Sunday, 5 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.10.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 October 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देणार- केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची ग्वाही

·      देशात गेल्या सहा वर्षांत सुमारे १७ कोटी नवीन रोजगारांची निर्मिती

·      जीएसटी कर सुधारणेमुळं भारताला जागतिक स्तरावर वस्त्रोद्योगाचं केंद्र बनायला मदत मिळणार

आणि

·      शेष भारतावर मात करुन विदर्भ संघानं ईराणी चषक पटकावला

****

राज्यात अती पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात लोणी इथं शेतकरी मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. ते म्हणाले

बाईट - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

 

शेतकऱ्यांना उत्पन्नाचं आणखी साधन मिळावं याकरता सहकारी साखर कारखान्यांनी गाळप चालू नसताना इथेनॉल तसंच भाजीपाला आणि इतर उत्पादनांसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन अमित शहा यांनी केलं. प्रवरानगर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित परिसराचं उद्घाटन आज शहा यांच्या हस्ते झालं. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. आपल्या भाषणात ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भाषणं यावेळी झाली.

****

देशात गेल्या सहा वर्षात सुमारे १७ कोटी नवीन रोजगारांची निर्मिती झाली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयानं यासंदर्भात जारी केलेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०२३-२४ मध्ये ६४ कोटी ३३ लाख रोजगार निर्माण झाले असून सहा वर्षांपूर्वी

२०१७-१८ मध्ये ही संख्या ४७ कोटी ५० लाख इतकी होती. याशिवाय बेरोजगारीच्या दरात देखील मोठी घट झाली असून २०२३-२४ मध्ये तो साडेतीन टक्के पर्यंत खाली उतरला आहे. देशात नव्यानं सुरु झालेले स्टार्टअप्स, स्किल इंडिया, रोजगार मेळावे, पी एम विश्वकर्मा योजना, मनरेगा, पी एम विकसित भारत रोजगार योजना आणि लखपती दीदी यांसारख्या इतर योजनांना या रोजगार निर्मितीचं श्रेय असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये खोळकल्याचं औषध- कफ सिरपच्या सेवनानं काही मुलांचे मृत्यू झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची आज बैठक बोलावली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, आरोग्य सचिव, औषध नियंत्रक यात सहभागी होत आहेत. दरम्यान, दोन वर्षांहून कमी वयाच्या बालकांना सर्दी- खोकल्याची औषधं दिली जाऊ नयेत, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कालच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यात पारसिया भागात कफ सिरपमुळं अकरा मुलांच्या मृत्यू प्रकरणी काल रात्री उशिरा संबधित डॉक्टर प्रवीण सोनी आणि तामिळनाडूच्या कांचीपुरमची श्रीसन फार्मास्युटिकल कंपनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होवून डॉक्टर सोनीला अटक झाली आहे.

****

 सामान्य माणसावरचा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं वस्त्रोद्योगावरचा जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या कररचनेनुसार हस्तनिर्मित धाग्यांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. याशिवाय अडीच हजारांपेक्षा कमी किमतीच्या तयार कपड्यांवरील जीएसटी ५ टक्के झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांना विविध फॅशनचे कपडे परिधान करणं सहज परवडणार आहे. वस्त्रोद्योगावरील जीएसटी कमी झाल्यामुळे कपड्यांचे दरही कमी होणार आहेत. यामुळे कपड्यांची मागणी वाढेल आणि उत्पादनही वाढेल. तसंच निर्यातीतही वाढ होणार आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना होणार आहे. यामुळे भारताला जागतिक स्तरावर वस्त्रोद्योगाचं केंद्र बनायला मोठी मदत मिळणार आहे.

****

पश्चिम बंगालमधे मुसळधार पाऊस होत असून भूस्खलनाच्या घटनांमधे किमान २० जणांचा मृत्यू झाला. तिस्ता नदीला पूर आला आहे, राष्ट्रीय महामार्गांवर पाणी साचलं आहे. शेतात आणि घरात पाणी शिरलं आहे. एनडीआरएफची पथकं आपद्ग्रस्त भागात मदतकार्य करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि दुर्घटनाग्रस्तांना तातडीनं मदत पुरवली जाईल असं पंतप्रधानांनी सामाजिक संपर्क माध्यमांवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही या दूर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

****

मराठवाडा तसंच विदर्भ विभागात, परवा सात ऑक्टोबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या मंगळवारपर्यंत उत्तर कोकण किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

****

लातूर जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी या अडचणीच्या काळात खचून जाऊ नये, या संकटातून सावरण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम‌ तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे. त्यांनी आज जळकोट तालुक्यातल्या तिरुका इथं तिरु नदी काठावरच्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधत माहिती घेतली आणि त्यांना दिलासा दिला. सप्टेंबरमधील नुकसानाचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. पीक विमा भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोगाचे अहवाल महत्वाचे असल्यानं कृषी विभागाला याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचं पालकमंत्री भोसले यांनी सांगितलं. पुरामुळे वाहून गेलेले रस्ते आणि पुलांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष कार्यक्रम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचं मंत्री भोसले म्हणाले.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे आरोग्य शिबिरं घेतली जात असून विविध प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार नऊ आरोग्य शिबिरं, तसंच साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. आरोग्य संचालक, जिल्हाधिकारी, कार्यकारी अधिकारी पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. सद्यस्थितीत कोणत्याही भागामध्ये साथरोगजन्य परिस्थिती नसल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, उकळलेलं पाणी पिणं, व्यक्तिगत स्वच्छता, घर आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता, काही लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला, आदी खबरदारी घेण्याचं आवाहन धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.  

****

बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं कपिलधारवाडीतील गावकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून त्यांच्यावर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी काल रात्री कपिलधारवाडीला भेट देऊन ग्रामस्थांना धीर दिला. यावेळी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून घेऊन पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरामुळं जवळपास सहा तालुक्यातील ८२ गावांमध्ये पाणी शिरलं. सद्यस्थितीत अनेक गावातील पाणी पूर्णपणे ओसरलं असून या सर्व गावांमध्ये आरोग्याच्या दृष्टीनं स्वच्छता करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं जिल्हा परिषदेच्या यंत्रणाकडून या सर्व गावांत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

****

विदर्भानं इराणी चषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर तिसऱ्यांदा शिक्कामोर्तब केला आहे. आज नागपूर इथं विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सामन्याच्या पाचव्या दिवशी विदर्भानं शेष भारत संघावर ९३ धावांनी मात केली. ३६१ धावांचं लक्ष्य असलेल्या शेष भारत संघाचा दुसरा डाव २६७ धावांमध्ये बाद झाला. पहिल्या डावात झळकवलेल्या १४३ धावांमुळं अथर्व तायडे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. विदर्भाचा गोलंदाज हर्ष दुबेनं दुसऱ्या डावात चार गडी बाद केले. विदर्भनं या सामन्याच्या पहिल्या डावात ३४२ आणि दुसऱ्या डावात २३२ धावा केल्या तर शेष भारत संघ पहिल्या डावात २१४ आणि दुसऱ्या डावात २६७ धावांमध्ये बाद झाला. विदर्भ संघ आतापर्यंत तीन वेळा रणजी चषक जिंकून इराणी चषक स्पर्धेसाठी पात्र ठरला असून तिनही वेळा विजेता ठरला आहे. 

****

भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज कोलंबो इथं सुरू सामन्यात भारतीय संघानं ३ षटकांत पाच बाद १६० धावा केल्या आहेत. 

****

नामवंत साहित्यिक बाबा भांड यांची बडोदा इथं डिसेंबर महिन्यात होणाऱ्या मराठी वाङमय परिषदेच्या अमृत महोत्सवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बडोद्यातील या परिषदेचे कार्यवाह संजय बच्छाव यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. येत्या १९ ते २१ डिसेंबर दरम्यान हे साहित्य संमेलन होणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या सीमावर्ती भागात परंपरागत बतकम्मा उत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवाचा उत्साह धर्माबाद, बिलोली, उमरी नायगाव या तालुक्यांसह नांदेड शहरातही दिसून येत आहे.

****

No comments: