Sunday, 24 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 August 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      छत्रपती संभाजीनगर शहरासाठीची २६ एमएलडी पाणीपुरवठा योजना यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात  येणार - मुख्यमंत्र्यांचं अश्वासन

·      गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान भारत वेगानं विकसित करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      नांदेड जिल्ह्यातल्या पूरस्थितीनंतर पालकमंत्र्यांकडून आज बाधित क्षेत्राची पाहणी; खासदार अजित गोपछडे यांच्याकडून पूरग्रस्तांना २० लाख रुपयांची मदत जाहिर

·      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६७वा वर्धापन दिन साजरा

आणि

·      परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांसाठी आज पावसाचा यलो अलर्ट जारी

****

छत्रपती संभाजीनगर शहरासाठीची २६ एमएलडी पाणीपुरवठा योजना यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत ९०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी आणि २६ दश लक्ष लिटर क्षमतेच्या फारोळा इथल्या जलशुद्धीकरण केंद्रात काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन झालं, त्यावेळी ते बोलत होते.

अमृत - दोन कार्यक्रमाअंतर्गत या योजनेचं आतापर्यंत ८२ टक्के काम पूर्ण झालं आहे. या योजनेसाठी वेळोवेळी निर्णय घेऊन उपलब्ध करुन दिलेल्या निधीची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले,

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर शहरात १०० एमएलडी आणि ५६ एमएलडी क्षमतेच्या दोन पाणी पुरवठा योजना सध्या कार्यान्वित आहेत. त्यातून १४५ एमएलडी एवढा पाणी पुरवठा होत आहे. जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात येत असल्यामुळे पाणी पुरवठ्यात २६ एमएलडी एवढी वाढ होऊन एकूण १७१ एमएलडी एवढा पाणीपुरवठा होणार असून, शहरातल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

 

छत्रपती संभाजीनगर जिल्हा आता 'मॅन्युफॅक्चरिंग आणि ईव्ही' हब म्हणून उदयास येत असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, शहराचा चेहरा बदलण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करत असल्याचं नमूद केलं. या शहराला एक चांगलं रुप देण्याकरता निधीची कमतरता कमी पडू देणार नसल्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमात अगला महानगर छत्रपती संभाजीनगर या कॉफीटेबल पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.

**

दरम्यान, राज्यातल्या महिलांनी मुख्यमंत्र्यांसाठी रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठवल्या, त्यानिमित्त मुंबईत काल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या महिला स्वावलंबनाचे नवे मार्ग शोधत असल्याचं त्यांनी नमूद केलं. महिलांच्या सहभागाशिवाय विकास शक्य नसल्याचं सांगून महिलांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध योजना राबवल्या जात असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले,

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान, भारत वेगानं विकसित करत असून, लवकरच गगनयान अंतराळात झेपावेल, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. दुसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्ताने त्यांनी काल त्यांनी देशवासियांना संबोधित केलं. गेल्या काही वर्षांमध्ये भारतानं अंतराळ क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला, ते म्हणाले.

बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

****

सीबीआयनं मुंबईत अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशनच्या कार्यालयावर काल छापे टाकले. स्टेट बँकेकडून घेतलेल्या सुमारे दोन हजार ९०० कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी हे छापे टाकण्यात आले. १३ जून रोजी स्टेट बँकेनं रिलायन्स कम्युनिकेशनला दिलेलं कर्ज 'फसवणूक' या श्रेणीत वर्ग केलं होतं. कर्जाच्या रकमेचा गैरवापर केल्याचा बँकेचा दावा आहे. १७ हजार कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीनं अनिल अंबानी यांचं कार्यालय आणि इतर ठिकाणी छापे टाकून काही वस्तू जमा केल्या होत्या, तसंच त्यांची चौकशी केली होती.

****

राज्यातल्या बालकांना गोवर रुबेला लसीची पहिली आणि दुसरी मात्रा मिळून चार लाख ६४ हजार मात्रा देण्यात आल्या आहेत. कोरोना काळात गोवर रुबेला लसीकरण कमी झालं होतं. गोवरच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या वर्षात लसीकरणाचं १०० टक्के उद्दिष्ट गाठण्यात आलं असून, नवीन वर्षातील लसीकरणाचा पहिला टप्पाही पूर्ण करण्यात आला असल्याची माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉक्टर प्रवीण वेदपाठक यांनी दिली.

****

नांदेड जिल्ह्यातल्या पूरस्थितीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे आज बाधित क्षेत्राची पाहणी करणार आहेत. पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा ते आढावा घेणार आहेत.

दरम्यान, काल डॉ. अजित गोपछडे यांनी हसनाळ आणि रावणगाव इथं भेट देऊन पूरग्रस्तांची संवाद साधला. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना २० लाख रुपयांची मदत घोषित केली. या गावांचं पुनर्वसन करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करू अचं त्यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही काल किनवट तालुक्यातल्या पूरग्रस्त गावांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला.

****

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते काल मुंबईत राज्य परिवहन महामंडळाच्या पदोन्नती मिळालेल्या ३३१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांचा सत्कार करण्यात आला. रस्ते अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागानं एकात्मिक वाहतूक प्रणाली विकसित करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्यात पाचव्या क्रमांकावर महसूल मिळवून देणारा हा विभाग असून, यामध्ये आमूलाग्र सुधारणा करण्यात येत असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६७वा वर्धापन दिन काल साजरा झाला. प्रारंभी कुलगुरु डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर ध्वजवंदन झालं. त्यानंतर नाट्यगृहात मुख्य कार्यक्रम झाला. यामध्ये ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ विजयअण्णा बोराडे यांना 'जीवनसाधना' पुरस्कारानं गौरविण्यात आलं. आपला गौरव म्हणजे आपण अंगिकारलेल्या महात्मा फुलेंच्या विचारांचा गौरव असल्याचं बोराडे यावेळी म्हणाले. माती वाचवण्यासह उथळ भूस्तर वाचवण्यासाठी प्रयत्न गरजेचे असल्याचं तसंच शासनाऐवजी शेतक-यांनीच वृक्ष लागवड करुन कार्बन क्रेडिट प्राप्त करावं असही ते म्हणाले.

दरम्यान, २०२५ च्या वार्षिक परीक्षेतील १५ गुणवंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

****

जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगरच्या दल सरोवरात गेले तीन दिवस सुरु असलेल्या खेलो इंडिया जलक्रीडा स्पर्धेचा काल समारोप झाला. यात नौकानयन, कयाकिंग आणि कनोइंग स्पर्धांचा समावेश होता. मध्य प्रदेशचा संघ १८ पदकं मिळवून प्रथम स्थानावर आहे. ओडिशा आणि केरळ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. महाराष्ट्र २ पदकांसहित आठव्या स्थानावर आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण तसंच जम्मू आणि काश्मीर क्रीडा परिषदेतर्फे ‘खेलो इंडिया’ उपक्रमाअंतर्गत प्रथमच या जलक्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होत.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणाऱ्या ग्रंथपुरस्काराचं वितरण आज माजी आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या समारंभात नरहर कुरूंदकर वाङ्मय पुरस्कार अनोखे थायलंड प्रवास वर्णनासाठी वंदना पारगावकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

****

 

हवामान

मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांत पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९६ टक्क्यांच्या वर गेला आहे. धरणात सध्या २४ हजार ३९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, गोदावरी नदीपात्रात २८ हजार २९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

****

 

 

 

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 24 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...