Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01 October 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभर
वर्षांचा गौरवशाली प्रवास हा त्याग, निःस्वार्थ सेवा, राष्ट्रनिर्माण
आणि शिस्त यांचं अनोखं उदाहरण आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी केलं. नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभात
आज ते बोलत होते. शतकापूर्वी संघाची झालेली स्थापना ही प्रत्येक कालखंडातील आव्हानांना
तोंड देण्यासाठी उभ्या राहिलेल्या राष्ट्रीय अस्मितेच्या चिरस्थायी भावनेचं प्रतिबिंब
आहे. संघाचे स्वयंसेवक देशसेवा आणि समाजाच्या सक्षमीकरणासाठी अथकपणे समर्पित आहेत,
असं पंतप्रधान म्हणाले.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाच्या देशाप्रती असलेल्या योगदानाबद्दल विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं
अनावरण करण्यात आलं. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची याप्रसंगी
उपस्थिती होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज
महानवमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. महानवमी सर्वांच्या जीवनात सौभाग्य, समृद्धी आणि यश घेऊन येवो, असं त्यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात
कोणताही बदल केला नाही. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या
निर्णयांची आज माहिती दिली. २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत रिझर्व्ह बँकेच्या
पतधोरण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय
घेण्यात आल्याचं संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रेपो दर पाच पूर्णांक पाच टक्क्यांवर
कायम ठेवण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष २०२६ साठी महागाईचा दर
दोन पूर्णांक ६ टक्के एवढा राहिल, असा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी हा दर तीन पूर्णांक एक टक्के
राहिल असा अंदाज व्यक्त केला होता. जीएसटी दरांच्या सुसूत्रीकरणामुळं जागतिक व्यापार
आणि इतर अनिश्चिततेशी संबंधित समस्या दूर होतील, असं मल्होत्रा
म्हणाले.
****
ग्राहकांची बंद पडलेली बँक खाती
तसंच कोणताही दावा न करण्यात आलेल्या ठेवी आणि रक्कमा ग्राहकांना परत मिळाव्यात यासाठी
भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक योजना जाहीर केली आहे. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत या योजनेचा
ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. ग्राहकांनी त्यांची निष्क्रीय बँक खाती सक्रीय करावीत
आणि बँकेत असलेल्या आणि दावा न केलेली रक्कम किंवा ठेवी त्यांना परत मिळाव्यात या उद्देशाने
ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
****
मध्य रेल्वेनं स्वदेशी रेल्वे सुरक्षा
प्रणाली कवच पनवेल रोहा रेल्वेमार्गावर यशस्वी चाचणी केली. चार हजार किलोमीटर लांबीच्या
रेल्वेमार्गाच्या जाळ्यात कवच तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराच्या दृष्टीने हे एक महत्वपूर्ण
पाऊल आहे.
****
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे
झालेल्या नुकसानीचे पंचनामे तसंच मदत वाटपाचा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे
भोसले यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा
घेतला. पूरग्रस्त भागात स्वच्छता, आरोग्य विषयक उपाययोजना प्रभावीपणे राबवा अशा सूचना त्यांनी केल्या.
****
सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात
वाढ झाली. २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमसाठीचा दर एक लाख १७ हजार ६२० रुपये आहे. तर, १० ग्रॅम चांदीचा दर एक हजार ४३८ रुपये
एवढा आहे.
****
राज्यात पावसानं काही प्रमाणात उघडीप
दिली असली, तरी
धरणांतून पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरू आहे. मांजरा धरणातून नदीपात्रात तीन हजार ४९४
घनफूट प्रतिसेकंद, तर जायकवाडी धरणातून विसर्ग कमी करण्यात आला
असून सध्या ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
राज्यातलं शक्तीपीठ आणि लाखो भाविकांचं
श्रद्धास्थान असलेल्या अंबेजोगाईमधल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाची
रात्री पुर्णाहुतीनं सांगता झाली. बीडच्या अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी जिरगे यांनी
सहकुटुंब, देवीची
विधीवत महापुजा केली. या महापुजेनंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
****
आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत
आज इंदोर इथं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघादरम्यान सामना होणार आहे. काल झालेल्या
सलामीच्या लढतीत भारतीय संघानं श्रीलंकेवर विजय मिळवला. भारतीय संघाचा पुढला सामना
रविवारी पाकिस्तानविरुद्ध कोलंबो इथं खेळवण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment