Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 October 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
राज्यातल्या नगरपालिका आणि
नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांचं आरक्षण जाहीर
·
अधिकाधिक गुंतवणूकदारांना
राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन
·
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’
योजनेत आतापर्यंत सात लाखांहून अधिक वीजग्राहकांचा सहभाग
आणि
·
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय
विमानतळाचं येत्या बुधवारी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
****
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज २४७
नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मुंबईत झाली.
१४७ नगर पंचायतींपैकी अनुसूचित जमातींसाठी १३, इतर
मागास वर्गासाठी ४०,
खुल्या प्रवर्गासाठी ७६ जागात आरक्षित झाल्या आहेत. ३३
नगरपरिषदा,
अनुसूचित जातीसाठी तर ६७ नगरपरिषदा, ओबीसीसाठी
आरक्षित झाल्या आहेत. नगर पंचायतींच्या उर्वरित ७६ जागांवर खुल्या प्रवर्गातून
नगराध्यक्ष निवडून येतील. तर सर्व गटातल्या निम्म्या जागा महिलांसाठी राखीव
असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, फुलंब्री, सिल्लोड
या नगर परिषदा सर्वसाधारण गटासाठी राखीव झाल्या असून, कन्नड, खुलताबाद
आणि पैठण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी तर वैजापूर नगर परिषदेचं अध्यक्षपद इतर
मागासवर्गासाठी राखीव झालं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या १६ पंचायत समितींच्या सभापती पदांसाठी
आरक्षण सोडत येत्या १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा
नगरपरिषद आणि रेणापूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदाची आरक्षण
सोडत परवा ८ ऑक्टोबरला काढण्यात येणार आहे.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यावर्षी होणाऱ्या
निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगानं मंजूरी दिली आहे. ही
प्रभाग रचना शासन राजपत्रामध्ये आणि महानगरपालिका संकेतस्थळावर आज प्रसिद्ध
करण्यात आली आहे.
****
बिहार राज्य विधानसभा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज
जाहीर केला. सहा आणि ११ नोव्हेंबर, असं दोन टप्प्यात इथे मतदान
होणार असून,
मतमोजणी १४ नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीत मतदान
यंत्रांवर उमेदवारांची रंगीत छायाचित्रं असणार आहेत.
****
पायाभूत सुविधांच्या विकासामुळे राज्यात गुंतवणुकीच्या
अमर्याद संधी असून गुंतवणूकदारांनी अधिकाधिक गुंतवणूक करावी, असं
आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ट्वेंटी-ट्वेंटी गुंतवणूक
संघटनेच्या शिष्टमंडळासोबत ते आज मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य शासन
उद्योग वाढीबरोबरच प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी काम करीत आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने मोठ्या प्रमाणावर कौशल्य विकास कार्यक्रम
राबवण्यात येत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यात ग्रीन स्टील संदर्भात धोरण तयार
करण्यासाठी एका समितीचं गठन करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज झाली, त्यात
मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
****
गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर नाशिक इथं चित्रपट सृष्टी
निर्माण करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. इगतपुरी परिसरात लवकरच एक भव्य
चित्रपटनगरी साकारणार असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक
संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भुजबळ बोलत होते.
****
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून
करण्यात येणारी सर्व कामे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने
पूर्ण करावीत,
असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना
साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. त्या आज मुंबई इथं बोलत होत्या. प्रत्येक
प्रकल्पाच्या तांत्रिक आणि भौगोलिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून या
कामांमुळे अंतर कमी होणार आहे. वेळ आणि इंधनाची बचत होऊन प्रवास सुखकर होण्यास मदत
होणार असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं.
****
वीजबिलांच्या छापील कागदांचा वापर बंद करण्यासाठी
महावितरणने सुरू केलेल्या ‘गो-ग्रीन’ योजनेला
वीजग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल दोन लाख
३ हजार ३४० वीजग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला असून, आतापर्यंत
७ लाख ६ हजार ९२४ ग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत. या ग्राहकांना आठ कोटी ४८
लाख ३० हजार ८८० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी
वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी होण्याचं आवाहन, महावितरणचे अध्यक्ष
तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केलं आहे. या योजनेत वीजबिलांसाठी
छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून फक्त ‘इमेल’ तसंच
‘एसएमएस’चा पर्याय निवडून वीज देयक
ग्राहकांना पाठवलं जातं.
****
कोजागरी पौर्णिमा आज साजरी होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं
यानिमित्त बाजारात उत्साह दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर दुधासह सुका मेव्याची
मागणी वाढलेली दिसून आली.
