Wednesday, 1 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 October 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      दुष्काळी टंचाईच्या काळातल्या सवलती आणि उपाययोजना अतिवृष्टीच्या काळात लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

·      राज्य सरकार कर्करोग उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यात दर्जेदार उपचार उपलब्ध करुन देणार

·      या वर्षीचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्याचा निर्णय

·      महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा विजयी प्रारंभ

आणि

·      राज्यात आज विदर्भातल्या काही जिल्ह्यांसह नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट

****

दुष्काळी टंचाईच्या काळात ज्या सवलती आणि उपाययोजना केल्या जातात त्या सर्व अतिवृष्टीच्या काळात लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. काल मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची कोणतीच तरतूद नसल्याने आजवर कधीच ओला दुष्काळ जाहीर झाला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी २ हजार २१५ कोटींच्या निधी वितरणाला यापूर्वीच मान्यता देण्यात देत, त्यासाठी ईकेवायसीची अट शिथिल केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुढील दोन-तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने राज्यभरात ६० लाख हेक्टर शेतपिकांचं नुकसान झालं आहे, ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालं त्याची भरपाई देण्यासाठी सर्वंकष धोरण निश्चित करण्यात येणार असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत पोहचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात एक हजार ३७३ कुटुंबांना गेल्या दोन दिवसात प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

****

राज्य सरकार कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण आखून प्रत्येक जिल्ह्यात कर्करोगावर दर्जेदार उपचार उपलब्ध करुन देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. राज्यभरात १८ रुग्णालयांमधे कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध होतील. यासाठी १०० कोटी रुपये भाग भांडवलाची महाकेअर, अर्थात महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन ही कंपनी स्थापन केली जाणार आहे.

राज्याचं जागतिक क्षमता केंद्र - ग्लोबल कॅपेबिलीटी सेंटर धोरण २०२५ काल मंजूर झालं. औद्योगिक, वाणिज्यिक तसंच इतर वर्गवारीतील ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री कर आकारण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यामुळे प्रधानमंत्री कुसुम घटक-ब तसंच अन्य योजनेंतर्गत सौर कृषीपंपासाठी वीज पुरवठ्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे.

****

या वर्षीचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यंदा ऊसासाठी प्रति मेट्रीक टन तीन हजार ५५० रुपये रास्त आणि किफायतशीर दर देण्यात येईल तर बेसिक उताऱ्यासाठी सव्वा १० टक्के अतिरिक्त दर देण्यात येणार आहे. यातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन १० रुपये तर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन ५ रुपये कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

****

राज्यातल्या कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं एका दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही आपलं एका महिन्याचं वेतन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीस देणार असल्याचं सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, आपलं एका दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यास सहमती दर्शवली आहे.

****

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या छत्रपती संभाजीनगर शाखेतर्फे काल पैठण पूरग्रस्त भागात आरोग्य तपासणी शिबीर घेऊन धान्य वाटप उपक्रम राबवण्यात आला. सुमारे ११० धान्यपाकिटांचं यावेळी वाटप करण्यात आलं. नागरिकांची आवश्यक तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.

****

राज्यात पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली असली, तरी धरणांतून पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरू आहे. माजलगाव धरणातून बाराशे घनफूट प्रतिसेकंद, तर जायकवाडी धरणातून विसर्ग कमी करण्यात आला असून सध्या एक लाख तेरा हजार १८४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

****

नवरात्रोत्सवात महानवमीचा सण आज साजरा होत आहे. काल दुर्गाष्टमीला ठिकठिकाणी होम हवन आणि सप्तशती पाठासह विविध धार्मिक उपक्रम पार पडले.

****

तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीची काल महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.

दरम्यान, तुळजापूर इथं मंदिर परिसरात बाल भिक्षेकरी पुनर्वसन मोहीम राबवण्यात आली. दोन सत्रात पार पडलेल्या या मोहिमेत सकाळी ३ तर दुपारी ४ अशी एकूण ७ बालकांची सुटका करून त्यांना धाराशिव इथल्या बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आलं.

दरम्यान, नांदेड इथल्या माहूर रेणुका देवी संस्थान तर्फे पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.

****

सेवा आणि सुशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. 'सेवा पर्व' या विशेष मालिकेच्या आजच्या भागात, जी-टवेन्टी शिखर परिषदेच्या माध्यमातून भारतानं साऊथ ग्लोबलचा बुलंद केलेला आवाज आणि जागतिक पातळीवर उदयास येणारं भारताचं नेतृत्व याविषयी जाणून घेऊ...

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारत एक प्रबळ जागतिक नेतृत्व म्हणून उदयास आला आहे. २०२३ मध्ये भारताच्या जी-टवेन्टी परिषदेच्या अध्यक्षपदामुळे ग्लोबल साऊथ या संकल्पनेचा उदय झाला. आफ्रिकन युनियनचे सदस्यत्व आणि जागतिक जैवइंधन आघाडीची सुरुवात यांचा यात समावेश आहे. जी-ट्वेन्टी परिषदेच्या नवी दिल्ली घोषणापत्रात धोरणात्मक सुसंगतता, विश्वासार्ह व्यापार आणि महत्त्वाकांक्षी हवामान कृती यावर लक्ष केंद्रित करून या प्रमुख प्राधान्यक्रमांमध्ये सहकार्याची नवी भावना भारतानं रुजवली आहे. हे घोषणापत्र उल्लेखनीय आहे, कारण यावर सर्व जी-ट्वेन्टी सदस्य देशांनी स्वाक्षरी केली आहे. आफ्रिकन युनियनचा जी-ट्वेन्टीत कायमस्वरूपी सदस्य म्हणून समावेश केल्यामुळं आता जी-ट्वेन्टी समूह जागाच्या 80 टक्के लोकसंख्येच्या भागाचे प्रतिनिधीत्व करतो.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

ग्लोबल साऊथला आवाज मिळवून देण्याव्यतिरिक्त, भारतानं जी-ट्वेन्टी परिषदेचा अध्यक्ष या नात्यानं देशभरात बैठका घेऊन आपला सांस्कृतिक वारसा जगासमोर प्रदर्शित करण्यातही देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.’’

****

प्रलयंकारी किल्लारी भूकंपाला काल ३२ वर्ष झाली. ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास झालेल्या या भूकंपामुळे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर जिवीत आणि वित्त हानी झाली. या दुर्घटनेतल्या मृतांना काल लातूर इथं पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून सर्व मृतांना अभिवादन करण्यात आलं.

दरम्यान, लातूर जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये मागील काही महिन्यांपासून भूकंपाचे सौम्य धक्के आणि गूढ आवाज येत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, कोणतीही घटना आढळल्यास तात्काळ नजीकच्या तहसील कार्यालयाला कळवावं, असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं केलं आहे.

****

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत भारतीय संघानं श्रीलंकेवर विजय मिळवला. पावसाचा अडथळा आलेल्या या सामन्यात भारतानं डकवर्थ लुईस पद्धतीनुसार ५९ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना २६९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा डाव २११ धावांवर आटोपला. दीप्ती शर्मा हिला अष्टपैलू कामगिरीमुळं उत्कृष्ठ खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

****

हवामान

राज्यात आज विदर्भातल्या काही जिल्ह्यांसह नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नव्याने मतदार नोंदणी करावी, असं आवाहन परभणी तसंच लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

No comments: