Friday, 3 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 03 October 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ ऑक्टोबर २०२ सकाळी.०० वाजता

****

कामगार राज्य विमा महामंडळानं न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी तसंचं सरकारी खटले मागे घेण्यासाठी नवीन ॲम्नेस्टी स्कीम २०२५ ची मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत. या योजनेचा उद्देश अनुपालन सुलभ करणं तसंच न्यायालयीन प्रकरणांचा बोजा कमी करून उद्योग व्यवसाय सुलभीकरण करणं हा आहे. ॲम्नेस्टी स्कीम ही एकदाच मिळणारी विवाद निपटारा योजना असून, तिच्यामध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करणं, ईएसआय कायद्याअंतर्गत अनुपालनाला चालना देणं आणि उद्योग जगताला प्रोत्साहन देणं अपेक्षित आहे.

****

ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपीसोबत साखरेची किमान आधारभूत किंमत जोडल्यास साखर उद्योगाला स्थैर्य येईल आणि शेतकऱ्यांना अधिक दर देता येईल, असं मत, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर इथं व्यक्त केलं. मुंबईमध्ये नुकत्याच मंत्री समितीच्या बैठकीत साखर उद्योगासंदर्भातल्या विविध प्रश्नांवर झालेल्या चर्चेची त्यांनी माहिती दिली. ऊसाची एफआरपीची रक्कम गेल्या सहा वर्षापासून वाढत्या उत्पादन खर्चामुळे, प्रति टन सुमारे ६५० रुपयांपर्यंत वाढली आहे. त्या तुलनेत साखरेच्या किमान विक्री दरामध्ये वाढ करण्यासाठी एफआरपी आणि एमएसपी यांना जोडणं आवश्यक आहे. याबाबत राज्य शासनानं केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा, असं मंत्री समितीच्या बैठकीत ठरल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.

****

श्रीक्षेत्र गणपतीपुळे संस्थानकडून मराठवाड्यातल्या महापुरातल्या नुकसानग्रस्तांकरता ४२ लाख रुपये मदत पाठवण्यात आली आहे. मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्यांना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २१ लाख आणि पश्चिम महाराष्ट्र सेवा भारती या संस्थेला २१ लाखांची मदत धनादेशाद्वारे पाठवण्यात आली. पालघर इथल्या श्री शितलादेवी आणि हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्टनंही मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांच्याकडे सुपूर्द केला.

****

नाशिक जिल्ह्यात उमराणे इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तसंच खारीफाटा इथल्या रामेश्वर कृषी मार्केटमध्ये नवीन लाल कांदा लिलावाचा शुभारंभ काल करण्यात आला. मुहूर्ताच्या बैलगाडीतून आणलेल्या नवीन लाल कांद्याला रामेश्वर मार्केटमध्ये सर्वोच्च पाच हजार ५५५ रुपये, तर उमराणे बाजार समितीत पाच हजार १०० रुपये बाजारभाव मिळाला.

*****

दीक्षाभूमीपासून सुरू झालेल्या संविधान सत्याग्रह पदयात्रेची काल सेवाग्राममध्ये सांगता झाली. सर्वांना सोबत घेऊन जाणारं संविधान आहे, म्हणून संविधानाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे, असं काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले. या यात्रेनिमित्त संघाच्या मुख्यालयाला संविधानाची प्रत भेट देऊ इच्छिणाऱ्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली.

****

लातूर जिल्ह्यात उदगीर इथं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ध्यानस्थ पुतळ्याचं लोकार्पण काल आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं. उदगीर नगर परिषदेच्या वतीनं हा पुतळा उभारण्यात आला आहे.

****

इंग्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या एज्युकेशनया संस्थेनं आयोजित केलेल्या वर्ल्ड बेस्ट स्कूल स्पर्धेत पुणे जिल्हा परिषदेची जालिंदरनगर इथली जिल्हा परिषद शाळा जगात सर्वोत्कृष्ट ठरली आहे. लोकसहभागातून विकसित झालेल्या या शाळेला एक कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे. हा क्षण देश आणि राज्याच्या शासकीय शिक्षण व्यवस्थेला कलाटणी देणारा आहे, असे गौरवोद्गार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काढले.

****

ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना २५ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल अटक केली. ठाण्यात नौपाडा भागामध्ये घंटाळी परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.

****

बिहारच्या बुद्धगया इथल्या महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्या, या मागणीसाठी मुंबईत येत्या १४ ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

****

पैठणच्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. आता धरणाचे १८ दरवाजे दीड फुटापर्यंत स्थिर करुन २८ हजार २९६ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

****

नॉर्वे इथं सुरु असलेल्या जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं. ४८ किलो वजनी गटात मीराबाईने स्नेच मध्ये ८४ किलो तर क्लीन अँड जर्क मध्ये ११५ असं एकूण १९९ किलो वजन उचलत ही कामगिरी केली.

****

नवी दिल्लीत सुरु असलेल्या १२व्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत काल भारताने आणखी दोन पदकांची कमाई केली. त्यामुळे चार सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन कांस्य पदकांसह पदक तालिकेत भारत सातव्या स्थानावर पोहोचला आहे.

****

No comments: