Monday, 25 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 August 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

 

·      राज्यात साडे तीन हजार गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करण्यात येणार - मुख्यमंत्र्यांची माहिती; सातनवरी या पहिल्या स्मार्ट आणि इंटेलिजंट गावाचा शुभारंभ

·      शेतकऱ्यांनी कृषी उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञानाचा वापर करावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन

·      विधिमंडळं ही जनतेचा आवाज पोहोचवण्याचं माध्यम बनायला हवी - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

·      राज्यातल्या धरणांमधला पाणीसाठा सरासरी ८२ टक्क्यांवर, जायकवाडी धरणाच्या आठ दरवाज्यांतून विसर्ग

आणि

·      मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांसाठी आज पावसाचा यलो अलर्ट

****

स्मार्ट आणि इंटेलिजंट योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातली सुमारे साडेतीन हजार गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. केंद्रीय दूरसंचार मंत्रालयांतर्गत कार्यरत व्हाईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायजेसने देशांतर्गत २४ कंपन्यांच्या संघटनांसोबत एकत्र येत राज्य शासन आणि नागपूर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सातनवरी गावात आधुनिक तंत्रज्ञान आधारित सेवा उपलब्ध करून देत या गावाला देशातलं पहिलं स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव बनवलं आहे. प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आलेल्या या गावाचा शुभारंभ काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या योजनेअंतर्गत कृषी, आरोग्य, शिक्षण अशा १८ वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे संपूर्ण सातनवरी गावाचं परिवर्तन होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पुढे जात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून महत्वाच्या सुविधा सातनवरी गावात उपलब्ध करून देत समृद्ध गावाचं रोल मॉडेल उभं राहिलं असल्याचं फडणवीस म्हणाले.

****

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचं नवीन पर्व सुरू झालं असून, शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि विषमुक्त सेंद्रिय शेतीकडे वळावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. पुण्यात काल राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या ६५व्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. द्राक्ष बागायतदार संघाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक असून, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, अशी ग्वाही पवार यांनी दिली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यावेळी उपस्थिती होते. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सरकार काम करत असून, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य सरकार विविध योजना आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

देशाच्या संसदेची आणि पीठासीन अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा राखणं महत्वाचं असून, विधिमंडळं ही जनतेचा आवाज पोहोचवण्याचं माध्यम बनायला हवी, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल अखिल भारतीय विधिमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

बाईट- केंद्रीय गृहमंत्री अमित

 देशाच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून विठ्ठलभाई पटेल यांनी पदभार स्वीकारल्याच्या घटनेला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ही परिषद दिल्ली विधानसभेत आयोजित केली आहे.

दरम्यान, या परिषदेत संसद आणि विधानसभांच्या कार्यप्रणालीवर केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी भाष्य केलं. विरोधकांना सरकारच्या निर्णयांवर प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, मात्र कामकाजात अडथळा आणता येणार नाही, वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येतात तेव्हा संघर्ष स्वाभाविक असतो, पण तो लोकशाहीत रचनात्मक असावा, असं मत रिजिजू यांनी व्यक्त केलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या हसनाळ, रावणगाव, भासवाडी, मुक्रमाबाद या गावांना पालकमंत्री अतुल सावे यांनी काल भेट देवून पाहणी केली. या गावांमध्ये अनेक घरांची पडझड झाली, तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. या सर्व नुकसानीचे पंचनामे सुरू असून, नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील, अशी ग्वाही सावे यांनी दिली. हसनाळ इथल्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत यावेळी देण्यात आली.

****

भगवान बिरसा मुंडा यांच्या दिडशेव्या जयंती वर्षानिमित्त ‘आदिवासी गौरव’ विशेष कार्यक्रमांतर्गत ‘भारतीय इतिहासाच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचं योगदान आणि भूमिका’ या विषयावर आधारित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन काल आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते झालं. या चर्चासत्राच्या निमित्ताने बीडमध्ये देशभरातले अभ्यासक एकत्र आले आहेत, यातून आदिवासींच्या योजनांची आखणी होईल आणि त्याचा मोठा लाभ भविष्यात मिळेल, असा विश्वास केराम यांनी व्यक्त केला.

****

गेल्या आठवड्यात सर्वच भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातल्या धरणांमधला पाणीसाठा ८२ टक्क्यांवर पोहोचला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा राज्यातले २० मोठे प्रकल्प १०० टक्के भरले असून, सर्वच धरणांचा पाणीसाठा सरासरीपेक्षा चांगलाच वाढला आहे. मराठवाड्यातही यंदा ७५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणात सध्या १५ हजार ९०५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे. धरणाच्या आठ दरावाजातून चार हजार १९२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

****

सरकारने लेखकांना निवृत्ती वेतनासारखं मानधन देणं गरजेचं असल्याचं मत माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम यांनी व्यक्त केलं. छत्रपती संभाजीनगर इथं काल मराठवाडा साहित्य परिषदेचे पुरस्कार भापकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. लेखक हा कायम शिक्षकाच्या भूमिकेत तर शिक्षक हा लेखकाच्या भूमिकेत असतो, लेखकांनी केलेली निर्मिती ही कायम अजरामर होत असते, त्यामुळे आपल्या देशामध्ये लेखकांना खुप चांगल्या प्रकारे मान सन्मान मिळतो, असंही त्यांनी नमूद केलं.

या कार्यक्रमात नरहर कुरूंदकर वाङ्मय पुरस्कार वंदना पारगावकर यांना, म. भि. चिटणीस वाङ्मय पुरस्कार सचिन कुसनाळे यांना, बी. रघुनाथ वाङ्मय पुरस्कार पांडुरंग मुरारी यांना, तर रा. ज. देशमुख स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथल्या कैलाश पब्लिकेशन्सला प्रदान करण्यात आला.

****

परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं पोलीस विभाग तसंच गंगाखेड सायकल ग्रुपच्या वतीनं काल अंमली पदार्थांच्या विरुद्ध जनजागृती करण्यासाठी सायकल रॅली आणि प्रभात फेरी काढण्यात आली. या रॅलीला पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी हवेत तिरंगी फुगे सोडत सुरुवात केली. या अशा उपक्रमातून नशामुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यास मदत होत असल्याचं परदेशी यावेळी म्हणाले,

बाईट- रवींद्र सिंह परदेशी, पोलिस अधीक्षक परभणी

****

हिंगोली जिल्हा पोलीस आणि राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १२ यांच्या संयुक्त विद्यमाने काल हिंगोली फिट इंडिया सायकल स्पर्धा घेण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरुवात झाली. नागरीक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते.

****

गणेश मंडळांनी पुढाकार घेऊन शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणात डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समन्वय समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. प्रशासनाने विविध समस्या सोडवून गणेशोत्सवाची तयारी केली आहे, मंडळांनी डीजे ऐवजी पारंपारिक वाद्य, ढोलताशे आणि इतर वाद्यांचा वापर करावा, पोलीस प्रशासनाने अंमली पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध करत योग्य कारवाई करावी, आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

****

नांदेडहून मुंबईला धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला उद्या २६ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करतील. जालना-मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेसला नांदेड पर्यंत विस्तार देण्यात आला आहे.

****

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी काल बीड जिल्ह्यात मांजसुंबा इथं सभा घेऊन, आरक्षणाची उद्यापर्यंत अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे. सरकारने काही निर्णय न घेतल्यास २७ तारखेला मुंबईकडे कुच करणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला.

****

हवामान

राज्यात आज कोकणातील बहुतांश जिल्ह्यांना प्रादेशिक हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरीत जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

****

No comments: