Monday, 25 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 August 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      १३०व्या घटना दुरुस्ती विधेयकाला विरोध म्हणजे लोकशाहीला विरोध-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं परखड मत

·      आपले सरकार पोर्टलवरच्या सर्व सेवा आता व्हॉट्सॲपवरून पुरवाव्यात-मुख्यमंत्र्यांची सूचना

·      राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर- नांदेडचे डॉ. शेख मोहम्मद तसंच लातूरचे डॉ. संदीपान जगदाळे यांचा समावेश

आणि

·      उमेदच्या विक्री केंद्रांवरून गणेशमूर्ती खरेदी करण्याचं छत्रपती संभाजीनगर झेड पी चे सीईओ अंकित यांचं आवाहन

****

१३०व्या घटना दुरुस्ती विधेयकाला विरोध हा लोकशाहीला विरोध असल्याचं परखड मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शहा यांनी, आगामी काळात हे विधेयक संमत होईल, असा विश्वास व्यक्त केला. या विधेयकासंदर्भात विरोधक जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. जनतेचं सरकार कारागृहातून चालवलं जावं का, असा सवाल करत शहा यांनी या विधेयकाचं महत्त्व अधोरेखित केलं. हे विधेयक पक्ष भेदभाव करत नाही, मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचे असोत, ते जर या शिक्षेच्या कक्षेत येत असतील, तर त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. जर एखादा लोकप्रतिनिधी दोन वर्ष किंवा त्याहून अधिक काळ तुरुंगात असेल, तर त्याचं संसद सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद सध्याच्या कायद्यात असल्याचं शहा यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

****

भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयानं विकसित केलेल्या "मेरी पंचायत" मोबाईल अ‍ॅप्लिकेशनला, जिनिव्हा इथं झालेल्या जागतिक शिखर परिषदेत पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. ही कामगिरी भारताच्या डिजिटल आणि समावेशक ग्रामीण विकास मॉडेलला मिळालेली जागतिक मान्यता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

आपले सरकार पोर्टलवरुन नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या सर्व सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुरवाव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. सेवा सुलभीकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील नागरिक सेवांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या सेवा योग्य प्रकारे आणि गरजेनुसार पुरवण्याच्या दृष्टीने सर्व तालुक्यांमध्ये यंत्रणा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून साध्य राज्यात एक हजार एक सेवा पुरवण्याचं काम सुरू असून त्या पैकी ९९७ सेवा पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

****

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निबंधक तसंच भागीदारी संस्था कार्यालयाच्या उन्नत संकेतस्थळाचा आज शुभारंभ करण्यात आला. या संकेतस्थळाच्या माध्यमातून भागीदारी संस्था तसंच नागरिकांना अधिक वेगवान, पारदर्शक आणि सुलभ सेवा उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

****

राज्य परिवहन महामंडळाच्या-एसटीच्या कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचं वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. यासंदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या २६ लाख लाभार्थ्यांची छाननी करण्याचे आदेश महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हा पातळीवरच्या यंत्रणेला दिले आहेत. या छाननीनंतर त्यांची पात्रता-अपात्रता ठरणार आहे. अपात्र लाभार्थ्यांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे.

****

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आज जाहीर झाले. त्यात नांदेडचे डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदोद्दीन, लातूरचे डॉ. संदीपान जगदाळे आणि मुंबईतल्या सोनिया कपूर यांचा समावेश आहे. डॉ. शेख नांदेडमधल्या अर्धापूर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत तर जगदाळे लातूरच्या दयानंद कॉलेजात शिकवतात. कपूर या मुंबईतल्या अणूऊर्जा महामंडळाच्या शाळेत शिक्षिका आहेत. ५० हजार रुपये आणि रौप्यपदक असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या पाच सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. लातूर जिल्ह्यातून हा मान मिळवणारे जगदाळे हे पहिलेच शिक्षक ठरले आहेत. जगदाळे यांनी याबाबत आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या

बाईट – डॉ.संदीपान जगदाळे

****

सकारात्मक पत्रकारिता वाढण्यासाठी किमान एक तरी चांगली बातमी जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर आली पाहिजे असं मत पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी व्यक्त केलं आहे. बीडचे ज्येष्ठ संपादक सर्वोत्तम गावरस्कर यांना मराठी पत्रकार परिषदेचा नागोजीराव दुधगावकर स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान आज प्रदान करण्यात आला, त्यावेळी डॉ.लहाने बोलत होते. गावरस्कर यांनी कुठलाही आधार नसतांना स्वतःचे साप्ताहिक सुरू केले तसंच दोन जिल्ह्यात दैनिक चालवल्याचं सांगून डॉ.लहाने यांनी गावस्कर यांच्या कार्याची गौरव केला.

****

महानुभाव पंथाचे संस्थापक श्री. चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिन आज साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्रधर स्वामींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. बीड इथं सावरकर महाविद्यालयात अवतार दिन साजरा झाला

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा परवा २७ तारखेला मुंबईकडे निघणार आहे. हा मोर्चा जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथून निघून शहागड, तुळजापूर, पैठण, शेवगावमार्गे पुढे जाणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही मार्गांवरच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.

****

नांदेडमधून मराठा समाज बांधव मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी २६ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे पोहोचणार आहेत. या ठिकाणाहून ते मुंबईकडे जाणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने श्याम पाटील वडजे, संकेत पाटील, सुभाष कोल्हे आदींनी दिली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज राज्यस्तरीय शेतकरी हक्क बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुभेदारी विश्राम गृहात झालेल्या या बैठकीत शेतकरी कर्जमाफी, सातबारा कोरा करणं, मुंबई आंदोलन, शेतमालाला हमी भाव, आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. जानकर यांनी या बैठकीबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले -

बाईट – महादेव जानकर

****

छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा परिषदेच्या उमेद अभियानातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या गणेशमूर्तीचे प्रदर्शन आणि विक्री येत्या २७ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. औरंगपुरा परिसरातील जिल्हा परिषद मैदानावर हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे, या प्रदर्शन आणि विक्री केंद्राला आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित तसंच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक वासुदेव सोळंके यांनी भेट देऊन पाहणी केली. नागरिकांनी या स्टॉल्सवरुन मूर्ती खरेदी करण्याचं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी केलं.

बाईट – अंकित, सीईओ, जि.प.

****

दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींचे प्राधान्यक्रमाने निराकरण करा असे निर्देश बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सर्व पोलीस स्थानक प्रमुख आणि अप्पर पोलीस अधिक्षकांना दिले आहेत. दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांच्या तक्रारीची दखल घेऊन हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

****

हवामान

मुंबई आणि पालघरसह कोकण तसंच खानदेशात पुढचे तीन दिवस तर विदर्भात उद्यापासून पुढचे दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्यात आज आणि उद्या तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत परवा, यलो अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवार तसंच शुक्रवारीही मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments: