Wednesday, 1 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 01 October 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ ऑक्टोबर २०२ सकाळी.०० वाजता

****

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची आज माहिती दिली. रेपो दरात कोणताही बदल केला नाही. २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संजय मल्होत्रा यांनी दिली. रेपो दर पाच पूर्णांक पाच टक्क्यांवर कायम ठेवण्यात आलेला आहे. वस्तू आणि सेवा करातील दर कपात केल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

दरम्यान, शिरीष चंद्र मुर्मु यांची भारतीय रिझर्व बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल. शिरीष चंद्र मुर्मू सध्या रिझर्व्ह बँकेत कार्यकरी संचालक पदावर कार्यरत आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होत आहेत. संघाचा वारसा, सांस्कृतिक योगदान आणि देशाच्या एकतेप्रति संघाची भूमिका याबद्दल या सोहळ्यात माहिती विषद करण्यात येईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं देशाप्रति योगदान प्रदर्शित करणाऱ्या विशेष टपाल तिकिटाचं तसंच नाण्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते या सोहळ्यात करण्यात येणार आहे.

****

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, त्याप्रमाणे विभागाने गतीने कार्यवाही सुरु केली असून पुढील तीन ते चार दिवसात नुकसानग्रस्तांच्या खात्यावर भरपाई जमा करण्यावर विभागाचा भर असल्याचं प्रधान सचिव विनिता सिंघल यांनी सांगितलं आहे.

दरम्यान शेतकऱ्यांसाठी पीक पाहणीला महिनाभर मुदतवाढ देण्यात आली असून येत्या ३१ ऑक्टोबर पर्यंत पीक पाहणी करण्या संदर्भातले आदेश महसूल विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जारी केले आहेत, या पाहणीचा रोज आढावा घ्यावा, तसंच ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी पीक पाहणीची शंभर टक्के तपासणी करावी असं या निर्देशात म्हटलं आहे.

****

नागपूरच्या दीक्षाभूमीत एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उद्या २ ऑक्टोबर रोजी मुख्य सोहळा होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते आज दीक्षाभूमी परिसरातील मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. काल ३० सप्टेंबर पासूनच दिक्षाभूमीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अनुयायांच्या सोयीकरिता नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, मध्य रेल्वे तसंच नागपूर मेट्रो रेल्वेने देखील सुविधा सुनिश्चित केल्या आहेत.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सार्ध शताब्दी महोत्सवाच्या 'वंदे मातरम' गीताच्या बोधचिन्हाचं अनावरण काल करण्यात आलं. देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक असलेल्या 'वंदे मातरम' गीताला येत्या ७ नोव्हेंबर रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने सार्ध शताब्दी महोत्सव समितीच्या माध्यमातून देशभक्तीवर विविध कार्यक्रम होणार असून यात प्रामुख्याने 'वंदे मातरम' गीताचं प्रत्येक तालुक्यात समूहगान होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं एक दिवसाचं वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला असून त्यापोटी  ५० लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द केला आहे.

****

शारदीय नवरात्रोत्सवात आज महानवमी साजरी होत आहे. उद्या नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे. काल महाअष्टमीसाठी अनेक मंदिरात महिलांची मोठी गर्दी होती. श्री तुळजाभवानी देवीची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा काल संपन्न झाली.

उद्या साजऱ्या होणाऱ्या विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या सणाचा उत्साह सर्वत्र बघायला मिळत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला हा सण संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

****

नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी काल माहूर इथं विविध विकास कामांचा आढावा घेतला. भाविकांच्या सोयीसाठी स्काय वॉकचं काम दिवाळीपूर्वी सुरू होणार आहे. भाविकांच्या सुविधेसाठी व्यापारी संकुल, पार्किंग सुविधा आणि निवास व्यवस्था यांच्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

बीड विधानसभेचे आमदार संदीप रवींद्र क्षीरसागर यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर नामनियुक्ती करण्यात आली आहे.

****

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने काल छत्रपती संभाजीनगर इथल्या विभागीय आयुक्त कायार्लयावर मोर्चा काढण्यात आला. अतिवृष्टीग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं.

****

राज्यात पावसानं काही प्रमाणात उघडीप दिली असली, तरी धरणांतून पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरू आहे. मांजरा धरणातून नदीपात्रात तीन हजार ४९४ घनफूट प्रतिसेकंद, तर जायकवाडी धरणातून विसर्ग कमी करण्यात आला असून सध्या ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

****

No comments: