत्रक संजय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परभणीचे सध्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची मुंबईत तत्काळ प्रभावाने बदली करण्यात आली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण, कन्नड तसंच सिल्लोड नगरपालिकेचा प्रारुप आराखडा घोषीत करण्यात आला आहे. या आराखड्यावर ३१ ऑगस्टपर्यंत हरकती दाखल करता येणार असल्याचं, प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

****

जम्मू आणि काश्मीरमधल्या निसर्गरम्य दल सरोवरमध्ये पहिल्या खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. तीन दिवसांच्या या स्पर्धेत ३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले ४००हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 21 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...