Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 October
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ ऑक्टोबर
२०२५ सकाळी ७.१० मि.
****
· केंद्रीय
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ, कडधान्य उत्पादन वाढीसाठी
विशेष योजना, तर रबी हंगामातल्या धान्यांसाठी एमएसपी वाढीचा निर्णय
· एसटीची
दिवाळीतली १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
· शून्य शिल्लक
सुविधा असणाऱ्या ग्राहकांना इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग सुविधा मोफत देण्याचा रिझर्व्ह
बँकेचा निर्णय
· आज विजयादशमीचा
उत्साह, नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं आयोजन
आणि
· विदर्भातल्या
सर्व जिल्ह्यांसह आज मराठवाड्यात नांदेड, परभणी, हिंगोली
आणि लातूर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
****
केंद्रीय मंत्रिमंडळाने एक
लाख वीस हजार कोटी रुपयांच्या विविध निर्णयांना मान्यता दिली आहे. या निर्णयांमध्ये
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ, कडधान्य उत्पादन वाढीसाठी
विशेष योजना, रबी हंगामातल्या धान्यांसाठी किमान हमी भावात वाढ, आदी निर्णयांचा समावेश आहे.
केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार
परिषदेत या निर्णयाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले…
बाईट - केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
रबी पिकांमध्ये सर्वाधिक ६००
रुपये प्रतिक्विंटल वाढ करडईच्या भावात झाली, तर मसुराच्या दरात ३०० रुपये
प्रतिक्विंटल वाढ झाली आहे. गव्हाला प्रतिक्विंटल १६० रुपये तर बाजरीला १७० रुपये दर
वाढवून मिळाला आहे. हरभऱ्याला प्रतिक्विंटल २२५ रुपये तर मोहरीला प्रतिक्विंटल अडीचशे
रुपये दरवाढ मिळाली आहे.
****
राज्य सरकारची गेली अनेक वर्ष
रखडलेली अनुकंपा भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या चार ऑक्टोबरला पाच
हजार १८७ अनुकंपा उमेदवारांना तसंच इतर पाच हजार १२२ उमेदवारांना नियुक्तांनाही प्रमाणपत्र
प्रदान केली जाणार आहेत. मुख्य कार्यक्रम मुंबईत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या
उपस्थितीत होईल, तर पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात नियुक्तीपत्रं वितरित करतील.
****
राज्यातली पूर परिस्थिती लक्षात
घेता, राज्य परिवहन महामंडळ-एसटीची यंदा दिवाळीतली प्रस्तावित १० टक्के भाडेवाढ रद्द
करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना, आपण परिवहन
मंत्र्यांना याबाबत निर्देश दिल्याचं सांगितलं.
****
शून्य शिल्लक - झिरो बॅलन्स
सुविधा असणाऱ्या बँक खातेधारकांना इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग सुविधा मोफत देण्याचा
निर्णय रिजर्व्ह बँकेनं घेतला आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी काल मुंबईत
ही माहिती दिली. दरम्यान, बँकेनं रेपो दर पाच पूर्णांक पाच टक्क्यांवर कायम ठेवला
आहे. आर्थिक वर्ष २०२६ साठी महागाईचा दर दोन पूर्णांक ६ टक्के एवढा राहिल, असा अंदाज
बँकेच्या पतधोरणा आढाव्यात वर्तवण्यात आला आहे.
****
राज्यातल्या नगरपरिषदा आणि
नगरपंचायतींच्या सदस्यपद तसंच थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय
प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर १३ ऑक्टोबरपर्यंत
हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत.
दरम्यान, राज्यातल्या
३२ जिल्हा परिषदा तसंच त्यांतर्गतच्या ३३६ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरता
सदस्यपदाचं आरक्षण निश्चित करण्यासाठी १३ ऑक्टोबरला सोडत काढण्यात येणार आहे.
****
मराठी भाषेला अभिजात दर्जा
प्राप्त झाल्याने या वर्षीपासून तीन ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून
साजरा केला जाणार आहे. शासनाच्या वतीनं तीन ते नऊ ऑक्टोबर हा सप्ताह ‘अभिजात मराठी
भाषा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
****
सत्य आणि अहिंसा या दोन शब्दांच्या
बळावर ब्रिटीश सत्तेविरुद्ध लढा देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५६ वी जयंती
आज साजरी होत आहे. यानिमित्ताने देशभरात अभिवादन सभांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन
करण्यात आलं आहे.
****
माजी पंतप्रधान लालबहादूर
शास्त्री यांची आज १२१ वी जयंती. साध्या राहणीचा अंगीकार करून, मूर्ती
लहान पण कीर्ती महान ही उक्ती प्रत्यक्षात उतरवणाऱ्या शास्त्रीजींना देशभरातून अभिवादन
केलं जात आहे.
****
विजयादशमी अर्थात दसऱ्याचा
सण आज साजरा होत आहे. काल महानवीच्या पूर्णाहुतीनंतर नवरात्रोत्सवाची आज सांगता होत
आहे. आज सरस्वती पूजन, शस्त्र पूजन तसंच वाहन पूजनही केलं जातं, या पार्श्वभूमीवर
बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली आहे. हिंदू कालगणनेनुसार साडे तीन शुभ
मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणानिमित्त सोन्याचांदीच्या आभुषणांसह विविध वस्तू खरेदीचा
प्रघात आहे.
****
६९वा धम्मचक्र प्रवर्तन दिन
आज नागपूरमध्ये साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं दीक्षाभूमीवर
दाखल झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन
सुराई ससाई यांच्या हस्ते काल दीक्षाभूमी परिसरात पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं.
**
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाचा शताब्दी सोहळा आज साजरा होत आहे. यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती
रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरम्यान कोविंद यांनी काल
दीक्षाभूमी इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन केलं.
****
शिवसेनेचा दसरा मेळावा आज
मुंबईत गोरेगाव इथं होणार आहे. दसरा मेळावा हे शक्तिप्रदर्शन नसून, शेतकऱ्यांची
सेवा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर होत आहे. बीड इथं भगवान गडावर
आयोजित दसरा मेळाव्याला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे संबोधित करणार आहेत. तर बीड जिल्ह्यातच
नारायणगड इथंही दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
****
सेवा आणि सुशासनाच्या माध्यमातून
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी
निरंतर प्रयत्नरत आहे. ईशान्येकडील राज्यांना सरकार मुख्य प्रवाहात आणत आहे, ही राज्यं
आता देशाच्या विकासाचं एक नवीन इंजिन ठरत आहेत, 'सेवा पर्व' या विशेष
मालिकेच्या आजच्या भागात याविषयी जाणून घेऊया..
‘‘एकेकाळी सीमावर्ती भाग म्हणून
पाहिला जाणारा ईशान्य भारत आता प्रगती, शांतता
आणि अमर्याद क्षमतांचा प्रदेश ठरला आहे. गेल्या अकरा वर्षांत सरकारनं समावेशक विकासासाठी
परिवर्तनकारी दृष्टीकोन अवलंबला आहे. यामुळं ईशान्येकडील प्रदेश अभूतपूर्व विकासाबरोबरच
राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आपले स्थान अनुभवत आहे.
बाइट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सरकारनं लुक ईस्ट धोरणाचं रूपांतर ऍक्ट ईस्ट आणि आता त्याही
पुढे जात अॅक्ट फास्ट आणि अॅक्ट फर्स्ट असं केलं आहे. २०१४-१५ मध्ये,
ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयासाठीची तरतूद सुमारे
२ हजार ३३३ कोटी रुपय एवढी होती, ती अडीच
पटीनं वाढवून पाच हजार ९०० कोटी रुपये एवढी झाली आहे.
एकेकाळी देशाच्या इतिहासात बाजूला पडलेला ईशान्येकडील प्रदेश आता देशाच्या विकासाचं
इंजिन ठरत आहे.’’
****
प्रत्येक नागरिकाने जलसाक्षर
होण्यात तसंच जलसंधारणाचं महत्त्व समजून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन
मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं
भूमी आणि जल व्यवस्थापन संस्था- वाल्मीच्या ४६ व्या स्थापना दिन सोहळ्यात बोलत होते.
वाल्मीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही राठोड यांनी यावेळी
दिली.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या
बन्सीलाल नगर इथल्या रुग्णालयात काल स्वस्थ नारी - सशक्त परिवार अभियानाचं उद्घाटन
करण्यात आलं, यावेळी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत निक्षय शिबीर घेऊन क्षयरुग्णांची
तपासणी करून पोषण आहार कीटचं वाटप करण्यात आलं. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत
छत्रपती संभाजीनगर इथं काल महिला पोलीस अधिकारी तसंच अंमलदार यांची वैद्यकिय तपासणी
करण्यात आली.
****
नांदेड आणि अर्धापूर तालुक्यात
काल भटक्या विमुक्त समाजातल्या नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज महसूल महाराजस्व अभियानांतर्गत
विविध दाखले वाटप करण्यात आले. सेवा पंधरवड्यानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला.
****
हवामान
राज्यात आज विदर्भातल्या सर्व
जिल्ह्यांसह मराठवाड्यात नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात
आला आहे. तर उद्या मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता, सर्वत्र
यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, सात ऑक्टोबरपासून
राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल, आणि सुमारे आठ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल, अशी शक्यता
हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment