Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 05
October 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ ऑक्टोबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
मराठवाड्याच्या काही भागात
आज जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर,विदर्भातल्या
काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसंच,विदर्भ आणि
मराठवाडा विभागात, परवा सात ऑक्टोबरपर्यंतही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा
अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर कोकणातल्या सखल भागात पूरस्थिती निर्माण होण्याची
शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेलं शक्ती नावाचं
चक्रीवादळ चक्राकार गतीनं सरसावल्यानं मुंबईसह नजिकच्या काही जिल्ह्यांना प्रभावित
करुन आज या भागांमध्ये विजांसह ढगांचा कडकडाट आणि जोरदार वा-यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात
आली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात काल रात्री
अकरा वाजल्यापासून रात्रभर भूम वाशी आणि कळंब
तालुका परिसरात जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मागिल आठ दिवसांत
या भागात पावसानं विश्रांती घेतली होती. या तालुक्यात सखल भागात पाणी भरलं, काही गावात
पाणी शिरल्यानं रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. रस्त्यावरून पाणी वाहत असल्यानं मोहा-
खामसवाडी रस्ता बंद आहे, तर तेरणा नदीच्या पाण्यामुळं संजीतपुर गावचा संपर्क तुटला
असून मांजरा नदीदेखील दुथडी भरून वाहत आहे. मांजरा धरणातून पंधरा हजार दशलक्ष घनमीटर
वेगानं विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
****
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री
अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला
भेट देऊन श्री साईबाबांचं आज दर्शन घेतलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
अजित पवार उपस्थित होते. श्री साईबाबा संस्थानच्यावतीनं शाह आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा
सत्कार यावेळी करण्यात आला.
****
मराठवाडा विभाग पदवीधर मतदार
संघ मतदार नोंदणीला प्रारंभ झाला आहे. मतदारांनी येत्या सहा नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदवण्याचं
सांगण्यात आलं आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मतदार यादी दर वेळी नव्यानं तयार
करण्यात येते. त्यामुळं यापूर्वीच्या निवडणुकीतील मतदार यादीत आपलं नाव असलं तरी ते
रद्द होत असल्यानं पुनर्नोंदणी गरजेची असल्याचं
यंत्रणेतर्फे कळवण्यात आलं आहे. मतदार हा मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातला कोणत्याही
वयाचा, कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि रहिवासी असावा. तर, एक नोव्हेंबर २०२२ पुर्वीचा
तो पदवीधर असावा. तालुक्याच्या तहसील कार्यालयात मतदार अर्ज जमा करता येतील.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूरच्या
श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवा अंतर्गत, उद्या आणि परवा कोजागिरीसह
अश्विनी पौर्णिमेच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येणार आहेत. यात
पायी चालत येवून दर्शन घेणा-या भाविकांची संख्या
मोठी आहे. तसंच राज्यासह तेलंगणा,कर्नाटक-आंध्र प्रदेशातुन येणारी प्रवासी वाहनंही मोठ्या
प्रमाणात येतील. त्यामुळेच भाविकांच्या एकंदर सुरक्षेसाठी प्रशासनातर्फे या भागातील
वाहतुक मार्गात बदल करुन ती अन्यत्र वळवण्यात आली आहे. कालपासूनच येत्या मंगळवारी उत्तररात्रीपर्यंत
हा बदल लागू राहणार आहे. यानुसार छत्रपती संभाजीनगर मार्गे सोलापूर याशिवाय हैदराबाद, सोलापूर- लातूर, तुळजापूर ते
बार्शी या मार्गावरील वाहतुकीचा यात समावेश आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या कंधार
तालुक्यात मन्याड नदीवरील बहादरपुरा पुल रस्ता ते बिजेवाडीफाटा मार्गावर महिनाभरासाठी
जड वाहनाची वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी
मार्ग कंधार-घोडज मार्गे फुलवळ हा राहील. जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशांनुसार
येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत असा बदल करण्यात आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड
इथं,प्रस्तावित शंभर खाटांच्या ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जमीन
उपलब्ध झाली असून त्याबाबतचं संमतीपत्र प्राप्त झालं आहे. नांदेडच्या डॉक्टर शंकरराव
चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - रुग्णालयांतर्गत मुदखेडच्या आरोग्य प्रशिक्षण
केंद्र उभारण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार
नगर परिषद गट क्र. ४६० मधील जलसंपदा विभागाची दोन हेक्टर जागा यासाठी उपलब्ध झाल्याचं
आमदार जया चव्हाण यांनी सांगितलं.
****
आपलं सर्वात मोठं ध्येय आगामी
२०२७ चा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक आहे असं भारताच्या एकदिवसीय क्रिकेट पुरुष संघाच्या
कर्णधारपदी निवड झालेल्या शुभमन गिल यानं स्पष्ट केलं आहे. अहमदाबाद इथं बोलतांना त्यानं
हे मत मांडलं.
भारताचं नेतृत्व करणं हा सर्वात
मोठा सन्मान असून जबाबदारीपूर्वक आमचे खेळाडू कठोर मेहनतीसह प्रत्येक मालिका विश्वचषकाचं
ध्येय लक्षात घेऊन खेळू असं तो म्हणाला. कसोटी कर्णधार म्हणून चमकदार कामगिरीनंतर २५
वर्षीय युवा गिलनं एकदिवसीय सामन्यांची तयारी सुरू केली आहे. १९ ते २५ ऑक्टोबर दरम्यान
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याला भारतीय संघाचा कर्णधार तर श्रेयस
अय्यरला उपकर्णधार करण्यात आलं आहे. दरम्यान,भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे
जाहिर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी १५ सदस्यीय संघात रोहित शर्मा आणि
विराट कोहली यांचाही समावेश आहे.
****
क्रिकेटमध्ये महिलांच्या एकदिवसीय
सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत, आज भारताची लढत पारंपारीक प्रस्तिस्पर्धी पाकिस्तानशी
होत आहे. थोड्याच वेळेनंतर, दुपारी तीन वाजता श्रीलंकेत कोलंबो इथं हा सामना सुरु होईल.
****
No comments:
Post a Comment