****
वैद्यकशास्त्रासाठीचं नोबेल पारितोषिक आज जाहीर करण्यात
आलं. अमेरिकेच्या मेरी ई. ब्रुन्कोव आणि फ्रेड रॅम्सडेल यांच्यासह जपानचे शिमोन
साकागुची यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. शरीरातील प्रतिकारशक्तीने स्वतःच्याच
अवयवांवर हल्ला करू नये यासाठी केलेल्या संशोधनाकरता, या
तिघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
राष्ट्रीय सेवा योजना-एनएसएसचे २०२२-२३ चे पुरस्कार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रदान केले. केंद्रीय युवा आणि खेळ मंत्री डॉ
मनसुख मांडविया यावेळी उपस्थित होते. सेवा योजनेचे कार्यकर्ते विद्यार्थी, कार्यक्रम
अधिकारी तसंच एनएसएस युनिट्सना उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल हे पुरस्कार दरवर्षी
दिले जातात.
****
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या
बुधवारी आठ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. येत्या
डिसेंबर पासून या विमानतळावरुन उड्डाणांना सुरुवात होईल. महाराष्ट्र नगरविकास आणि
औद्योगिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही
माहिती दिली. विमानतळाला ३० सप्टेंबर रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून
परवाना मिळाला आहे.
****
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नवयुगीन
आणि पारंपारिक अल्पकालीन अभ्यासक्रमांच्या पहिल्या तुकडीचं उद्घाटन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परवा ८ ऑक्टोबरला होणार आहे. कौशल्य विकास आणि
उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही माहिती
दिली. राज्यभरात ६०० ठिकाणी हे उद्घाटनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या
उपक्रमाअंतर्गत जवळपास अडीच हजारांहून अधिक
तुकड्यांमध्ये प्रशिक्षण सुरू होणार आहे. या माध्यमातून चालू वर्षात ७५ हजार
प्रशिक्षणार्थींना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार असून, पुढील
वर्षापासून ही संख्या १ लाखापर्यंत वाढवण्याचा संकल्प विभागाने केल्याचं लोढा
यांनी सांगितलं.
****
नांदेड इथं सर्व शाळांमधील शिक्षक, महाविद्यालयीन
कर्मचारी, विद्यार्थी,
पालक तसंच विविध संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी या सोहळ्यास
उपस्थित राहण्याचं आवाहन श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी केलं आहे.
****
भारतीय नौदलामध्ये ‘आंद्रोथ’ ही दुसरी पाणबुडी युद्धनौका आज
विशाखापट्टणम इथं झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आली. ‘आंद्रोथ’
च्या समावेशामुळे समुद्रतटीय क्षेत्रातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम होईल तसंच
नौदलाच्या सागरी शक्तीला नवी दिशा मिळेल. या नौकेसाठी ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी
सामग्रीचा वापर करण्यात आला आहे.
****
अनुसूचित जमाती प्रवर्गात इतर कोणत्याही जातींचा समावेश करू
नये या मागणीसाठी नांदेडमध्ये आज आदिवासी समाजाच्या वतीने आरक्षण बचाव मोर्चा
काढण्यात आला. शहरातील नवा मोंढा मैदानातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी
कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना
मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या पाथरी विधानसभा मतदारसंघातील आपतग्रस्तांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करा अशी मागणी आमदार राजेश विटेकर आणि
आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आज त्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे
मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यात या
पॅकेजची विशेष बाब म्हणून नोंद घेऊन शिफारस करावी असं विटेकर यांनी म्हटलं आहे.
****
मैदानी स्पर्धांमुळे खेळाडूंची निर्णय क्षमता आणि
आत्मविश्वास वाढतो,
असं मत नांदेडच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे
प्र-कुलगुरु डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांनी व्यक्त केलं आहे. विद्यापीठाच्या विभागीय
क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. मुक्त विद्यापीठातील
स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना विद्यापीठ स्तरावरून सर्व आवश्यक
सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, तसेच त्यांना पुरस्कारानेही
सन्मानित करण्यात येणार असल्याचं बिसेन यांनी सांगितलं.
****
नांदेड-मेडचेल या रेल्वे गाडीला आज सकाळी आग लागली.
सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. रेल्वेतील शौचालयाजवळील कचऱ्याला शॉर्ट
सर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
****
परभणी शहर आणि परिसरात आज पहाटे मुसळधार पाऊस झाला. परभणीत
एकाच दिवसात तब्बल ९८ पूर्णांक २ दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं दिली आहे. पावसामुळे
सखल भागात पाणी साचलं होतं.
****
छत्रपती संभाजीनगर ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम
सुरु असल्याने या मार्गावरील वाहतुक येत्या १८ तारखेपर्यंत दुसऱ्या मार्गाने
वळवण्यात आली आहे. बिडकीन मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने कचनेर-
निजलगाव- बिडकीन डीएमआयसी एन्ड्युरन्स कंपनीजवळून- शेकटा फाटा मार्गाने वळवण्यात
आल्याचं पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळविले आहे.
****
राज्यात आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांना यलो
अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता इतर सर्व
जिल्हे, लगतचा सोलापूर जिल्हा तसंच तळकोकणात सिंधुदूर्ग जिल्ह्यात आज हवामान विभागाने
यलो अलर्ट दिला आहे. उद्या छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यासह संपूर्ण खानदेश आणि
विदर्भ तसंच कोकणातल्या काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment