Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 October 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
विजयादशमीचा सण सर्वत्र
उत्साहात साजरा-राज्यभरात विविध राजकीय पक्षांचे दसरा मेळावे
·
नैतिक मूल्यांवर राजकारणात
सहभाग, हे जनसेवेचं प्रभावी माध्यम-माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं संघ शताब्दी
सोहळ्यात प्रतिपादन
·
हजारो बौद्ध अनुयायांच्या
उपस्थितीत ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
आणि
·
भारत-वेस्ट इंडिज कसोटी
क्रिकेट मालिकेला प्रारंभ
****
विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आज साजरा होत आहे. वाईटावर
चांगल्याच्या विजयाचं प्रतीक असलेल्या आजच्या दिवशी सरस्वती पूजन, शस्त्र
पूजन तसंच वाहन पूजनही केलं जातं, सायंकाळी सीमोल्लंघनानंतर घरोघरी
आपट्याची पानं देण्यासाठी होणारे स्नेहमिलन कार्यक्रम, आणि
रावणदहन ही या सणाची विशेष ओळख आहे.
हिंदू कालगणनेनुसार साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या
या सणानिमित्त सोन्याचांदीच्या आभुषणांसह विविध वस्तू खरेदीचा तसंच नवीन
उपक्रमांना प्रारंभ करण्याचा प्रघात आहे.
****
श्री क्षेत्र तुळजापूर इथं, आज पहाटे तुळजाभवानी
देवीचा पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा उत्साहात पार पडला. देवीची मूर्ती १०८
साड्यांमध्ये गुंडाळून अहिल्यानगरच्या भिंगार इथून आलेल्या मानाच्या पलंग पालखीतून
मिरवणूक काढण्यात आली. सीमोल्लंघनानंतर देवीच्या मंचकी निद्रेला प्रारंभ झाला. आता
अश्विनी पौर्णिमेला देवी पुन्हा सिंहासनारूढ होईल.
मराठवाड्यात माहूर, अंबाजोगाईसह राज्यात
कोल्हापूरच्या अंबाबाईचा तसंच नाशिक जिल्ह्यात सप्तश्रृंगी देवीचा सीमोल्लंघन
सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे.
छत्रपती संभाजीनगर इथंही कर्णपुरा परिसरात तुळजाभवानी
देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. जालना शहरात नवरात्रात पूजन
केलेल्या देवींच्या मूर्तींचं आज शहरातल्या मोती तलावातल्या कुंडात विसर्जन केलं
जात आहे.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी इथं साईबाबा पुण्यतिथी निमित्त
तीन दिवसीय कार्यक्रम कालपासून सुरु झाला. आज विजयादशमीच्या दिवशी भाविकांसाठी
मंदिर खुलं राहणार आहे.
****
राज्यात विविध पक्षांचे दसरा मेळावे आज होत आहेत. शिवसेनेचा
दसरा मेळावा आज मुंबईत गोरेगाव इथं होणार आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाचा दसरा मेळावा मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे.
बीड जिल्ह्यात सावरगाव इथं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा पार पडला. बीड जिल्ह्याचं
हक्काचं पाणी आणून दुष्काळ मुक्तीचं आश्वासन, पंकजा मुंडे यांनी दिलं.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलतांना बीड जिल्ह्यात निर्माण झालेला
जातीपातीचा द्वेष संपला पाहिजे असं मत व्यक्त केलं.
****
जिल्ह्यात नारायणगड इथं झालेल्या दसरा मेळाव्यात मराठा
आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. जे मिळालं ते भरपूर
मिळालं, समाधानी रहा,
उतावीळ वागू नका असा सल्ला मनोज जरांगे यांनी दिला. यापुढे
ओबीसी समाजाला दोष देऊ नये,
असंही जरांगे यांनी सांगितलं आहे.
****
बाईट – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद
सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या संबोधनात सामाजिक समरसता, कुटुंब
प्रबोधन, पर्यावरण संरक्षण,
शिस्त आणि संविधानाचं पालन या पंचसूत्रीचा अधिकाधिक अवलंब
करण्याचं आवाहन केलं. आत्मनिर्भर भारत निर्माण करताना देशाच्या गरजेनुसारच इतर
राष्ट्रांवर अवलंबून रहावं,
असंही ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते. बौद्ध आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांचा शताब्दी
सोहळ्याच्या शुभेच्छा संदेशही यावेळी वाचण्यात आला.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच माजी पंतप्रधान लालबहादूर
शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती
संभाजीनगर आणि जालन्यासह सर्वत्र गांधीजी आणि शास्त्रीजींना आदरांजी अर्पण करण्यात
आली.
****
६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज साजरा होत आहे. या
पार्श्वभूमीवर बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं नागपूर इथं दीक्षाभूमीवर दाखल झाले
आहेत. आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन
सुराई ससाई यांनी अनुयायांना बुद्ध वंदना दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कामठी इथं ड्रॅगन
पॅलेस टेम्पलला भेट देत भगवान गौतम बुद्धांना अभिवादन केलं. यावेळी झालेल्या बुद्ध
वंदनेत मुख्यमंत्री सहभागी झाले.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या बुद्ध लेणी परिसरातल्या
विपश्यना केंद्रान धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन
करण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी नं
प्रवाशांच्या सोयीसाठी ‘आपली एसटी’ या नवीन ॲपचं लोकार्पण केलं आहे. या ॲपमुळे वाट
पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठिकाणा कळणार असून, प्रवास
अधिक सुलभ,
सोयीस्कर आणि पारदर्शक होणार आहे.
****
बिहारच्या बुद्धगया इथल्या महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन
बौद्धांच्या हाती द्या,
या मागणीसाठी मुंबईत येत्या १४ ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय
विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज
नागपूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
सेवा आणि सुशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर
प्रयत्नरत आहे. 'सेवा पर्व'
या विशेष मालिकेच्या आजच्या भागात ऑपरेशन सिंदूरच्या
माध्यमातून दिसून आलेली लष्करी ताकद आणि स्वदेशी तंत्रज्ञानातील उत्कृष्टतेसाठीची
कटिबद्धता,
त्याविषयी जाणून घेऊ.
आजच्या भारताची ओळख फक्त शांतताप्रिय राष्ट्र अशी नाही तर सशक्त, निर्णायक आणि तंत्रज्ञानदृष्ट्या स्वावलंबी जागतिक शक्ती म्हणूनही
भारताची ओळख निर्माण झाली आहे. लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील विशेष
चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे
भाषण जागतिक पातळीवर भारताची बदलती प्रतिमा
अधोरेखित करतं..
22 मिनट में 22 अप्रैल का बदला निर्धारीत लक्ष्य के साथ हमारी सेना ने ले लिया।
पहले जहां कभी नही गये थे, वहां हम पहुंचे। पाकिस्तान के कोने कोने में आतंकि अड्डों
को धुआं धुआं कर दिया।
२२ एप्रिल रोजी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतानं ६ आणि ७ मे च्या मध्यरात्री ऑपरेशन
सिंदूर ही मोहीम हाती घेतली. या
मोहिमेत, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी अड्डे निष्प्रभ करण्यात
आले. यातून दिलेला संदेश स्पष्ट होता, तो म्हणजे आवश्यकता पडल्यास भारत जलद
आणि निर्णायक कारवाई करतो.
ऑपरेशन सिंदूरनं भारतीय सैन्यदलांची ताकद आणि तांत्रिक कौशल्य दाखवून दिलं. मेड इन इंडिया एअर
डिफेन्स सिस्टीम आणि ब्राह्मोस
क्षेपणास्त्रांनी उत्कृष्ट कामगिरी केली, तर स्वदेशी ड्रोन आणि एआय-आधारित
प्रणालींनी अतुलनीय क्षमता दाखवली. पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणाली आणि
महत्त्वाच्या ठिकाणांचा नाश हा भारताच्या वाढत्या लष्करी सामर्थ्याचा पुरावा आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेले कानपूर इथले शुभम द्विवेदी यांच्या पत्नीनं ऑपरेशन सिंदूर मोहिमेबद्दल सरकारचे आभार मानले.
उन्होनें मेरे पती की मौत का बदला लिया है। धन्यवाद कहुंगी। लेकिन हां, जिस
तरीके से हमारे पुरे परिवार को उनपे था, उन्होनें उसी तरीके से जवाब देके हमारे विश्वास
को कायम रखा है।
ऑपरेशन सिंदूरमधून फक्त भारताची लष्करी आणि तांत्रिक ताकदच दाखवली नाही तर न्यायाचं एक नवीन रूप दाखवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे, ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलं नाही, ते सध्या स्थगित केलं आहे आणि जर
पुन्हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला पुन्हा झाला तर
भारत मोठा हल्ला करून त्यांचं प्रत्युत्तर देईल.
****
भारत-वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या
सामन्यात भारतानं आज वेस्ट इंडीजचा पहिला डाव १६२ धावात गुंडाळला. अहमदाबादमध्ये
सुरू असलेल्या या सामन्यात आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या पहिल्या
डावात दोन बाद १२१ धावा झाल्या.
****
धनगर समाजाला एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी जालना इथं उपोषण
करत असलेले दीपक बोऱ्हाडे यांनी समाजाच्या विनंतीनुसार उपोषण स्थगित केलं.
बोऱ्हाडे यांना त्यांची कन्या अहिल्या हिच्या हस्ते नारळ-पाणी देण्यात आलं.
****
हवामान
राज्यात आज नांदेड जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर
उद्या छत्रपती संभाजीनगर तसंच जालना वगळता उर्वरित मराठवाड्यासह राज्यात अनेक
जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलेला आहे.
****
No comments:
Post a Comment