Thursday, 2 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 02 October 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

परावलंबन आपल्यासाठी सक्ती बनू नये आणि आपण आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार वागू शकू, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळा साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. पहलगाम हल्ल्यानंतरच्या संपूर्ण प्रतिसाद काळात, आपण देशाच्या नेतृत्वाची दृढता, सशस्त्र दलांचं शौर्य आणि युद्ध-तत्परता पाहिली असं ते म्हणाले. आपल्या भाषणात भागवत यांनी अशांत शेजारी आणि भारताची भूमिका, विकास, पर्यावरण संवर्धन, सांस्कृतिक एकता, भारताचे तात्विक दृष्टिकोन अशा अनेक मुद्यांवर भाष्य केलं.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि डॉ. भीमराव रामजी आंबेडकर या दोन्ही नेत्यांच्या सामाजिक एकता आणि समरसतेच्या तत्वज्ञानामुळे आपल्या सारख्या व्यक्तीला राष्ट्रपती पदाच्या सर्वोच्च पदावर पोहोचणं शक्य झाल्याचं कोविंद यावेळी म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर १९७५ मध्ये बंदी आणली गेली, पण या आणीबाणीच्या काळातही संघानं भूमिगत चळवळ राबवून एक प्रभावी प्रतिरोध उभा केला. आदर्श विचार, त्याग आणि धैर्यामूळे संघ आज जगातली सगळ्यात मोठी स्वयंसेवकांची संस्था बनली असल्याचं कोविंद यांनी यावेळी नमूद केलं.

बौद्ध आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांचा शताब्दी सोहळ्याच्या शुभेच्छा संदेशही यावेळी वाचण्यात आला.

****

६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं नागपूर इथं दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत. यानिमित्त आज सकाळी विशेष बुद्ध वंदना आयोजित करण्यात आली होती. यावेळी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी अनुयायांना बुद्ध वंदना दिली.

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या बुद्ध लेणी परिसरातल्या विपश्यना केंद्रान धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आज साजरा होत आहे. आज सरस्वती पूजन, शस्त्र पूजन तसंच वाहन पूजनही केलं जातं, या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली आहे. हिंदू कालगणनेनुसार साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणानिमित्त सोन्याचांदीच्या आभुषणांसह विविध वस्तू खरेदीचा प्रघात आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमी हा सकारात्मकतेचा संदेश घेऊन येणारा सण असून जनतेला सत्य आणि न्यायाच्या मार्गावर जाण्याची प्रेरणा देतो, असं त्यांनी म्हटलं आहे. तर हा सण सर्वांना धैर्य, ज्ञान आणि भक्तीच्या मार्गावर चालत राहण्याची प्रेरणा देवो असं पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

****

शिवसेनेचा दसरा मेळावा आज मुंबईत गोरेगाव इथं होणार आहे. दसरा मेळावा हे शक्तिप्रदर्शन नसून, शेतकऱ्यांची सेवा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे.

****

अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी इथं साईबाबा पुण्यतिथी निमित्त तीन दिवसीय कार्यक्रम कालपासून सुरु झाला. आज विजयादशमीच्या दिवशी भाविकांसाठी मंदिर दिवसभर खुलं राहणार आहे.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजींचं समाधीस्थळ राजघाट, तसंच शास्त्रीजींचं समाधीस्थळ विजयघाट इथं पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं.

****

पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणात सध्या ३२ हजार ८३९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे धरणातून सध्या १८ हजार ८६४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडलं जात आहे. माजलगाव धरणातून आठ हजार ४१५, येलदरी धरणातून चार हजार २२०, तर मांजरा धरणातून पाच हजार २४१ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचं विसर्ग सुरु आहे.

****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पाहिला सामना आजपासून अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सुरु झाला. वेस्ट इंडिजच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा त्यांच्या सहा बाद १२८ धावा झाल्या होत्या. मोहम्मद सिराजने चार, जसप्रित बुमराह आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक गडी बाद केला.

****

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी काल लातूर, नांदेड तसंच सोलापूर इथं आंदोलन करण्यात आलं. जालना इथं धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे हे गेल्या १५ दिवसांपासून उपोषण करत आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

No comments: