Sunday, 5 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 05 October 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ ऑक्टोबर २०२ सकाळी.०० वाजता

****

कौशल्य वाढलं की देश आत्मनिर्भर होतो, निर्यात वाढली की रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होते त्यामुळे कौशल्यवृद्धीसाठीच्या पी एम सेतू योजनेमुळे देशातील युवावर्ग जगाच्या कौशल्य मागणीशी जोडला जाईल, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी केलं आहे. युवक-केंद्रित अशा शिक्षण, कौशल्य आणि उद्योजकतेला चालना देणाऱ्या ६२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध उपक्रमांचं काल पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत आयोजित कौशल्य दीक्षांत समारंभात अनावरण झालं, त्यावेळी ते बोलत होते.

कौशल्य विकासाला भारताचं प्राधान्य असून देशाला प्रगतीपथावर नेण्यामध्ये युवकांचं सामर्थ्य कामी येणार असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.

आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आय.टी.आय. या आत्मनिर्भर भारताच्या कार्यशाळा असून देशात उत्पादकता, रोजगार, संरक्षण क्षेत्रात उत्पादकता वाढली आहे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये रोजगार वाढला आहे आणि याचा लाभ भारताच्या युवाशक्तीला होत आहे, असंही मोदी म्हणाले.

****

वित्तीय व्यवस्थेतल्या विविध क्षेत्रांत सर्वसामान्यांच्या असलेल्या बेवारस आर्थिक मालमत्तेचा जलद निपटारा करण्यासाठी ‘आपकी पुंजी आपका अधिकार’ या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते गुजरातच्या गांधीनगर इथं झाला. या मोहिमेमुळे, कायदेशीर दावेदारांना बेवारस ठेवींचा योग्य परतावा मिळण्यास हातभार लागणार असल्याचं त्या म्हणाल्या. या मोहिमेतून, संबंधीत कायदेशीर दावेदारांना बेवारस ठेवींचा योग्य परतावा मिळण्यास हातभार लागेल असं त्यांनी नमूद केलं. बँकांसह अन्य आर्थिक संस्थांमध्ये  पावणेदोन लाख कोटींहून जास्त दावा करण्यात न आलेली रक्कम पडून आहे.

****

आधार कार्डाच्या, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं वय सात ते १५ वर्षांच्या आतील मुलांसाठीच्या जैवमितीय – आधार बायोमेट्रीक माहिती अद्ययावत करण्याचं शुल्क येत्या एक वर्षासाठी माफ केलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या निवेदनानुसार, या वयोगटासाठी अनिवार्य बायोमेट्रीक अद्ययावतीकरणासाठीचे शुल्क माफ करण्याच्या प्रक्रियेला या एक ऑक्टोबरपासून सुरुवात झालेली आहे.

****

राज्यात हवामानशास्त्र विभागानं आज अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर  संभाव्य चक्रीवादळाबद्दल सूचित केलं आहे.त्यामुळे मुंबईसह पर्रिसरात येत्या आठ ऑक्टोबरपर्यंत ढगांच्या गडगडाटासह विज आणि जोरदार वारे वाहतांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

****

धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवात उद्या आणि परवा कोजागिरी तसंच अश्विनी पौर्णिमेच्या निमित्तानं दर्शनासाठी भाविकांच्या होणा-या संभाव्य गर्दीमुळे वाहतुक मार्गात बदल करण्यात आले आहेत. राज्यासह तेलंगणा, कर्नाटक- आंध्र प्रदेशातुन येणारी प्रवासी वाहनं तसंच पायी चालत दाखल होणारे भाविक यांच्या एकंदर सुरक्षेसाठी प्रशासनातर्फे असा निर्णय घेण्यात आला असून हा बदल परवा मंगळवारी रात्रीपर्यंत लागू राहणार आहे.

****

माओवाद्यांनी हिंसाचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं, सशस्त्र संघर्षाच्या मार्गावर चालणाऱ्यांना सुरक्षा दलांकडून होणाऱ्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सूचीत केलं आहे. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं आयोजित बस्तर दसरा लोकोत्सवात ते बोलत होते.

देशाला येत्या ३१ मार्च २०२६ पर्यंत डाव्या विचारसरणीच्या कट्टरवाद्यांपासून मुक्त करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

नवी दिल्लीत आयोजित जागतिक पॅरा अथेलेटिक्स करंडक या अपंगांसाठीच्या स्पर्धेत भारतानं काल तीन पदकांची कमाई केली.

स्पर्धेत आता भारताची पदक संख्या १८ झाली आहे. यामध्ये सहा सुवर्ण, सात रौप्य आणि पाच कांस्य पदके आहेत. ही भारताची ऐतिहासिक कामगिरी ठरत आहे.

****

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज, भारत-पाकिस्तान लढत रंगणार आहे.  श्रीलंकेत कोलंबो इथं दुपारी तीन वाजता हा सामना होणार आहे. पाकिस्तान बरोबर आतापर्यंत झालेल्या सर्व प्रकारच्या सामन्यांमध्ये भारताच्या महिला चमूनं २७ पैकी २४ सामने जिंकले आहेत.

****

No comments: