Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 October 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
· विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जीडीपी वृद्धीचा दर आठ टक्के
असण्याची गरज केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून व्यक्त
· मातृभाषेसह इतर भाषा जिवंत
ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा - मुख्यमंत्र्यांचं आवाहन
· प्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना विष्णुदास भावे गौरवपदक जाहीर
· अतिवृष्टीग्रस्त मत्स्य व्यावसायिकांना मदतीचे प्रस्ताव तयार करा-मंत्री नितेश
राणे यांचे निर्देश
आणि
· वेस्ट इंडीजविरुद्ध अहमदाबाद कसोटीत पहिल्या डावात भारताकडे २८६ धावांची आघाडी
****
विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य
करण्यासाठी सकल देशांतर्गत उत्पादन -जीडीपी वृद्धीचा दर आठ टक्के इतका वाढवण्याची
गरज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. आज नवी दिल्ली
इथं कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात त्या बोलत होत्या. जागतिक
अस्थिरतेच्या परिस्थितीतही देशांतर्गत घटकांमुळे भारताची स्थिती भक्कम असून
कोणताही धक्का सहन करण्याची देशाची क्षमता असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. त्या
म्हणाल्या –
बाईट - अर्थमंत्री निर्मला सीतारामन
****
सामाजिक सुरक्षा क्षेत्रातल्या उत्कृष्ट
कामगिरीसाठी दिला जाणारा इस्सा अर्थात आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना
पुरस्कार यंदा भारताला प्रदान करण्यात आला. मलेशियात क्वालालंपूर इथं केंद्रीय
कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार
प्रत्येक भारतीयाच्या सामाजिक कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
सातत्यपूर्ण प्रयत्नांचं प्रतीक आहे, असं मांडवीय यांनी
यावेळी सांगितलं.
****
केंद्र सरकारच्या वतीनं राज्य सरकारांना
कराचं अग्रीम हस्तांतरण करण्यात आलं असून, त्यापैकी
महाराष्ट्राला सहा हजार ४१८ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हे हस्तांतरण १०
ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या सामान्य मासिक हस्तांतरणाव्यतिरिक्त आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यांनी याबद्दल केंद्र
सरकारचे आभार मानले.
****
सांस्कृतिक उत्थानात भाषा ही महत्त्वाची
असल्यामुळे स्वभाषा, मातृभाषा आणि इतर भाषा जिवंत ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अभिजात मराठी भाषा
सन्मान दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं उद्घाटन आज मुंबईत
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
मराठीसाठी संसाधनांची कधीही कमतरता भासू देणार नाही, असं
आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. ते म्हणाले -
बाईट - मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
जिल्हा मराठी भाषा समितीवर मराठी
भाषेतल्या तज्ज्ञांची तीन वर्षांसाठी नियुक्ती, तसंच मराठी दूत या
संकल्पनेचा प्रस्ताव, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी
मांडला होता,
त्याला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं.
दरम्यान,
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी अभिजात मराठी दिनानिमित्त
भारतीय टपाल विभागामार्फत विशेष टपाल तिकिट आणि पाकिटाचं प्रकाशन, ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी अभिजात मराठी या ॲपचं अनावरण, अभिजात
मराठीची गौरवगाथा या ग्रंथासह हेमांगी अंक, नवभारत
मासिक विशेषांक,
रेडिओवर प्रसारित मुलाखतीवरील ‘मराठीची ये कौतुके’ या
पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं.
****
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी
जनजागृती हाच उपाय, असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी
म्हटलं आहे. मुंबईत पोलिस मुख्यालयात सायबर जनजागृती महिन्याचं उद्घाटन
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आलं, त्यावेळी
ते बोलत होते. सायबर फसवणुकीत तातडीने तक्रार दिल्यास फायदा होऊ शकतो, त्यामुळे सायबर गुन्हे आणि फसवणूक झाल्यास नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. यावेळी लहान मुलांसाठीच्या कॉमिक
पुस्तिकेचं प्रकाशन तसंच, यासंदर्भात जनजागृतीसाठी
मदत करणाऱ्या व्यक्तींचा आणि विविध संस्थांचा सत्कारही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
करण्यात आला.
****
अनुकंपातत्वारील गट क तसंच गट ड मधील
पाच हजारावर उमेदवारांना उद्या शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रं प्रदान केली जाणार
आहेत. राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळसेवा भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांनाही
यावेळी नियुक्तीपत्रं दिली जाणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं राज्याचे सामाजिक
न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत संत एकनाथ
रंगमंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात २९६ जणांना नियुक्तीपत्र दिली जातील. उद्या
सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
नांदेड इथं उद्या अनुकंपा तत्वावर गट
‘क’ संवर्गात ७० उमेदवार, गट ‘ड’ संवर्गात २२२
उमदेवार आणि राज्य लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या ६४ उमेदवारांना पालकमंत्री
अतुल सावे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रं देण्यात येणार आहेत.
****
सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य
विद्यामंदिर समितीचं विष्णुदास भावे गौरवपदक यंदा प्रसिद्ध अभिनेत्री नीना
कुलकर्णी यांना जाहीर झालं आहे. गौरवपदक, २५ हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं
स्वरुप आहे,
समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी आज पत्रकार परिषदेत ही
माहिती दिली. येत्या रंगभूमीदिनी पाच नोव्हेंबरला हा पुरस्कार समारंभपूर्वक
प्रदान करण्यात येणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’
या मासिक रेडिओ कार्यक्रमाला आज ११ वर्षे पूर्ण झाली. ३
ऑक्टोबर २०१४ रोजी विजयादशमीच्या दिवशी ‘मन की बात’ चा पहिला भाग प्रसारित झाला होता. गेल्या महिन्यातल्या अखेरच्या रविवारी, या मालिकेतला १२६ वा भाग प्रसारित झाला. हा फक्त रेडिओ कार्यक्रम नाही तर
सांस्कृतिक आणि सामाजिक बदलाचं प्रतीक असलेला हा कार्यक्रम सरकार आणि
नागरिकांमध्ये थेट संवाद स्थापित करत असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने
महानगरपालिका क्षेत्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा
आयोजित करण्यात आली आहे. उद्या नागपूर इथं होणाऱ्या या कार्यशाळेचं उद्घाटन
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
अतिवृष्टीमुळे मच्छिमार बांधवांच्या
झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन मत्स्य व्यावसायिकांना मदत देण्याचा प्रस्ताव
तयार करा,
असे निर्देश राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे विभागाचे मंत्री
नितेश राणे यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री
तालुक्यातल्या सांडवा इथं नुकसानग्रस्त मच्छिमार बांधवांची त्यांनी आज भेट घेत चर्चा
केली,
त्यावेळी ते बोलत होते. आमदार अनुराधा चव्हाण, मस्य व्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे, छत्रपती
संभाजी नगर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुरेश भारती यांच्यासह अनेक मान्यवर
यावेळी उपस्थित होते.
****
यावर्षीपासून पीक विमा योजनेत नुकसान
भरपाई निश्चित करताना पीक कापणी प्रयोगाला आधारभूत मानले जाणार आहे. या प्रक्रियेत
कोणत्याही प्रकारची तांत्रिक चूक होऊ नये, शेतकऱ्यांना
योग्य लाभ मिळावा, यासाठी जिल्हास्तरावर प्रात्यक्षिक
स्वरूपात पीक कापणी प्रयोग राबवण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात आज जिल्हाधिकारी
राहुल कर्डिले यांनी खडकूत इथं शेतकरी बालाजी नागुराव कंकाळ यांच्या शेतावर
सोयाबीन पिकाची कापणी करून उत्पन्नाचा अंदाज काढण्यासाठी आयोजित प्रात्यक्षिकाची
पाहणी केली. कर्डीले यांनी शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाचे महत्त्व, पद्धती आणि त्यातून मिळणाऱ्या निष्कर्षांबाबत मार्गदर्शन केलं.
****
जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात
महापुरामुळे बाधित झालेले अनेक कुटुंब आपल्या गावी परतत असून, जिल्हा प्रशासनाने मोफत धान्य वाटपाची मोहीम हाती घेतली आहे. लाभार्थी
कुटुंबांना १० किलो गहू आणि १० किलो तांदूळ मोफत देऊन प्रशासनाकडून पुरग्रस्तांना
दिलासा देण्यात येत आहे. सुमारे दोन हजार १७० कुटुंबांना २१७ क्विंटल गहू आणि २१७
क्विंटल तांदूळ,
असे एकूण ४३४ क्विंटल धान्य वितरित करण्यात येणार आल्याची
माहिती जिल्हा प्रशासनानं
दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज काँग्रेस पक्षाच्या वतीने अतिवृष्टी बाधीत
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी जालनाचे खासदार कल्याण
काळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
****
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान अहमदाबाद
इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजचा दुसऱ्या दिवसाचा खेळ
थांबला तेंव्हा भारतीय संघाने ५ बाद ४४८ धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडे आता २८६
धावांची आघाडी झाली असून, रविंद्र जडेजा १०४ तर
वाशिंग्टन सुंदर ९ धावांवर खेळत आहे. काल या सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव १६२
धावांवर संपुष्टात आला होता.
****
धुळे इथं आज परंपरेनुसार भगवान
बालाजीच्या रथोत्सवाला प्रारंभ झाला. रथोत्सवाचं हे १४६ वं वर्ष आहे. धुळे शहरासह
शिरपूर,
सोनगीर, शिंदखेडा आणि बेटावद इथही
आज हा रथोत्सव साजरा होतो.
****
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी छत्रपती
संभाजीनगर येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. ऑक्टोबर महिन्यासाठीचा
लोकशाही दिन येत्या सोमवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित
करण्यात आला आहे.
****
स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम दक्षिण मध्य
रेल्वेच्या नांदेड विभागात राबवला जात आहे. या अंतर्गत आज विभागातील परभणी, जालना,
छत्रपती संभाजीनगर तसंच नागरसोल रेल्वे स्थानकांवर स्वच्छता
करण्यात आली.
****
हवामान
राज्यात आज बीड, धाराशिव, लातूर तसंच नांदेड जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर उद्या छत्रपती संभाजीनगर तसंच जालना वगळता उर्वरित मराठवाड्यासह विदर्भ आणि
पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलेला आहे.
****
No comments:
Post a Comment